मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे. ही प्रवृत्ती आम्हाला संपवायची आहे. तुम्ही आम्हाला संपवायला निघालात. आम्हाला भाजपाला राजकीय खांदा द्यायचा आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवाजी पार्क येथे परंपरेप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिकांची उपस्थिती होती. सुमारे सव्वा तासाहून अधिक वेळ झालेल्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढिवला. सध्याची भाजपा आम्हाला मान्य नाही. आमच्यावर जे चालून आले त्यांना सोडणार नाही. अर्जुनाला कृष्णाने सल्ला दिला तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शत्रूला ठेचण्याचा सल्ला दिल आहे, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
बिल्डरांची झोळी भरणारे निर्णय रद्द करणार
बिल्डरांची झोळी भरणारे आणि राज्याच्या मुळावर येणारे निर्णय आमचे सरकार आल्यानंतर रद्द करू. यामध्ये जे सहभागी असतील त्यांना तुरंगात टाकू, असा इशारा देत ठाकरे म्हणले, मुंबई महापालिका आयुक्तांना आमचे आवाहन आहे की, तुम्ही ३ लाख कोटी कुणासाठी खर्च केले याचा हिशोब दिला पाहिजे. धारावीच्या माध्यमातून लूट सुरू आहे. चंद्रपूरची शाळा, खाणी दिल्या, मुंबईतल्या जागा दिल्या. आम्हाला मुंबई अदाणीने दिलेली नाही. आम्ही अदाणीच्या हातात महाराष्ट्रातील भगिनींचे मंगळसूत्र कदापि देणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंतन करावे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्षे झाली. संघांचे कार्यकर्ते आणि संघप्रमुख भागवत यांच्याबद्दल आदर आहे. मात्र तुम्ही सांगत आहात हिंदूनो तुम्ही स्वसंरक्षणासाठी एकत्र या. दहा वर्षे झाली तुमचे सरकार सत्तेत आहे आणि तुम्ही हिंदूंचे रक्षण करू शकत नाही तर कशाला पाहिजेत मोदी, असा सवाल ठाकरे यांनी केला.
ज्या शिवसेनाप्रमुखांनी अडचणीच्या काळात तुम्हाला साथ दिली त्यांच्या मुलाला तुम्ही सत्तेतून खाली खेचले. त्या शकुनीमामाला तुम्ही साथ दिली. सध्याचा भाजप हायब्रीड झाला आहे. परदेशी वळूंची बीजे गर्भाशयात टाकतात तसे भाजप झाले आहे. तुम्ही सगळे भ्रष्टाचारी, गद्दारांना उरावर घेवून सरकार चालवताय. आरएसएसने चिंतन शिबिर घेतले पाहिजे. अडवाणींच्या काळातला भाजप चांगला होता. आताचा भाजप हायब्रीड आहे. गद्दारांचा , चोरांना नेता मानून राज्य करावयाला लागते यातच तुमचा पराभव आहे, असा हल्लाबोलही ठाकरे यांनी भाजपवर केला. यावेळी खा. संजय राऊत, शिवसेना उपनेते प्रा. सुषमा अंधारे, युवा सेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांची भाषणे झाली.