सूर्यकांत पाटणकर
सातारा : कोयना परिसरात ११ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या भूकंपामुळे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे कुतूहल वाढवले आहे. भूकंप आणि भूस्खलन यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार देशाच्या जीडीपीच्या दोन टक्के खर्च हा या आपत्तींवर होतो. त्यामुळे भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने कोयना धरणापासून दहा किलोमीटरवर कोयना-वारणा खोऱ्यात सहा किलोमीटर खोल खड्डा खोदून भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी मोहीम राबवली आहे. हे काम गेल्या तीन वर्षांपासून चालू असून यामध्ये अनेक भूगर्भ वैज्ञानिकांची टीम अहोरात्र कार्यरत आहे. या मोहिमेत ५० जणांचा सहभाग आहे. (Koyna Dam)
भूकंप आणि भूस्खलन यासाठी कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. कोयना धरण परिसरात १९६७ साली झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. त्यामुळे या परिसराची निवड विज्ञान मंत्रालयाने केली आहे. याच परिसरात १९६२ साली कोयना हायड्रो प्रोजेक्ट हा जलविद्युत प्रकल्प कोयना धरणावर उभारला आहे.१९६२ पासून अनेक भूकंप या क्षेत्रामध्ये झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात सहा किलोमीटर अंतरावर खड्डा खोदून भूकंप होण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
यापूर्वी चीन, रशिया, अमेरिका या देशांनी अशा प्रकारे भूकंप आणि भूस्खलन यांचे कारण शोधण्यासाठी पृथ्वीच्या पोटात संशोधन केले आहे. भूकंप आणि भूस्खलन या आपत्ती केव्हा येतील व त्या किती मोठ्या प्रमाणात असतील याचे पूर्वानुमान लावता येत नाही. परिणामी ज्याठिकाणी भूकंप व भूस्खलन होते, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित वित्त हानी होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बाजूला ३०५१ फूट (९३० मीटर) उंच डोंगर आहे. जिथे खूप मोठ्या प्रमाणात वारे वाहते व खूप घनदाट जंगल आहे, तसेच पवन ऊर्जा प्रकल्प आहे. अशा कोयना धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोयना-वारणा खोऱ्यात सध्या भूकंप कशामुळे होतो याचा अभ्यास पृथ्वी विज्ञान मंत्रालय करीत आहे. सध्या पृथ्वीच्या पोटातील हा खड्डा सहा किलोमीटर खोल असून ०.४५ मीटर रुंद आहे. सध्या येथील भूकंप संशोधनाचे काम तीन किलोमीटर पृथ्वीच्या पोटात पूर्ण झाले असून अजून तीन किलोमीटरचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले. (Koyna Dam)
१ लाख २१ हजार ७०१ भूकंपांची नोंद
महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ असलेल्या कोयना धरणामुळे राज्याचा वीज आणि पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र याच कोयना परिसराला १९६३ पासून ९ डिसेंबर २०२४ पर्यंत आतापर्यंत १ लाख २१ हजार ७०१ भूकंपाचे धक्के बसले आहेत. यातील १६८ धक्के हे तीन ते चार रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. भूकंपाने इथल्या अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. अद्यापही भूकंपाची टांगती तलवार प्रकल्पग्रस्तांच्या डोक्यावर आहे. ११ डिसेंबर १९६७ नंतर ५७ वर्षांत अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.
हेही वाचा :