तेलअवीव : वृत्तसंस्था : तेल अवीवच्या पूर्वेकडील पेताह टिक्वा येथे अनेक ठिकाणी हल्ले झाले आणि अनेकांना किरकोळ दुखापत झाली. रविवारी ‘हिज्बुल्लाह’ने इस्रायलवर २५० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर १३ महिन्यांतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. एवढेच नाही तर पहिल्यांदा ‘हिज्बुल्लाह’ने इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील इस्रायली गुप्तचर तळांनाही लक्ष्य केले.
इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवच्या पूर्वेकडील पेताह टिक्वा येथे हे हल्ले झाले. यामध्ये अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे. हिजबुल्लाहने सांगितले, की त्यांनी तेल अवीव आणि जवळच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. वास्तविक, ‘हिज्बुल्लाह’चा हा हल्ला लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर आहे. या हल्ल्यांमध्ये ‘हिज्बुल्लाह’चा प्रवक्ता मोहम्मद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत. बैरूतमध्ये शनिवारी इस्रायली हल्ल्यात २९ लेबनीज ठार, तर ६५ हून अधिक जखमी झाले. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलच्या हल्ल्यानंतर एक इमारत अवशेषात बदलली होती.
‘हिज्बुल्लाह’च्या हल्ल्यांमुळे इस्रायली रणगाड्यांना माघार घ्यावी लागली. ‘हिज्बुल्लाह’चा हल्ला इतका भयंकर होता, की दक्षिण लेबनॉनमधील अल-बायदा भागातील मोक्याच्या टेकडीवरून इस्रायली रणगाडे आणि सैन्याला माघार घ्यावी लागली. ‘हिज्बुल्लाह’ने अनेक टँकविरोधी क्षेपणास्त्रांनीही हल्ला केला. ‘हिज्बुल्लाह’ने हैफा शहराजवळील इस्रायली लष्करी तळालाही लक्ष्य केले. हैफाच्या उत्तरेकडील ज्वालून मिलिटरी इंडस्ट्रीज बेसवरही क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचे ‘हिज्बुल्लाह’ने सांगितले. दक्षिण इस्रायलमधील अश्दोद नौदल तळावर प्रथमच ड्रोनचा वापर करून हल्ला केल्याचा दावा ‘हिज्बुल्लाह’ने केला आहे. इराणनेही इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. रविवारी झालेल्या ‘हिज्बुल्लाह’च्या हल्ल्यात किती लोक मारले गेले आणि किती नुकसान झाले याची माहिती इस्रायल सरकारने दिलेली नाही. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये रविवारी पहाटे इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर तीन पोलिस जखमी झाले. ही घटना अम्मानमधील रबीह भागात घडली असून तेथे एका गस्ती पथकावर गोळीबार करण्यात आला. यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोराला घेरले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हा गुन्हेगार मारला गेला.
पॅलेस्टिनींचे पलायन
हिजबुल्लाह रॉकेट तेल अवीववर आदळल्यानंतर एक वाहन पूर्णपणे नष्ट झाले. इस्रायली सैन्याने पुन्हा गाझा शहराचा काही भाग रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली लष्कराने गाझा शहरातील शुजैया परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शेकडो पॅलेस्टिनी पलायन करत आहेत. त्याचवेळी गेल्या २४ तासांत गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मृतांची संख्या ३५ झाली असून, ९४ पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत.