कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरना अटक करा, अशी जोरदार मागणी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) करण्यात आली. या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिवाजी चौकात निदर्शने केली. खासदार शाहू छत्रपती यांची आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती. कोरटकरना पाच मार्चपर्यंत अटक करा अन्यथा सहा मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारु, असा इशाराही शिवप्रेमींनी यावेळी दिला.(Agitation against Koratkar)
इतिहास संशोधक सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो पोलीस ठाण्यात जमा केला आहे. कोरटकरना अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पथक नागपूरमध्ये त्याचा शोध घेत आहे. कोरटकरवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून होत आहे. (Agitation against Koratkar)
कोरटकरने सावंत यांना धमकी दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. कोरटकरनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवप्रेमींत संतापाची लाट उसळली. गुरुवारी शिवाजी चौकात खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती यांनी या कृत्याचा निषेध केला. प्रशांत कोरटकरना अटक करुन त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कोरटकरना पोलीस संरक्षण असताना ते नागपूरमधून कसे गायब होतात, असा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात अडवून जाब विचारला जाईल, असा इशाराही दिला आहे. निदर्शनात विजय देवणे, व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, विक्रम जरग, दत्ता टिपुगडे, तौफिक मुल्लाणी, सतीश कांबळे, दुर्वास कदम, रियाज जमादार, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Agitation against Koratkar)
इंद्रजीत सावंत यांनी पोलिस ठाण्यात जमा केला मोबाईल
इंद्रजीत सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो मोबाईल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जमा केला. कोरटकरनी सावंत यांना ज्या भाषेत धमकी दिली त्याबाबतचा जबाबही पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला. सावंत यांच्यासह विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनी तपासाची माहिती घेतली. कोरटकरना अटक करा अन्यथा तो पुरावे नष्ट करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी मागणी हर्षल सुर्वे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. (Agitation against Koratkar)
कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात
पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक नागपूर येथे पोचले आहे. त्यांनी प्रशांत कोरटकरांचा शोध घेतला. त्यांचे शेवटचे लोकेशन दीक्षाभूमीजवळ मिळाले होते, पण त्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ झाला आहे. कोरटकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरांचे नातेवाईक आणि मित्रांकडे त्यांची माहिती घेतली. कोरटकर मध्यप्रदेशात पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :