नवी दिल्लीः ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या `विंदांचे गद्यरूप` या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने आज (दि.१८) विविध २१ भाषांतील साहित्यकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली, त्यात मराठीमधील डॉ. रसाळ यांचा समावेश आहे. (Sudhir Rasal)
विंदांचे गद्यरूप हा ग्रंथ राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीमध्ये मराठी भाषेसाठी ज्येष्ठ कवी आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके, समीक्षक हरिश्चंद्र थोरात आणि डॉ. विद्या देवधर यांनी काम पाहिले.
कोकणी भाषेसाठी मुकेश थली यांना रंगतरंग या पुस्तकासाठी, हिंदीमध्ये कवयित्री गगन गिल यांच्या मैं जब तक आयी बाहर या कवितासंग्रहासाठी आणि इंग्रजीमध्ये इस्टिरिन किरे यांच्या स्पिरिट नाईट या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारांसाठी विचार केला गेला. बांगला, उर्दू आणि डोंगरी या भाषांतील साहित्यकृतींच्या पुरस्कारांची घोषणा झालेली नाही, ती नंतर करण्यात येणार असल्याचे अकादमीने कळवले आहे. यंदाच्या पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींमध्ये आठ कवितासंग्रह, तीन कादंब-या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन समीक्षाग्रंथ, एक नाटक आणि एक संशोधन अशा वाड्.मय प्रकारातील पुस्तकांचा समावेश आहे. (Sudhir Rasal)
विंदांचे गद्यरूप
मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे याेग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शाेध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दाेनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाङ्मयकला बाजूला काढणारा आणि वाङ्मयकलेचे वेगळे स्वरूप अधाेरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिद्धांताची घेतली गेली नाही. किंबहुना त्यांच्या वाङ्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांतच मांडला नाही, तर त्यांनी हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. या पुस्तकातून सुप्रसिद्ध समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांनी पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे. (Sudhir Rasal)
डॉ. सुधीर रसाळ यांच्याबद्दल
डॉ. सुधीर रसाळ हे मराठीतील ज्येष्ठ आणि नामवंत समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. सैद्धांतिक समीक्षेबरोबरच साहित्य चळवळींमध्येही सक्रीय राहिले आहेत. मराठवाडा साहित्य परिषद तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. समीक्षेबरोबरच ललितलेखन, संपादनही त्यांनी केले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कविता आणि प्रतिमा, कविता निरूपणे, काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली, ना.घ. देशपांडे यांची कविता, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप, मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय, लोभस : एक गाव काही माणसं (व्यक्तिचित्रे), वाङ्मयीन संस्कृती, समीक्षक भालचंद्र नेमाडे, साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ) अशी ग्रंथसंपदा डॉ. रसाळ यांच्या नावावर आहे.
हेही वाचा :