एका गावात एका गाढवावर बसून एक साधू आला.
गावातल्या एका माणसाने त्याला आश्रय दिला, त्याची त्या साधूवर श्रद्धा बसली. त्याने साधूची खूप सेवा केली. गावातले लोकही त्या साधूला मानू लागले. होता होता एक दिवस साधूला त्या गावातला मुक्काम आवरता घेण्याची इच्छा झाली. त्याने एके रात्री बाडबिस्तरा आवरला आणि दुसऱ्या गावाला प्रयाण केलं. आपल्या परमभक्ताला सांगून निघालो, तर तो ऐकायचा नाही, जाऊ द्यायचा नाही, आपल्यासोबत येण्याचा हट्ट करेल, या भीतीने त्याने गुपचूप प्रयाण केलं. इतक्या दिवसांच्या सेवेचं काहीतरी फळ द्यायला हवं म्हणून त्याने गाढव मागे सोडलं. त्या माणसाला ते मेहनतीच्या कामांमध्ये उपयोगी पडेल, असा त्याचा होरा होता.
पण, परमभक्ताची जेवढी श्रद्धा साधूवर होती, तेवढीच त्याचं वाहन असलेल्या गाढवावरही होती. त्या गाढवात त्याला साधूचीच स्थितप्रज्ञता दिसली असावी. त्याने त्याचा ओझी वाहण्यासाठी उपयोग केला नाही. उलट त्याला साधूचा आशीर्वाद मानून त्याचीही पूजा सुरू केली. रोज त्याची आरती होऊ लागली, त्याच्या गळ्यात हार पडू लागले, शेंदराचे टिळे लागायला लागले. ज्याअर्थी हा परमभक्त गाढवाची पूजा करतोय, त्याअर्थी त्यात काही ना काही दैवी शक्ती असणार, अशी गावकऱ्यांचीही समजूत झाली. त्यांनीही पूजाअर्चा सुरू केली.
दोन दिवस पूजा करणारा माणूस तिसऱ्या दिवशी नवस मागितल्याशिवाय राहात नाही. तसंच झालं. मूल होऊदेत, मुलगाच होऊदेत, पीक जोरदार येऊदेत, व्यवसायात बरकत येऊदेत, अभ्यास न करता पहिला नंबर येऊ दे, काही न करता ढीगभर पैसे मिळूदेत असे नाना तऱ्हेचे नवस लोक गाढवाकडे बोलू लागले. ज्यांची इच्छापूर्ती होत नसे, ते नशिबाला बोल लावत; ज्यांना फळ मिळत असे, ते गाढवाला श्रेय देत.
गाढवाचा बोलबाला वाढला. त्याचा मठ उभा राहिला. गर्दभमहाराजांचे प्रतिपाळकर्ते म्हणून परमभक्ताला मानसन्मान, पैसाअडका, जमीनजुमला असं सगळं मिळत गेलं.
वयोमानाप्रमाणे एक दिवस गाढवाचा मृत्यू झाला आणि परमभक्त धाय मोकलून रडू लागला. त्याला गाढवाचा लळा लागला होताच. पण, त्याचबरोबर गाढवाबरोबर आपलं ऐश्वर्यही लयाला जाणार, याची भीती अधिक दाटली होती. नेमका त्याचवेळी त्याच गावातून जात असलेला तोच साधू पुन्हा त्याला शोधत शोधत त्याच्याकडे आला. आपण याच्याकडे सोडलेल्या गाढवाला याने गर्दभमहाराज बनवलंय, हे पाहिल्यावर तो थक्क झाला.
व्यथित परमभक्ताने गाढवाच्या मृत्यूनंतर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती दिल्यावर साधू हसला आणि त्याने भक्ताच्या कानात उपदेश करून पुन्हा प्रस्थान ठेवलं…
…काही दिवसांतच मठात गर्दभमहाराजांची भली मोठी मूर्ती वाजत गाजत आणली गेली, तिची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मठ पुन्हा गजबजला, पूजा पुन्हा सुरू झाली, नवस पुन्हा बोलले जाऊ लागले…
गर्दभसंप्रदाय पुन्हा फोफावू लागला.