नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीतपासून ते माजी दिग्गज नेते अनिल विजपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची हरियाणाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. (Haryana)
शाह निरीक्षक म्हणून राज्याला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत परतला आहे. १६ ऑक्टोबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात नेता निवडीची जबाबदारी शाह आणि यादव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत, विज आणि सैनी यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पाहून, भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री निवडण्याचे काम शाह यांच्याकडे सोपवले आहे. जेणेकरुन विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करताना कोणताही वाद होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही गटबाजीशिवाय पूर्ण करता येईल.
मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १२ मार्च रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि तरुण चुग यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायबसिंग सैनी यांची निवड झाल्यानंतर विज संतप्त झाले आणि त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. विज हे सैनी यांच्या मंत्रिमंडळाचा भागही बनले नाहीत. तशी परिस्थिती या वेळी उद्भवू नये, यासाठी पक्षश्रेष्ठींनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. (Haryana)
आरती राव यांचा दावा
राव इंद्रजीत यांची कन्या आरती राव अटेली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. एवढेच नाही तर राव इंद्रजीत यांच्या कोट्यातील सर्व आमदार विजयी झाले आहेत. राव इंद्रजीत अहिरवार पट्टा आणि दक्षिण हरियाणाच्या मदतीने मुख्यमंत्रिपदासाठी आपला दावा कायम ठेवला आहे. हरियाणात भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यात अहिरवार पट्टय़ाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेवाडी, महेंद्रगड आणि गुरुग्राम जिल्ह्यात पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. राव इंद्रजित यांना नऊ आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय यादव समाजानेही भाजपला मतदान केले आहे.
हेही वाचा :