गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही. त्यांना धडा शिकवायचा असेल तर येत्या निवडणुकीत मुश्रीफांना शंभर टक्के पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे…“ असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडहिंग्लज येथील जाहीर सभेत केले. कागल मतदारसंघातील उमेदवार समरजितसिंह घाटगे आणि चंदगड मतदारसंघातील नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. (Sharad Pawar)
महायुतीच्या सरकारने राज्याची घडी बिघडवली असून आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने राज्य योग्य रस्त्यावर आणावे लागेल, असे सांगून पवार म्हणाले, आम्ही पक्ष चालवताना, राज्य चालवताना कोण कुठल्या जातीचा, धर्माचा याचा विचार कधी केला नाही. समाजातील लहान घटकातील लोकांचा, अल्पसंख्याकांचा सन्मान केला. त्यांना संधी दिली. कोल्हापूरचा विचार करताना आमच्यापुढे अनेक नावे आली, त्यात हसन मुश्रीफांचेही नाव आले. आम्ही त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासाठी सभा घेतल्या. त्यांना आमदार केले. मंत्री केले. अनेकदा मंत्री केले. कोल्हापूरचा प्रतिनिधी म्हणून संधी दिली. दुर्दैवाने आज काय पाहायला मिळते? महाराष्ट्राला संधी मिळत नाही, सन्मानाची वागणूक मिळत नाही. अशा वेळी एकसंध शक्ती दाखवून महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याची गरज असताना त्यासाठी साथ देण्याऐवजी काही लोक निघून गेले. सोडून गेलेले सगळे मला एकदा भेटायला आले. म्हणाले, आम्ही भाजपमध्ये जाण्याचा विचार करतोय. म्हटलं तुम्ही ज्यांच्याविरुद्ध मते मागून निवडून आलात त्यांच्या दावणीला जाऊन बसणार असाल, तर मला ते शक्य नाही. काही लोक म्हणाले, गेलो नाही तर आम्हाला तुरुंगात जावं लागेल. चार दिवसांनंतर वाचायला मिळालं की मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यावेळी माझ्या वाचनात आलं, की त्यांच्या घरातल्या भगिनीच म्हणाल्या, की आम्हाला अशी वागणूक देण्याऐवजी गोळ्या घाला. मी त्यांना म्हणालो, की ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील त्यांना चिंता असेल. माझ्यासारख्याला चिंता नाही. मला एकदा ईडीची नोटीस आली होती आणि मी त्यांच्याकडे निघाल्यावर त्यांनी येऊ नका, अशी विनंती केली होती.
पवार म्हणाले, हसन मुश्रीफांना आम्ही सगळं दिलं. शक्ती दिली. सन्मान दिला. ते आणि त्यांचे सहकारी भाजपवाल्यांच्या पंगतीत जाऊन बसले. मते मागताना हा विचार त्यांनी केला नाही. लोकांशी बांधिलकीचा विचार पाळला नाही. कागल, गडहिंग्लज या भागातील जनता गरीब असली तरी स्वाभिमानी आहे. ती वाट्टेल ते सहन करील, पण लाचारी, खोट्या गोष्टी सहन करणार नाही. हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव देशाला माहीत आहे. त्यामुळे तुमचा अभिमान वाटतो. (Sharad Pawar)
पवार म्हणाले, जे जे लोक सोडून गेले त्या सगळ्यांच्यावर ईडीच्या केसेस असतील तर त्या संपलेल्या नाहीत. ईडीच्या अधिका-यांनीच सांगितलं, की त्या आमच्या टेबलवर होत्या. त्यांनी भाजपला साथ दिल्यानंतर टेबलवरची फाईल कपाटात ठेवली आहे. ती बंद केलेली नाही, ती चालू आहे, ती आज ना उद्या निघणार आहे.
पवार म्हणाले, महिलांची सुरक्षितता, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी या तीन प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. सत्ता मिळाल्यानंतर प्राधान्याने या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल. एकीकडे भ्रष्ट नेता आणि समोर समरजित घाटगे यांच्यासारखा उच्चशिक्षित, उत्तम सुस्वभावी नेता आहे. चंदगडमध्ये नंदाताईंसारख्या उमेदवार आहेत. या दोघांनाही विधानसभेत पाठवून राज्यात परिवर्तन घडवून आणा.
खासदार शाहू महाराज म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांचा कारखाना चांगला दर देतो. शेतक-यांचे हित पाहतो. राज्यात परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, खंडणीमुक्त, टक्केवारीमुक्त करायचा आहे. ही विचारांची लढाई आहे आणि त्यात आपण निश्चित विजयी होऊ.