कोल्हापूर : प्रतिनिधी : सोमवारी (दि.२५) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील सौदे शेतकऱ्यांनी दर कमी मिळू लागल्याने बंद पाडले. परिणामी, बाजार समितीत ५० हजार गूळ रवे पडून राहिले आहेत. दरम्यान, सभापती प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटकातून आवक होणाऱ्या गुळाचा स्वतंत्र सौदा काढावा, सौद्यात गुळाला ३,८०० रुपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास त्या गुळाचा सौदा रद्द करावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्यापासून नियमित सौदे काढण्याचेही या बैठकीत ठरले.
गूळ हंगाम सुरू होऊन ५२ दिवस झाले आहेत. दीवाळीपूर्वी गुळाला ४ हजार ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. पाडव्याच्या सौद्यामध्ये कमाल ४,३०० रुपये ते कमाल ५,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुळाचे उत्पादन सुरू झाले. मात्र, दीवाळीनंतर गुळाचे दर हळूहळू कमी होऊ लागले. सोमवारी काढण्यात आलेल्या गूळ सौद्यामध्ये ३,५०० ते ३,६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यामुळे उत्पादक शेतकरी संतप्त झाले. त्यांनी एकत्र येत सौदे थांबवले. जोपर्यंत ३,८०० रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे दर मिळत नाही तोपर्यंत सौदा काढायचा नाही, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला.