नवी दिल्ली : रशियासाठी युक्रेन युद्धात लढताना केरळमधील एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने पावल उचलली आहेत. सध्या तेथे अशा पद्धतीने काम करणाऱ्या उर्वरित सर्व भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मॉस्कोमधील रशियन अधिकारी आणि नवी दिल्लीतील रशियन दूतावासाकडे तशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.(Ukraine Russia War)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. केरळमधील तरुणाच्या युद्धाच्या ठिकाणी झालेल्या मृत्यूची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
‘आम्हाला केरळमधील एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल समजले. त्याला रशियन सैन्यात सेवा देण्यासाठी भरती करण्यात आले होते. केरळमधील आणखी एक भारतीय नागरिक जखमी झाला आहे. त्यालाही अशाच प्रकारे भरती करण्यात आले होते. त्याच्यावर मॉस्को येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ असे जयस्वाल म्हणाले.(Ukraine Russia War)
मॉस्कोमधील भारताचा दूतावास कुटुंबांच्याही संपर्कात आहे आणि शक्य ती सर्व मदत केली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मृत व्यक्तीच्या कुटुंबाप्रति मनापासून शोक व्यक्त करताना, जयस्वाल म्हणाले, ‘आम्ही या तरुणाचे पार्थिव भारतात लवकरात लवकर आणण्यासाठी काम करत आहोत. जखमी व्यक्तीला लवकर डिस्चार्ज देऊन त्याला भारतात परत पाठवण्याची मागणीही केली आहे.’
रशियन-युक्रेन युद्धात रशियाकडून लढताना केरळमधील बिनिल टीबी (३२) या तरुणाचा मृत्यू झाला. तर जैन टी. के. (२७) गंभीर जखमी झाला आहे. दोघेही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी आहेत. युद्धभूमीवर आम्ही थकून गेलो आहोत, आम्हाला पुढच्या फळीत लढायला सांगण्यात येते. आम्हाला परत भारतात पाठवण्यासाठी आम्ही भारतीय दूतावासाकडे अनेकदा विनंती केल्याचा दावा बिनिलने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या व्हॉइस मेसेज केला होता, असेही इंडियन एक्स्प्रेसने सोमवारी म्हटले होते.(Ukraine Russia War)
बिनीलच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी, ड्रोनच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांना त्याच्याशी संपर्क साधता आला नव्हता. सोमवारी इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने रशियात अडकलेल्या अशा तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे स्पष्ट होत आहे.(Ukraine Russia War)
आधीही एका भारतीयाचा मृत्यू
नोकरीच्या नावाखाली लष्करी सपोर्ट स्टाफ म्हणून भारतातील तरुणांना रशियात भरती करून घेतले गेले. भरती झाल्यानंतर रशियन सैन्यासाठी लढताना या आधी केरळमधील एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ड्रोन हल्ल्यात ही घटना घडली. संदीप असे मृताचे नाव आहे. तो मूळचा त्रिशूरचा रहिवासी होता.