-मुकेश माचकर
विहिरीत पडलेला माणूस एकदा एका गावात एक जत्रा भरली होती. जत्रेच्या ठिकाणापासून थोड्याशा अंतरावर एक विहीर होती. जत्रेला आलेला बाहेरगावचा माणूस चुकून त्या विहिरीपाशी आला आणि पाणी काढण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला. त्याला पोहता येत नव्हतं. घाबरला होता. सुदैवाने काठाची एक खाच त्याला सापडली होती. तिच्यात पाय रोवून एका झुडपाच्या आधाराने कसाबसा उभा राहिला होता आणि ‘वाचवा, वाचवा’ म्हणून जिवाच्या आकांताने ओरडत होता. पण, जत्रेतल्या धमाल गोंधळात त्याचा आवाज कोणाच्या कानावर पोहोचत नव्हता.
तेवढ्यात एका धर्माचा एक संन्यासी त्या विहिरीपाशी आला. त्याने आवाज ऐकला. तो विहिरीत वाकून पाहू लागला. आतला माणूस म्हणाला, देवासारखे आलात. मला बाहेर काढा.
संन्यासी म्हणाला, मित्रा, बाहेर येऊन तरी तू काय करणार आहेस? बाहेर काही सुखं आहेत का? हे सगळं जगच दु:खाने भरलेलं आहे. त्यात तू एका विहिरीत पडलास, हे तुझं प्राक्तन आहे. त्यात मी ढवळाढवळ करणं बरं नाही. तुझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय ते सांगतो. तू हा भोग स्वीकार आणि शांतपणे मरणाला सामोरा जा. त्यातून तुला मोक्षप्राप्ती होईल, जीवनमरणाच्या फेऱ्यातून सुटशील. हवं तर आमच्या सद्गुरूंचा नामजपही देतो.
तो निघून गेला.
नंतर नेमका दुसऱ्या एका धर्माचा अनुयायी आला. त्याच्याही कानावर या हाका गेल्या. त्यानेही वाकून पाहिलं आणि म्हणाला, अरेरे, फार वाईट झालं हे तुझ्याबरोबर. म्हणून आम्ही सांगत असतो की अशा विहिरी उघड्या टाकणं हे भयंकर धोकादायक आहे. देशातल्या, जगातल्या सगळ्या विहिरींवर झाकणं टाकली गेली पाहिजेत. ही झाकणक्रांती होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
विहिरीतला माणूस म्हणाला, महाराज, ती झाकणं बसवाल ती बसवाल नंतर. आता मला वाचवण्याचं काहीतरी करा. तो अनुयायी म्हणाला, अरे, एक विहीर आणि एका माणसाचा जीव असा संकुचित विचार मला करताच येणार नाही. मी संपूर्ण क्रांतीचा उद्गाता आहे, आता मी देशव्यापी चळवळीलाच प्रारंभ करणार आहे. तो ताडताड् निघून जत्रेत गेला, तिथल्या एका कोपऱ्यात आरडाओरडा करून लोकांना गोळा करून झाकणक्रांतीची मूलतत्त्वं समजावून सांगू लागला.
विहिरीत पडलेल्या माणसाच्या सुदैवाने आणखी एका धर्माचा अनुयायी तिथे आला आणि त्याने आवाज ऐकताच दोर सोडला, आतल्या माणसाला बाहेर काढला. विहिरीतला माणूस बाहेर पडताच या माणसाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, तुम्ही धन्य आहात, तुमचा धर्म धन्य आहे, तुमच्या धर्मातच खरी माणुसकी आहे.
सुटका करणारा माणूस म्हणाला, मित्रा, खरं सांगतो, मला स्वर्गप्राप्ती करायचीये म्हणून तुला बाहेर काढला. माझ्या धर्मात शिकवलंय की सेवा करा, तरच स्वर्गातला मेवा मिळेल. त्यामुळे मी सगळीकडे सेवेच्या तयारीतच फिरत असतो. हा मूर्ख माणूस जी झाकणक्रांती करू पाहतोय, ती आमच्या धर्माच्या विरोधात आहे. सगळ्या विहिरींवर झाकणं लागली, तर माणसं विहिरीत पडणार कशी आणि आम्ही जीव वाचवणार कुणाचा? सेवा करणार कशी? तू आता वाचलास, त्याबद्दल आमच्या प्रभूचे आभार मान, मी वाचवलंय, हे त्याला सांगायला विसरू नकोस. तुला भरपूर मुलंबाळं होऊदेत, तीही तुझ्याप्रमाणेच विहिरीत पडू देत आणि त्यांना वाचवण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी माझ्या मुलाबाळांना मिळूदेत, असा माझा आशीर्वाद आहे.