कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप व्यक्त करत ॲड. अमितकुमार भाेसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांनी धावून जात हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत भोसले यांच्यावर झडप घातली. कोरटकरची सुटका केली. भर कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.(Attack on Koratkar)
सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. कोरटकरविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीही त्याला कोल्हापुरी चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. संतापाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी लवकर कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. (Attack on Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करायचे होते. त्यामुळे सकाळी आठलाच पोलिस त्याला घेऊन आले होते. कोर्टात त्याला उभे केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पोलिस त्याला परत पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. कँटीनच्या पॅसेजमधून घेऊन जात असताना ॲड. भोसले यांनी कोरटकरला उद्देशून ‘तू शिवरायांचा अपमान करतोस काय,’ असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी भोसले यांच्यावर झडप घातली आणि त्यांना बाजूला नेले. त्यांना ताब्यात घेतले.(Attack on Koratkar)
पोलिसांची दक्षता
तीन दिवसांपूर्वी कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळीही कोर्टाच्या आवारात त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न आजही होईल, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. पोलिसांनी कोरटकरला कोर्टाच्या आवारात आणण्याआधीच जयदीप शेळके यांना ताब्यात घेतले. शेळके यांनी परवा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
म्यानमार, थायलंडला शक्तीशाली भूकंपाचे धक्के
इंद्रजीत सावंत
कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केला. शिव-शंभू, फुले, आंबेडकर सन्मान परिषदेत सावंत यांचा अभिनेते किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते बहुजन नायक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सावंत बोलत होते. हिंदू बहुजन महासंघाने परिषदेचे आयोजन केले होते.(Sanman Parishad)
इतिहास अभ्यासक सावंत यांनी कोल्हापूरची लाल माती, पंचगंगेचे पाणी आणि छत्रपती शिवराय, शंभूराजे, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांच्या ताकदीमुळे कोरटकरसारख्या प्रवृत्तीला निडरपणाने तोंड देण्याची ताकद मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांविषयी कोरटकरच्या विखारी वक्तव्यामुळे मी अस्वस्थ होऊन सोशल मिडियावर पोस्ट केली. त्यानंतर झोपलेला बहुजन समाज जागा झाला. शिवरायांचे रक्त अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती मिळाली. (Sanman Parishad)
गेल्या दहा वर्षात सत्य बोलायचे किंवा धाडसाने बोलायचे नाही अशी रचना राजकर्त्यांकडून नियोजनपूर्वक केली जात आहे. सत्य बोलणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना संपवून टाकले. त्यांचे मारेकरीही अजून सापडत नाहीत याकडे इतिहास अभ्यासक सावंत यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. भीती घालण्याचे काम सनातनी मंडळी पूर्वीपासून करत आहेत. पण आपण त्यांना भ्यायचे नाही. त्यांच्यासमोर शड्डू ठोकून उभे रहायचे. आपण शड्डू ठोकून उभे राहिलो तर कोरटकरसारख्या मंडळींना हैद्राबाद, चेन्नईला पळावे लागते. निडरपणे उभे राहिलो तर समाजही आपल्या बाजूने राहतो.
कोरटकर प्रकरणामुळे निडरतेची ताकद नाशिकपासून नागपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे, असे सांगून सावंत म्हणाले, आपण सर्वांनी आता व्यक्त झाले पाहिजे. आपण व्यक्त झालो तर या प्रतिगामी ताकदीशी मुकाबला करु. त्यासाठी खरा इतिहास लोकांसमोर सांगण्याचे काम अखंडपणे करु, असेही ते म्हणाले. (Sanman Parishad)
‘छावा’ चित्रपटातील खोटा इतिहास उघड केला
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मला ‘छावा’ चित्रपट पाहायला सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संभाजीराजेंचा खरा इतिहास त्यांनी माझी मुलाखत घेऊन जाणून घेतला. ‘छावा’ चित्रपटात खोटा इतिहास दाखवला आहे. त्या चित्रपटात शिर्केंना खलनायक दाखवले आहे, पण संभाजीराजेंना पकडून देणारा खरा इतिहास मी सांगितला. त्याचे अस्सल संदर्भ सांगितले. नाटक, सिनेमा, कांदबऱ्यांतून संभाजीराजेंना कसे बदनाम केले हे सांगितले. त्यामुळे अनेक प्रतिगामी दुखावले गेले आणि त्यातून कोरटकरचे विखारी वक्तव्य बाहेर आले, असेही सावंत यांनी सांगितले.
चित्रपटांत खोटे पत्ते घालण्याचे काम : किरण माने
अभिनेते किरण माने यांनी विशिष्ट प्रवृत्ती चित्रपटातून छुपा प्रचार करत असून त्यातून बहुजन समाजाची माथी भडकावली जात आहेत. चित्रपटात खोटे पत्ते घालण्याचे काम केले जात आहे. चित्रपट खरा नसतो. अशावेळी सत्य सांगणारी माणसे खूप कमी आहेत. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या सत्य सांगणाऱ्या माणसांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे सांगितले. (Sanman Parishad)
विखुरलेला समाज एकसंध करूया : चोरमारे
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, राष्ट्रपुरुषांनी महाराष्ट्र घडवण्याचे मोठे काम केले. पण आता हे राष्ट्रपुरुष विविध समाजात विभागले गेल्याने समाज विखुरला आहे. विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याची सुरुवात राजर्षी शाहूंच्या समतानगरीतून झाली पाहिजे. सत्ताधारी मंडळी सरकारला अडचणीत येणारे विषय येऊ नयेत म्हणून वेगवेगळे विषय आणत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलावे, अशी मागणी पुढे येत आहे. भाजपमध्चे गेलेले नवहिंदुत्ववादी महाडिक, नरके, माने, यड्रावकर ही मंडळी कुणाच्या तरी नादाला लागून ही मागणी रेटत आहेत. ज्या शिवाजी विद्यापीठात शिकले त्यातील छत्रपतींचे नाव काढण्याच्या षड्.यंत्रात सहभागी होत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारची नाचक्की झाली, त्यावरून लक्ष वळवण्यासाठी अबू आझमीला उठवून बसवले आणि औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सत्ताधा-यांनी पुढे आणला. हे राजकारण समजून घेतले पाहिजे. पुरोगामी कोल्हापुरात वारंवार दंगली घडवून इथले वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. दंगलीनंतर सद्भावना मिरवणूक काढून इथल्या लोकांची जबाबदारी संपत नाही. धार्मिक दंगलीच्या काळात मराठा समाजासह बहुजन समाजाने मुस्लिम समाजाची ढाल बनून उभे राहिले पाहिजे.
कीर्तनकार नितिन पिसाळ म्हणाले, महाराष्ट्रात ८५ टक्के बहुजन समाज आहे. त्यांच्या अनेक संघटना आहेत. या संघटनांनी स्वत:चा अहंकार सोडून प्रतिगामी विचारांना हरवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, संजय पटकारे, प्रविण पाटील, निलेश सुतार, शुभम शिरहट्टी, विश्वविक्रम कांबळे, सागर गवळी, प्रमोद पाटील, ओंकार नलवडे यांचा बहुजन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सरोजनी पाटील, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, शिवराजसिंह गायकवाड, धैयर्शिल घाटगे, संदीप देसाई, डॉ. डी.आर.भोसले, किरण पटवर्धन, शिवाजी खोत, पंडित केसरे, शिवाजी कांबळे, अरुण सावंत, डॉ. अनिल माने आदी उपस्थित होते. शिवप्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. हर्षल सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. संपतराव चव्हाण पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
कामरांवर जगभरातून धनवर्षाव!
कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.तट यांनी २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला. यावेळी कोरटकरच्या आवाजाचे शास्त्रीय नमुने घ्यावेत, अशी मागणी इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी न्यायालयाकडे केली.(Koratkar remanded PC)
एक महिन्यापूर्वी मध्यरात्री प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. यावेळी झालेल्या संभाषणात कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमात जिजाऊ यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. कोरकटरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Koratkar remanded PC)
जिल्हा व सत्र न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमवारी (२४ मार्च) कोल्हापूर पोलिसांनी तेलगंणातील मंचरियाल येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. रात्रभर प्रवास करुन मंगळवारी (२५ मार्च) सकाळी कोरटकरला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी करुन त्याला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोर्टात हजर करण्यात आले. (Koratkar remanded PC)
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी कोरटकर यापूर्वी कधीच पोलिसांसमोर हजर राहिलेला नाही. कोरटकरने मोबाईलमधील डेटा डिलिट केला आहे. त्याने असे का केले याचा तपास करावा लागणार आहे. आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत. आरोपी एक महिन्यानंतर पकडला गेला असल्याने त्याला या काळात कोणी मदत केली याचा तपास करण्याची गरज आहे. आरोपीने पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर केला. त्या वाहनांचे मालक कोण, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी विनंती केली. कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी ऑनलाईन युक्तिवाद केला. (Koratkar remanded PC)
इंद्रजीत सावंत आणि कोरटकर यांच्यात संवाद झाल्यावर सावंत यांनी पोलिस ठाण्यात न जाता रात्री सोशल मीडियावर पोस्ट केली. कोरटकर सकाळी मुलीला शाळेला सोडवायला गेले असता सावंत यांनी केलेल्या पोस्टची माहिती मिळाली. कोरटकरनी पोलिसांना सहकार्य केले आहे. उलट सोशल मीडियावर पोस्ट करुन वातावरण बिघडावल्याने सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा होता. कोरटकर यांनी आपला मोबाईलही पोलिसांकडे तपासासाठी दिला आहे. तसेच जामिनासाठी स्वत: न्यायालयात प्रयत्न करुन पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली होती. त्यामुळे पोलिस कोठडी न देता त्यांना जामीन द्यावा, अशी न्यायालयाला विनंती केली. (Koratkar remanded PC)
इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी युक्तिवाद केला. नवीन फौजदारी कायद्यानुसार आरोपीला अटक करण्यासाठी कारणे दयावी लागतात. प्रशांत कोरटकरने कधीही पोलिसांना सहकार्य केलेले नसल्याने तपासासाठी सात दिवसाची पोलिस कोठडीची मागणी केली.
असिम सरोदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरटकर हे पोलिसांना कधीच सहकार्य करत नव्हते तर ते फरार होते. ते वकीलांमार्फत कोर्टात जामिनासाठी अर्ज करत होते. पोलिस त्यांच्या घरी जात होते पण घराला कुलूप असायचे. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधता येत नव्हता. पोलिसांना अधिक तपास करण्यासाठी त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी विनंती केली. (Koratkar remanded PC)
पोलिसांनी कोरटकर यांच्या आवाजाच्या नमुन्याची शास्त्रीय पद्धतीने घ्यावी अशी मागणी सरोदे यांनी केले. आवाजाचा नमुना हा महत्वाचा पुरावा असल्याने स्वर, व्यंजन, वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर पोलिस ठाण्यासमोर सीसीटीव्ही फुटेज तपासावेत
कोल्हापूर पोलिसांनी तपास करताना चंद्रपूर पोलिस ठाण्यासमोरील सीसीटीव्ही तपासावेत, अशी मागणी वकील असिम सरोदे यांनी केली. प्रकाश कोरटकर पोलिस ठाण्यासमोर हॉटेलमध्ये दोन दिवस वास्तव्यास होता. त्याला कोण भेटत होते याची पोलिसांनी चौकशी करावी. पोलिस अधिकाऱ्यांनीही कोरकटरची भेट घेतली होती अशी माहिती पुढे आली आहे.
कोरटकरवर फेकले कोल्हापुरी चप्पल
दरम्यान, कोर्टाच्या आवारात संतप्त नागरिकांनी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या दिशेने एकाने कोल्हापुरी चप्पल फेकले. पोलिसांनी त्याच्याभोवती मजबूत कडे केले होते. त्यामुळे त्याला चप्पल लागले नाही.
हेही वाचा :
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळून मंगळवारी (२६ मार्च) सकाळी कोल्हापुरात आणले. त्याचा सहकारी परीक्षित यालाही अटक केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोरटकरला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान कोरकटरच्याविरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली आहे. शिवप्रेमींच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलिसांनी गनिमी काव्याने पोलिस स्टेशनच्या मागील दरवाजातून कोरटकरला न्यायालयात नेले. (Koratkar)
गेले महिन्याभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या तेलंगणातील मंचरियाल येथे मुसक्या आवळल्या. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी रात्रभर प्रवास करुन कोरटकला मंगळवारी सकाळी पावनेआठ वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरटकरला पोलिस ठाण्यात आणल्याचे कळताच शिवप्रेमी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर जमू लागले. (Koratkar)
कोर्टात नेताना पोलिसांकडून गनिमी कावा
जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून कोरटकरला न्यायालयात अकरा वाजण्याच्या सुमारास नेणार आहेत, अशी माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर भवानी मंडपात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोरटकरला कोल्हापुरी हिसका दाखवणार असा इशारा दिल्याने भवानी मंडपात मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. मिडियाचे प्रतिनिधीही हजर होते. पण पोलिसांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या मुख्य दरवाजातून कोरटकरला न्यायालयात न नेता मागील बाजूने इंदुमती गर्ल्स हायस्कूलच्या पाठीमागील दरवाजातून कोरटकरला न्यायालयात नेते. पोलिसांनी गनिमी कावा केल्याने शिवप्रेमींनी इंदुमती गर्ल्स हायस्कूलकडे धाव घेतली पण तो पर्यंत पोलिसांची वाहने न्यायालयाकडे रवाना झाली होती. (Koratkar)
चंद्रपूरमध्ये दोन दिवस मुक्काम
कोरटकरला कोल्हापूरला आणल्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्याच्याकडे चौकशी केली. न्यायालयाने त्याचा जामिन फेटाळल्यानंतर तो दोन दिवस चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये होता अशी माहिती पुढे आली. त्याची बडदास्त चंद्रपूरातील एका बुकीमालकाने केली होती. हॉटेलमध्ये त्याला काही अधिकारी भेटले असल्याची माहिती पुढे आली आहे. पण याबाबत पोलिसांनी अधिकृत कोणतीच माहिती दिलेली नाही. अंतरिम जामीनाच्या काळात तो नागपूरलाही आला होता. त्याने तेलंगणाला जाण्यासाठी स्वतंत्र कार बुक केली होती. त्या कारच्या चालकाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी कोरटकरचा माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. (Koratkar)
हेही वाचा :
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार द्या
महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?
औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद
कोल्हापूर : प्रशांत कोरटकर या कथित पत्रकाराच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या. तेलंगणातील मंचरियाल येथे ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर पोलिस तेथून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्याला मंगळवारी (२५ मार्च) कोर्टात हजर करण्यात येईल. (Koratkar arrested)
येथील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली होती. तसेच सावंत यांना धमकीही दिली होती. सावंत यांनी यासंदर्भात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २५ फेब्रुवारीपासून तो पसार झाला होता. (Koratkar arrested)
कोरटकर देश सोडून परागंदा झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यामुळे सावंत तसेच त्यांच्या वकिलांच्यावतीने त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती. त्यासंबंधी कोरटकरच्या पत्नीला समन्स बजावून पासपोर्ट पोलिसांत जमा करून घ्यावा, असेही म्हटले होते.(Koratkar arrested)
प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कोल्हापूर पोलिस कोरटकरच्या मागावर होते. कोरटकरला तातडीने अटक करावी, अशा मागणीने जोर धरला होता. आंदोलनाबरोबरच विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा माग काढत होते. अखेर तेलंगणात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गृहविभागातील सूत्रांनी याची माहिती दिली आहे. (Koratkar arrested)
कोल्हापुरात आणणार
नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. (Koratkar arrested)
अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रूपेश माने, सुशील पाटील, वैभव खोत, निलेश नाझरे, अतुल देसाई, रोहित टिपुगडे यांनी केली.
प्रशांत कोरटकरला घेऊन आमचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले. कोल्हापुरात पोहोचायला साधारण १२ ते १३ तास लागतील. पोलिस पथकांनी कोरटकरचा नागपूर, चंद्रपूर आणि इंदूर या तीन ठिकाणी तपास केला. तो तेलंगणा येथे असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशनजवळ पकडले. कोरटकरकडे मोबाइल नसल्याने आम्हाला तांत्रिक तपास करताना अडचणी आल्या. त्याच्या ओळखीच्या माणसांचा शोध घेऊन त्याला पकडले.
– महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक
- प्रकरणाचा घटनाक्रम
- २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री इंद्रजित सावंतांना फोन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि सावंतांना धमकी
- २५ फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- २७ फेब्रुवारीला व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा कोरटकरचा प्रयत्न
- २८ फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जमीन मंजूर
- कोल्हापूर पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात दाद
- १८ मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर २४ मार्च कोरटकरला तेलंगणातून अटक
हेही वाचा :
फहीम खानच्या घरावर बुलडोझर
कोल्हापूर : प्रतिनिधी : कथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केला. शनिवारी (२२ मार्च) कोरटकरचा पासपोर्ट पंचनामा करून जप्त करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी दिली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Koratakar)
शनिवारी सकाळपासून प्रशांत कोटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जोरात सुरू होती. त्याचा पासपोर्ट पंचनामा करून कोल्हापूर पोलिसांनी जप्त केल्याने कोरटकर दुबईला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. (Koratakar)
कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे तपास पथक नागपुरात तळ ठोकून आहे, पण प्रशांत कोरटकर अद्याप सापडत नाही. तो चंद्रपुरात दिसल्याचे तेथील स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्यांच्या माध्यमातून दाखविले आहे. परंतु नागपूर पोलिस तपास कामात कोल्हापूर पोलिसांना मदत करत नसल्याचे तसेच त्यांच्यावर राजकीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. (Koratakar)
दरम्यान, तक्रार सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या निवेदनात कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा, त्यासाठी त्याच्या पत्नीला समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट पोलिसांनी जप्त केल्याने कोरटकर देश सोडून बाहेर गेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
न्यायाधीश मणिपूरला गेले, मोदी कधी जाणार?
पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. त्याचा पोसपोर्ट पोलिस ठाण्यात आणून तो जमा करण्याबाबत त्याच्या पत्नीला उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली आहे. सावंत यांच्यासह त्यांचे वकील ॲड. असीम सरोदे, हेमा काटकर, योगेश सावंत, पल्लवी थोरात यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात निवेदन देऊन तशी मागणी केली आहे. (Koratakar Passport)
कोरटकरने मला फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. तसे जातींमध्ये द्वेष निर्माण करणारे संभाषण केल्याबद्दल प्रशांत कोरटकर या कथित पत्रकाराविरोधात आपल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनला नोंद झाला आहे. परंतु आरोपी कोरटकर अजूनही फरार आहे. (Koratakar Passport)
आजपर्यंत प्रशांत कोरटकर हा इंदोर, चंद्रपूर, कोलकाता अश्या ठिकाणी लपून बसल्याच्या बातम्या येत होत्या, पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर येत आहे.
पोलिसांना फरार आरोपीची चौकशी करण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे की, आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलीस स्टेशनला आणून दाखविणे आणि पासपोर्ट जमा करण्याबाबत त्याची बायको सौ. कोरटकर यांना उपस्थित राहण्याचे समन्स काढावे. (Koratakar Passport) पोलिसांनी तपासात त्यांची मदत घ्यावी. प्रशांत कोरटकरला लपण्यासाठी व नागपूरहून पळून जाण्यासाठी, दुबईला पलायन करण्यासाठी ज्यांनी मदत केली असेल त्यांची चौकशी करावी हे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे सावंत आणि त्यांचे वकील यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :
५७ कोटी बनावट धनादेशप्रकरणी पहिली अटक
मुख्य न्यायाधीशांच्या अहवालानंतरच कारवाई
कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात दिली. कोरटकर याचे काही आयपीएस अधिकाऱ्यांची ओळख आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत संशयित आरोपी कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. मंगळवारी (१८ मार्च) जामिनावर अंतिम निर्णय होणार आहे. (Koratkar Case)
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी सरकारी वकील विवेक शुक्ल आणि फिर्यादीचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात केली तर कोरटकरच्या वकिलांनी जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली. ॲड. शुक्ल यांनी काही खटल्यांचे संदर्भ दिले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनीही न्यायालयात बाजू मांडत कोरटकरच्या अटकेची गरज व्यक्त केली. यावेळी फिर्यादी इंद्रजीत सावंत यांच्यासह हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सुनावणीसाठी वकिलांनीही मोठी गर्दी केली होती. (Koratkar Case)
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सरंक्षण देताहात का?
सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करावा अशी मागणी केली. विवेक शुक्ल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार कोरटकरला आहे का? कोरटकरने शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण सरंक्षण देत आहात का? असा प्रश्न केला. कोरटकरने पोलिसांकडे मोबाईल जमा करताना फॉरमॅट करुन दिला आहे. त्यांनी केरळमधील केसचा संदर्भ देत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करावा अशी मागणी केली. कोरटकर असा गुन्हा परत करणार नाही याची शाश्वती कोण देणार? संशयिताने जी धमकी दिली आहे ती प्रत्यक्षात आणली तर काय होईल याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. ही केस किती गंभीर आहे पोलिसांना ठरवू द्या. अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला आहे. तपासात सहकार्य करणार असे सांगत कोरटकरने जामीन मंजूर करावा अशी न्यायालयाला विनंती केली आहे. मात्र माझा आवाज नाही अशी म्हणणारी व्यक्ती गुन्हा दाखल झाल्यावर पसार झाली आहे. मोबाईल जमा करताना तोही फॉरमॅट करुन दिला आहे. फक्त ऑडिओ क्लिप महत्त्वाची नाही तर त्याच्या इन्स्टा पेजवरही काही आक्षेपार्ह लिखाण केले आहे. अजून तपास पूर्ण झालेला नाही. तपासाची सुरुवात आता झाली आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी सरकारी ॲड. शुक्ल यांनी केली. (Koratkar Case)
ॲड. सरोदे यांचा जोरदार युक्तीवाद
ॲड. असीम सरोदे युक्तिवाद करताना म्हणाले, ‘कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करून दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंद्रजीत सावंत यांना असभ्य भाषा वापरली, शिव्या घातल्या. गुन्हे दाखल होताच त्याने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाइलमधील डेटा डिलिट केला. याबाबतचे कलम गुन्ह्यात वाढवण्याची गरज आहे. सावंत यांना धमकावण्यापूर्वी त्याचे कोणाशी बोलणे झाले? काय बोलणे झाले? त्याचे कोणासोबत फोटो होते? याची माहिती मोबाइलमधून मिळाली असती. त्याच्या चौकशीसाठी अटक गरजेची आहे. मोबाईलमधील पुरावा नष्ट केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी २४१ कलम लावले पाहिजे. (Koratkar Case)
….. हे ब्राह्मणांचे सरकार आहे
असीम सरोदे म्हणाले, कोरटकर म्हणाले होते की हे ब्राह्म्णांचे सरकार आहे, पण कोणताच ब्राह्म्ण म्हणत नाही की हे ब्राह्मणाचे सरकार आहे. कोरटकरांना इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल कोणत्या वाक्याविषयी राग आला. त्यांनी रात्री बारा वाजता इंद्रजीत सावंत यांना फोन केला आहे. कोरटकर काय म्हणाले हे सरोदे यांनी वादग्रस्त शब्द वगळून कोर्टात वाचून दाखवले. ब्राह्मणाबद्दल काय बोलले हे समजले पाहिजे. त्यासाठी प्रशांत कोरटकर न्यायालयात समोर हजर राहण्यासाठी आले पाहिजे. जर इंद्रजीत सावंत ब्राह्मणांबद्दल बोलले असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. (Koratkar Case)
डाटा डिलीट केलेला नाही
कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केलेला नाही. जो आयफोन वापरला जात होता तो आधीच जमा केला आहे. कोरटकरना अटक झाली नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे पोलिस कसे म्हणून शकतात असा प्रश्न बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांनी न्यायालयात केला. ते म्हणाले, फिर्यादींनी फोन झाल्यानंतर पोलिस ठाण्यात न जाता आधी अर्धवट ऑडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादींनी अगोदर पोलिसांकडे जायला पाहिजे होते. आम्ही तपासकामी मदत केली आहे. मोबाईलही जमा केला आहे. जी कलमे लावली आहेत त्यांना सात वर्षांखालील शिक्षेची तरतूद आहे. तसेच कोरटकर आवाजाचा नमुना देण्यास तयार आहेत. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि माध्यमामुळे मला अडचणी निर्माण होऊ शकतात. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असे कोरटकरांनी सांगितले आहे. पोलिसांकडून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे कलम लावले आहे. जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आलेली कारणे खूप गंभीर आहेत, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. (Koratkar Case)
कोरटकरच्या मोबाईलवरुन कॉल
इंद्रजीत सावंत यांना कोरटकर यांच्या मोबाईलवर कॉल आला होता असे जुना राजवाडा पोलिसांनी कोर्टात सांगितले. आपला फोन हॅक झाल्याचे त्यांनी सांगितलेले नाही. कोरटकरने शासनाबाबतीत देखील वक्तव्य केले आहे. त्यांनी शासनाचा अपमान केला आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Koratkar Case)
हेही वाचा :
औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
विधानपरिषदेसाठी शिंदे, पवार गटाचे उमेदवार ठरले
गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?
कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे अशा गुन्ह्यातील संशयित प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे. कोरटकर यांनी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडावे, अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. कोरटकरना व्हीसीद्वारे म्हणणे मांडता येणार आहे.(Koratakar)
जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायाधीश कश्यप यांनी पोलिसांनी दाखल केलेला अर्ज रद्द करत असल्याचे बुधवार (१२ मार्च) च्या सुनावणीत सांगितले. याबाबत त्यांनी सरकारी पक्षाला अर्ज रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले. न्यायाधिशांनी कोणत्या कारणास्तव अर्ज निकाली काढला याबाबत माहिती देताना जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल म्हणाले, कायद्यातील दुरुस्तीमुळे भारतीय न्याय संहितेनुसार अटकपूर्व जामीन असणाऱ्या आणि संवेदनशील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती असेल तर अशा गुन्ह्यातील संशयित आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर न राहता व्हीसीव्दारे आपले म्हणणे मांडता येते. त्यामुळेच पोलिसांचा अर्ज फेटाळला आहे. (Koratakar)
सोमवार १७ मार्च रोजी संशयीत प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटक करता येत नाही. कोरटकरांचे व्हाईस सॅम्पल घ्यावयाचे असल्याने तसेच त्याने पोलिसात हजर केलेल्या मोबाईलमधील डाटा डिलीट केलेला असल्याने पोलिसांनी कोरटकरनी न्यायालयात हजर रहावे, अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याने पोलिसांना सीडीआर व इतर साधनांचा वापर करून कोरटकर प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे.(Koratakar)
बुधवारी सुनावणीवेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, प्रजासत्ताक पक्षाचे दिलीप देसाई, युवा सेनेचे अध्यक्ष हर्षल सुर्वे व इतर पदाधिकारी हजर होते.
सरकारचे षड्यंत्र : देसाई इतिहास अभ्यासक इद्रंजित सांवत यांना धमकी देणारा, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर निवांत फिरत आहे. इतर आरोपी पोलिसांना सापडतात, मग कोरटकरच का सापडत नाही? कोरटकरला न्यायालात हजर राहण्याची तरतूदच नव्हती मग सरकारी पक्षाने अर्ज का केला? यावरून सरकारचे हे षड्यंत्र असल्याचे दिसून येते. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना नैसर्गिक न्याय कधी मिळणार? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार, असे प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.
हेही वाचा :
‘लीलावती’मध्ये काळी जादू
‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
कोल्हापूर : प्रतिनिधी: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अंतरिम जामिनांवर आणि त्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यासंबधी निर्णयाबाबत बुधवारी (दि.१२) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज मंगळवारी (दि.११) झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वकीलांनी कोल्हापूरात स्फोटक आणि तणावपूर्ण वातावरण असल्याने कोरटकरांना सुनावणीच्यावेळी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सरकारी वकील आणि इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. (Koratkar)
जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.व्ही.कश्यप यांच्यासमोर आज मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. तत्पुर्वी सकाळी मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रशांत कोरटकर यांचा जामिन रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने केली होती. उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी कोल्हापूरात जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून राज्य सरकारची योग्य बाजू ऐकून निर्णय देण्यात यावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आज मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र् न्यायाधीश कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. (Koratkar)
प्रशांत कोरटकला जिल्हा व सत्र् न्यायालयाने ११ मार्चपर्यंत अंतरिम जामिन दिला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयात बचाव पक्षाचे वकील सौरव घाग यांनी कोरटकरचा अंतरीम जामीन वाढवण्याचा अर्ज दाखल केला. त्यानुसार न्यायाधीश कश्यप यांनी एक दिवसाने अटकपूर्व जामीन वाढविला आहे. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली की, कोरटकरकडे गुन्हयाबाबत चौकशी करणे गरजेचे आहे, कारण त्याने मोबाईलमधील डाटा इरेजर केला आहे. त्यामुळे त्याने न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे. (Koratkar)
इंद्रजित सावंत यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ॲड. असिम सरोदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘कोरटकरच्या विरोधात सरकारकडे भरपूर पुरावे आहेत. त्याच्याकडे अजून तपास करण्यासाठी तो पोलीसांच्या ताब्यात मिळणे गरजेचे आहे’. बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरव घाग म्हणाले, कोरटकर तपास कामात सहकार्य करण्यास तयार आहेत, त्यांनी मोबाईलही जमा केला आहे. जर सरकारी पक्षाला त्यांनी डाटा डिलीट केला असे वाटत असेल तर सीडीआर काढून तपास करावा. यासाठी कोरटकर न्यायालयात येण्याची गरज नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर यांना प्रत्यक्षात न्यायालयात हजर न राहता व्हीसीव्दारे हजर राहण्याची परवानगी मिळावी. (Koratkar)
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बुधवारी याबाबत सुनावणी केली जाईल असे न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांनी सांगितले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यावेळी हजर होते. इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. (Koratkar)
खटल्याची पार्श्वभूमी
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक उद् गार काढले. जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. इंद्रजीत सावंत यांनी स्वत:चा मोबाईल पोलिसांना तपासासाठी जमा केला. धमकीचा फोन कोरटकरने केला होता हे मोबाईल तपासणीत स्पष्ट झाल्यावर कोरटकरचा ताबा घेण्याासाठी जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संयुक्त पथक नागपूरला गेले होते. मात्र तत्पूर्वी कोरटकरने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व अंतरीम जामीन मिळवला. त्यामुळे ११ मार्चपर्यंत कोरटकरला दिलासा मिळाला होता. नागपूर सायबर पोलीसांनी कोरटकरचा जप्त केलेला मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. हा मोबाईल राजवाडा पोलीसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. दरम्यान मोबाईलमधील डाटा डिलीट करूनच तो जमा केल्याचे फॉरेन्सिकच्या लक्षात आले. लॅबने तसे पोलीस अधिकाऱ्यांनाही कळविले आहे. Koratkar)
प्रजासत्ताकचा अर्ज नाकारला.
प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने न्यायालयात अर्ज केला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना देशभरातील लोक देव मानतात, त्यांची पूजा करतात. मात्र कोरटकर यांनी त्यांचा अवमान करून तो देशभरातील मराठी माणसाचा अवमान केला आहे. याबाबत कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत मांडणारा अर्ज प्रजासत्ताकच्यावतीने ॲड. बाबा इंदूलकर यांनी न्यायालयात मांडला. मात्र न्यायालयाने तो नाकारला. (Koratkar)
‘चिल्लर’ माणूस पोलिसांना का सापडत नाही
कोरटकरने मला धमकावले हे माझ्यासाठी महत्वाचे नाही, तर त्याने मी ज्यांना देव मानतो त्या युगपुरुषांचा अवमान केला आहे. असा चिल्लर माणूस पोलीसांना का सापडत नाहीत, असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी न्यायालयाच्या बाहेर सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. त्यांनी याबाबत लक्ष घालून पोलीसांना आदेश द्यावेत. मी काय केले नाही असे तो म्हणतो मग लपून का बसलाय ? असा सवाल सावंत यांनी केला. (Koratkar)
हेही वाचा :