कोल्हापूर; प्रतिनिधी : भारतीय पारंपरिक वेशभूषेची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे. निमित्त आहे शाही दसरा महोत्सवाचे. (Kolhapur Shahi Dasra)
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षीही उत्साहात साजरा होणार आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यात शिव व शाहूकालीन दुर्मिळ पत्रसंग्रह प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांची बाईक रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, बँड वादन, निबंध आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दसरा महोत्सवाची माहिती दिली. शुक्रवारी, दि. ४ रोजी पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. (Kolhapur Shahi Dasra)
प्रात्यक्षिकांचा व्हिडिओही देणार
भारतीय आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेत कोल्हापुरी फेटा, अंगरखा, धोतर अशा वेशभूषेला महत्त्व आहे. पण कोल्हापुरी फेटा बांधणे आणि धोतर नेसणे ही कला फार कमी लोकांना येते. फेटा बांधायला आणि धोतर नेसायला यावे यासाठी पारंपरिक वेशभूषा दिवशी सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी फेटा बांधणाऱ्या आणि धोतर नेसण्याची कला असणाऱ्या लोकांना आमंत्रित केले आहे. तसेच धोतर बांधणे आणि कोल्हापूर फेटा बांधण्याच्या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओही बनवले आहेत. ते शाळा आणि सरकारी कार्यालयात देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा :