पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. आधीच हे रुग्णालय तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. त्यातच रूग्णालयाविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणाची चौकशी पोलिस आयुक्त आणि मेडिकल कौन्सिलने करावी आणि योग्य ती कारवाई करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.(Complaint against ‘Dinanath’)
सविता भिसे यांची तक्रार
तनिषा यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने अंतर्गत चौकशी केली. तिचा अहवाल रुग्णालयाने सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक केली. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली. याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. पुणे पोलिस आयुक्त, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला कारवाईचे आदेशही आयोगाने दिले आहेत. (Complaint against ‘Dinanath’)
तनिषा भिसेंच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असतानाच आता रुग्णालयाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. कारण आता या प्रकरणात खुद्द महिला आयोगानेही उडी घेतली आहे.
महिला आयोगाकडून चौकशीचे आदेश
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. पोस्टमध्ये त्यांनी “पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केली. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना यावर तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तत्काळ सादर करण्यास सांगितले आहे.” (Complaint against ‘Dinanath’)
तनिषा भिसेंबाबत काय घडलं?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसे प्रकरणात हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. रुग्णालयाने भिसे कुटुंबाकडे उपचारांआधीच १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली. ही रक्कम लवकर भरता आली नाही. त्यामुळे रुग्णालयाने उपचारांना उशीर केला. वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणानंतर रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे.
रूग्णालय दोषी
तनिषा भिसे प्रकरणात आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. यात रुग्णालय प्रशासन दोषी आढळले आहे. भिसे कुटुंबाकडे अनामत रकमेची मागणी करणाऱ्या मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणावर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर म्हणाले, “त्या दिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला की डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाख डिपॉझिट लिहिले. ही गोष्ट खरी आहे.”
हेही वाचा :
‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?
२६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?