नवी दिल्ली वृत्तसंस्था : दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर १९८८ साली घातलेली बंदी उठवली आहे. बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर करू शकत नसल्यामुळे ती अस्तित्वात नाही, असे गृहीत धरले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Salman Rushdie : रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’
न्यायमूर्ती रेखा पल्ली आणि न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. २०१९ मध्ये संदीपन खान नावाच्या व्यक्तीने पुस्तक आयात करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. संदीपन म्हणाले, त्यांनी ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाची ऑर्डर दिली होती; मात्र ३६ वर्षांपूर्वी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेमुळे हे पुस्तक आयात करता आले नाही. तथापि, ही अधिसूचना कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नव्हती किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध नव्हती.
काय आहे कथा?
‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीचा हिंदीतील अर्थ ‘शैतानी आयतें’ असा आहे. या पुस्तकाच्या नावावरच मुस्लिम धर्माच्या लोकांनी आक्षेप नोंदवला होता. या पुस्तकात रश्दींनी एक काल्पनिक कथा लिहिली आहे. कथा अशी आहे, की दोन चित्रपट कलाकार विमानाने मुंबईहून लंडनला जात आहेत. त्यातील एक म्हणजे फिल्मी दुनियेचा सुपरस्टार जिब्रिल आणि दुसरा म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट’ सलाउद्दीन. मध्यंतरी, एका शीख दहशतवाद्याने विमानाचे अपहरण केले. यानंतर विमान अटलांटिक महासागरातून जात असताना दहशतवाद्यांनी प्रवाशांशी वाद घालण्यास सुरुवात केली. संतप्त झालेल्या दहशतवाद्याने विमानात बॉम्बचा स्फोट केला.
या घटनेत जिब्रिल आणि सलादीन दोघेही समुद्रात पडून बचावले आहेत. यानंतर दोघांचेही आयुष्य बदलते. मग एके दिवशी, एका विशिष्ट धर्माच्या संस्थापकाच्या जीवनाशी संबंधित काही कथा जिब्रिलच्या स्वप्नात येतात, जो वेडेपणाकडे जात आहे. यानंतर तो त्या धर्माचा इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याचा विचार करतो. पुढे, रश्दींनी त्यांच्या कथेतील जिब्रिल आणि सलादीन या पात्रांच्या कथा अशा प्रकारे लिहिल्या आहेत की ते निंदनीय मानले गेले.
हेही वाचा