मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शनिवारी मुलाला जन्म दिला. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिता बनल्याची बातमी जगाला सांगितली. रोहित व रितिकाचे हे दुसरे अपत्य असून त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, पत्नीच्या प्रसुतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ येथील खेळण्याबाबत अनिश्चितता होती. आता तो पहिल्या कसोटीपूर्वी संघात रूजू होईल का, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Rohit Sharma)
कव्हर स्टोरी
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांच्या संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आला आहे. (Electronic Media Monitoring Center)
मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून या कक्षाव्दारे होणार आहे. वाहिन्यांवरील महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवी, आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही असे म्हणत त्यांनी थेट इशाराच महायुती सरकारला दिला आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. (Jayant Patil)
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ, फोटो विरोधकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. सभेला मिळालेल्या अल्प प्रतिसादावर
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली. मुंबईतील मोदींच्या सभेतील उपस्थितीवरून हे स्पष्ट झाले की, आमचे येथील लोकंही आमची आणि इथे आवाजही आमचाच… जय महाराष्ट्र !!!,असे पाटील यांनी नमूद केले आहे (Jayant Patil)
कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी युद्धपातळीवर कार्यरत होते. गांधी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. प्रियांका गांधीच्या सभेच्या माध्यमातून काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. (Priyanka Gandhi)
केरळमधील वायनाड येथून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवत आहेत. बुधवारी या मतदारसंघात मतदान झाले. मतदान आटोपून प्रियांका गांधी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. शनिवारी कोल्हापुरात दुपारी एक वाजता गांधी यांची सभा होणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सभामंडपस्थळाची पाहणी करुन प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
सभेला राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस पाच जागा लढवत आहे. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतून आमदार राजूबाबा आवळे, शिरोळमधून गणपतराव पाटील, करवीरमधून राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर हे उमेदवार आहेत. प्रियांका गांधी यांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी केली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसबद्दल देशभर उत्सुकता वाढली आहे. जनतेचा पक्षावरचा विश्वास वाढला आहे. प्रियांका गांधीही काँग्रेस पक्ष जगला पाहिजे, वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. नेतृत्व दोन पावले चालते तेव्हा कार्यकर्ते दहा पावले चालतात. प्रियांका गांधी यांच्या सभेने कार्यकर्त्यांना दहा हत्तीचे बळ मिळणार आहे.
-आमदार सतेज पाटील
रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज दिली. (Narendra Modi)
मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्याच्या अगोदर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आणि भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या समर्पणाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉमिनिका गयाना येथील इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेत मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, ‘डॉमिनिका पुरस्कार ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नवी दिल्लीः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटरद्वारे जारी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना जाहिरातींद्वारे दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवणे हा आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली, कायदा संस्था आणि उद्योग संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने निर्णय घेतला आहे, की कोचिंग सेंटर्सने जारी केलेल्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ शकेल असे कोणतेही दावे नसावेत. आता या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सर्व कोचिंग सेंटरसाठी अनिवार्य असेल. कोणत्याही कोचिंग सेंटरने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ऑफर केलेले अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, विद्याशाखा पात्रता, फी आणि परतावा धोरणे, निवड दर, यशोगाथा, परीक्षा क्रमवारी आणि नोकरी सुरक्षा आश्वासने यांचा त्यात समावेश आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हमखास प्रवेश किंवा पदोन्नतीसंदर्भातील अशा सर्व जाहिरातींवर आता बंदी घालण्यात आली आहे. कोचिंग संस्थांनी गुणवत्तेची अतिशयोक्ती न करता त्यांच्या पायाभूत सुविधा, संसाधने आणि सुविधांचे अचूक वर्णन केले पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय, कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांचे नाव, फोटो किंवा त्यांना मिळालेले कोणतेही प्रमाणपत्र जाहिरातीत वापरू शकत नाही आणि विद्यार्थ्याची कोणत्याही परीक्षेत निवड झाल्यानंतर ही संमती घेतली जाईल. प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारच्या दबावापासून संरक्षण करणे, हाही त्याचा उद्देश आहे.
कोचिंग सेंटर्सना जाहिरातीत विद्यार्थ्याच्या छायाचित्रासह नाव, रँक आणि कोर्स अशी महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. त्या अभ्यासक्रमासाठी यशस्वी विद्यार्थ्याने किती फी भरली हेदेखील नमूद करावे लागेल. फाइन प्रिंटमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही, याची खात्री करण्यासाठी ही सर्व माहिती मोठ्या अक्षरात द्यावी लागेल. जागांची कमतरता, वेळ कमी, आजच प्रवेश घ्या अशा जाहिरातींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोचिंग सेंटर्स अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी पूर्ण पारदर्शकता ठेवतील.
ज्यात कमी जागा किंवा कमी वेळ सांगून विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. कोचिंग सेंटर्सना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी जोडावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल माहिती देणे किंवा तक्रारी नोंदवणे सोपे होईल. कोणत्याही कोचिंग सेंटरने या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या तरतुदींनुसार त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. केंद्रीय प्राधिकरणास दंड आकारणे, जबाबदारी सुनिश्चित करणे आणि अशा फसव्या पद्धतींच्या घटना रोखणे यासह गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार असतील. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश विद्यार्थ्यांचे शोषण रोखणे आणि खोटी आश्वासने आणि खोट्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही किंवा कोचिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जाणार नाही, याची खात्री करणे हा आहे.
कोचिंग संस्थांना ५५ लाखांचा दंड
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटर्सच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर स्वतःहून कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत वेगवेगळ्या कोचिंग सेंटर्सना ४५ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर १८ कोचिंग संस्थांना ५४ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशाची लोकसंख्या १४५ कोटी ५५ लाख ९१ हजार ९५ होती. एप्रिल २०२३ अखेर भारताची लोकसंख्या १४२ कोटी ५७ लाख ७५ हजार ८५० होती. तथापि, एका अभ्यासानुसार भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सातत्याने कमी होत आहे. १९५० मध्ये प्रजनन दर ६.२ होता, तो २०२१ मध्ये दोन टक्क्यांवर आला.
प्रजनन दर असाच राहिला, तर २०५० पर्यंत तो १.३ पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानुसार देशाची लोकसंख्या २०५४ मध्ये १.६९ अब्जापर्यंत पोहोचू शकते आणि २१०० मध्ये ती केवळ १.५ अब्ज इतकी कमी होईल. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, प्रजननक्षमतेशी संबंधित अनेक आव्हाने जगभर समोर येत आहेत. याचे कारण हवामानातील बदल आणि खाण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांनी केलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले, की गर्भधारणा हे एक मोठे आव्हान बनत आहे. बालमृत्यूचा धोकाही वाढू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
कमी मुले जन्माला आली, तर देशाची लोकसंख्या कमी होईल आणि याचा फायदा होईल, असा विचार बहुतांश लोक करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु प्रजनन दर कमी असल्याने अनेक तोटे आहेत. मुले नसतील तर देशाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. एका संशोधनात महिलांची प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे देश आणि समाजावर होणारे परिणाम दिसून आले. त्यानुसार प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे आजूबाजूला लहान मुलांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त आहे. यामुळे श्रमशक्ती कमी होईल, जी कोणत्याही देशासाठी चांगली नाही.
महिलांचे सरासरी आयुर्मान वाढणार
‘सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालानुसार प्रजनन दर कमी झाल्यामुळे महिलांचे सरासरी वय वाढेल. त्याचा थेट फायदा महिलांना होईल. त्यामुळे त्यांचे आयुर्मान वाढेल. संशोधनानुसार, एका मुलाला जन्म देणाऱ्या महिला त्याहून अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलांपेक्षा सरासरी ६ वर्षे जास्त जगतात.
चांदीपूर; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर येथून एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी केली. मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचरद्वारे ओडिशाच्या किनारपट्टीवर ही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत नौदलात सुमारे २०० स्वदेशी लांब पल्ल्याच्या अटॅक क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश करू शकतो. अशा परिस्थितीत,‘डीआरडीओ’ने त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी सुमारे २० अतिरिक्त चाचणी उड्डाणांची योजना आखली आहे. त्यात स्वदेशी रेडिओ-फ्रिक्वेंसीद्वारे टर्मिनल होमिंगचादेखील समावेश आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रडार हे लाँग रेंज अटॅक क्रूझ क्षेपणास्त्र एक मिशन मोड प्रकल्प आहे. तो ‘डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिल’ने ‘ॲक्सेप्टन्स ऑफ रिक्वायरमेंट’अंतर्गत मंजूर केला आहे. समुद्रात मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाच्या विशेषत: नौदलाच्या सामर्थ्याला जबरदस्त चालना देईल. या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी, ’आयटीआर’ द्वारे रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि टेलीमेट्रीसारखे अनेक रेंज सेन्सर वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित केले गेले.
लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची दोनशेची ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. त्याची किंमत अंदाजे पाच हजार कोटी रुपये आहे. भारताच्या या स्वदेशी क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राशी केली जात आहे. अमेरिकेचे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र हे एक अचूक शस्त्र आहे जे जहाज, पाणबुडी आणि जमिनीवरून सोडले जाऊ शकते. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेले भारताचे ‘लाँग रेंज लँड ॲटॅक क्रूझ मिसाइल’ हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. ते शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे.
ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगवान
हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करू शकते. त्यामुळे ते शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला चकमा देऊ शकते. त्याचे आक्रमण अंतर खूप जास्त आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या लक्ष्यांना सहजपणे लक्ष्य करू शकते. यात एक प्रगत मार्गदर्शन प्रणाली आहे, जी अचूकतेने लक्ष्य गाठण्यास मदत करते.
देवघर; वृत्तसंस्था : अन्न, बेटी आणि मातीची सुरक्षा हा या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप एनडीए सरकार रोटी, बेटी आणि झारखंडच्या मातीशी खेळू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे दिला. पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर आहेत. ते देवघर येथे प्रचार सभेत बोलत होते.
ते म्हणाले, की अवघ्या दोन दिवसांनी आम्ही धरती आबा, बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी करणार आहोत. धरती आबांची जयंती भारताच्या कानाकोपऱ्यात साजरी होणार आहे. लोकशाहीच्या पहिल्या उत्सवात तुम्ही सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. सर्वत्र एकच गुंजन आहे, ‘रोटी, बेटी और माती की हाक, झारखंडमध्ये भाजप-एनडीए सरकार.’ मोदी म्हणाले, की मी एक व्हिडीओ पाहिला. तिथे स्थानिक रहिवाशांना पाणी मिळणेदेखील कठीण झाले आहे. सीता सोरेन यांचे नाव घेत ते म्हणाले, की काँग्रेस सीता सोरेनला शिव्या देते. काँग्रेस आदिवासी मुलींचा अपमान करते.
द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती; पण काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती वापरली, अशी टीका करून मोदी म्हणाले, की मी झारखंडमध्ये याआधी जिथे जिथे गेलो आहे, तिथे परकीयांच्या घुसखोरीची सर्वात मोठी चिंता आहे. झारखंडी अभिमान, झारखंडी ओळख ही तुम्हा सर्वांची ताकद आहे. मी अभिमानाने सांगतो, की मी झारखंडी आहे. ही ओळख हरवली तर काय होईल याची कल्पना करा. सांथाल प्रदेशातील आदिवासींची संख्या जवळपास निम्मी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आदिवासींची संख्या अशीच कमी होत राहिली तर काय होईल. तुमची पाणी, जंगल जमीन, सर्व काही दुसऱ्यांच्या ताब्यात जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.
या परिस्थितीतून आदिवासी कुटुंबांना वाचवायचे आहे आणि झारखंडलाही वाचवायचे आहे. आज झारखंडची ओळख बदलण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. घुसखोरांना कायमचे रहिवासी बनवण्यासाठी प्रत्येक चुकीचे काम केले गेले, अशी टीका त्यांनी केली.
घुसखोरांना अभय
झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या राजवटीत बाहेरून आलेल्या घुसखोरांना कायमस्वरूपी रहिवासी बनवण्यासाठी चुकीचे काम करण्यात आले आहे. यासाठी रात्रभर ठोस कागदपत्रे तयार करण्यात आली. आदिवासी मुलींची लग्नाच्या नावाखाली फसवणूक होते. या घुसखोरांनी तुमचा रोजगार आणि रोटी हिरावून घेतली. यावर येथील सरकारने येथे कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले, असा आरोप मोदी यांनी केला.
प्रयागराज; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र मागितल्याने गदारोळ झाला. संतप्त स्पर्धक विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. ओळखपत्र विचारण्यास हरकत घेतली. या वेळी पोलिस आणि स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ही घटना टीबी सप्रू रोडवरील चौकाचौकात गेट क्रमांक २ समोर घडली. तेथे तैनात असलेले पोलिस विद्यार्थ्यांकडून ओळखपत्र मागत होते. याची माहिती मिळताच स्पर्धक विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिकार केला.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते निषेधाच्या ठिकाणी कोणत्याही संशयितांना अटक करण्यासाठी तपास करत आहेत. सोमवारपासून ‘यूपीपीएससी’ बाहेर स्पर्धक विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा निषेध परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या निर्णयाविरुद्ध आहे. आयोगाच्या या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष असून या दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांच्या परीक्षा पद्धतीमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे ४८ तास आयोगाबाहेर उभे राहिलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, दोन दिवसांच्या परीक्षेमुळे परीक्षेच्या निकालात तफावत असू शकते आणि सामान्यीकरण प्रक्रियेत तफावत निर्माण होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होणार नाही.
स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी परीक्षेत सामान्यीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करत आहेत. ही प्रक्रिया त्यांना योग्य परिणामांपासून वंचित ठेवू शकते, असा त्यांचा आरोप आहे. प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतात आणि अडचणीची पातळी वेगवेगळी असते. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी अवघड प्रश्नपत्रिका सोडवली आहे, अशा विद्यार्थ्यांना सामान्यीकरण प्रक्रियेचे नुकसान होऊ शकते. सर्व स्पर्धकांना एकच प्रश्नपत्रिका असावी आणि कोणताही भेदभाव होऊ नये यासाठी परीक्षा एकाच दिवशी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.
आयोग निर्णयावर ठाम
विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि हरकती लक्षात घेऊन ‘यूपीपीएससी’च्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सध्या दोन दिवसांच्या परीक्षेचा निर्णय तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश परीक्षा अध्यादेशांतर्गत केंद्र निश्चित करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्र उपलब्ध न झाल्यामुळे दोन दिवसीय परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.