कोल्हापूर, प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीस गती आली आहे. आगीत जळून भस्मसात झालेला मलबा हटवून नाट्यगृहाच्या सुस्थितीत असलेल्या भिंती उभारणीसाठी काम सुरू झाले आहे.
आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यावर रंगकर्मी, नाट्यप्रेमी, कलाप्रेमी कोल्हापूरकर हळहळले. नाट्यगृहाची उभारणी लवकर करावी, अशी मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाने वेगाने हालचाली करून निविदा प्रकिया पूर्ण केली.
१४ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते रिकन्स्ट्रक्शन कामास सुरुवात झाली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम आणि सल्लागार कंपनी म्हणून मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. नाट्यगृह जसेच्या तसे उभे करण्यासाठी चार टप्प्यांत कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत एकीकडे प्रचार, मतदान, मतमोजणीची धांदल सुरू असतानाही नाट्यगृह उभारणीचे काम सुरू होते. एक वर्षात नाट्यगृह आहे त्या स्थितीत उभारण्याचा संकल्प लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामावर नाट्यकर्मी, तंत्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.