-संजय थाडे
बंगाली व महाराष्ट्रीयन लोक हे त्यांच्या संगीत, साहित्य, नाटक, कविता, सिनेमा, वाचन, लोकसंगीत, शिक्षण, लेखन या क्षेत्रांविषयीचे प्रेम व प्रभुत्व यांसाठी नावाजले जातात. बंगाली आणि महाराष्ट्रीयन यांच्या शारिरिक गुणसूत्र आणि मानसिक जडणघडणीतही लक्षवेधी साम्य आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या दोन्ही राज्यांची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी समान भासत असली तरीदेखील यापलीकडे जाऊन पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचा परस्परांशी प्रत्यक्ष संबंध हा अन्य राज्यांच्या तुलनेत कमी येत असल्याचे माझे निरीक्षण आहे.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांचे भौगोलिक, प्रादेशिक स्थान नकाशावर पाहिले, तर हे स्पष्ट दिसून येते की ह्या दोन प्रदेशांच्या सीमा जोडलेल्या नसून कोसो दूर आहेत, मात्र तरीही या दोन्ही राज्यांमध्ये मनुष्य किंवा व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी मानुष किंवा माणूस हे जे संबोधन वापरले जाते. त्याने नेहमीच माझे लक्ष वेधून घेतले. विचार करण्यास काही प्रमाणात चालना दिली. भुरळही घातली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीच्या काळात बंगाल, मुंबई आणि मद्रास प्रांतात निर्माण केल्या गेलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे आधुनिक संरचनेततून पडलेल्या प्रभावातील साम्याच्या खुणा या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय यंत्रणेत आजही आढळून येतात. मात्र थोडा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते, की हे प्रशासकीय यंत्रणेचे साम्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमुळे नव्हे तर भारतीय इतिहासातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे फलित आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत १९८९ साली माझी निवड होऊन पश्चिम बंगाल केडरमध्ये माझी नियुक्ती करण्यात आली. तब्बल तीस वर्षे सनदी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर २०१९ साली मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर मी कोलकाता येथे स्थायिक झालो. मी पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात कामाच्या निमित्ताने खूप प्रवास केला आहे. येथील कानाकोपऱ्याला अगदी जवळून पाहिले आहे. येथे जिकडे नजर जाईल तेथे हिरवाईचे गालिचे निसर्गाने अंथरलेले दिसतात, यामागचे कारण म्हणजे पश्चिम बंगालला पर्जन्य आणि भूजल यांचे भरभरून मिळालेले वरदान हे आहे.
आजवरच्या कारकीर्दीत घडून आलेल्या व्यापक जनसंवादातून मला नेहमीच बौद्धिक समाधान मिळाले. बंगाली माणसाची ओळख ही सुजाण वाचक, राजकीयदृष्ट्या संवेदनशील व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय अशी बनली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही गेल्या कित्येक वर्षांपासून साधारण ८० टक्के एवढी आहे, जी अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणूनही गणली जाऊ शकते. वैचारिक आणि बौद्धिक बैठक पक्की असलेल्या महाराष्ट्रातून पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर इतकी वर्षे कधीही मला वेगळेपणाची भावना निर्माण झाली नाही, याला कारण म्हणजे या दोन राज्यांना जोडून ठेवणारी साम्याची अदृश्य नाळ होय.
मातृभाषेतील साम्य
मराठी आणि बांग्ला या दोन्हीही भाषांचा उगम बोलीभाषा म्हणून साधारण सातव्या शतकात प्राकृत भाषेतून झाला, हे विशेष होय. मराठी आणि बांग्ला या दोन्ही भाषांमधील साहित्य हे इंडो आर्य संस्कृतीतील सर्वात प्राचीन साहित्य म्हणून गणले जाते. १३ व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे महान साहित्यिक झाले. भक्ती संप्रदायाचे प्रमुख कवी संत तुकाराम लिखित तुकाराम गाथा ही १७ व्या शतकात लिहिली गेली, तर चैतन्य महाप्रभू यांनी १६ व्या शतकात बंगालमध्ये भक्ती संप्रदायाचा प्रसार करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले.भक्ती चळवळ किंवा भक्ती संप्रदायातून जनाबाई, बहिणाबाई, संत नामदेव, सावतामाळी यांच्यासारखे अनेक कवी उदयास आले. यांपैकी जवळपास सर्वांनी बोलीभाषेत रचना केल्या. भक्ती संप्रदायाने सर्वसामान्यांना साध्या,सोप्या पद्धतीने अध्यात्माची प्राप्ती करुन घेण्याचा मार्ग दाखवला. भगत नामदेव बाणीचा सामावेश म्हणून शीख धर्मियांच्या सर्वोच्च पवित्र धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. यावरुन मराठी भाषेतील साहित्याच्या सर्वसामावेशकता व व्यापकतेचा अंदाज येतो.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आर्य संस्कृतीची सुरुवात मौर्य साम्राज्याचा काळात म्हणजे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात झाली. प्राचीन कालखंडात बंगाली साहित्य हे बौद्ध भिक्खू रचित ६४ धार्मिक स्रोतांमुळे ख-या अर्थाने तारले गेले. जे चार्यपद म्हणून ओळखले जातात. मध्ययुगीन कालखंडात प्रसिद्ध कवी रमाई पंडित यांचे सूर्य पुराण आणि अपभ्रंश प्रकारातील भावगीतांचा सामावेश असलेले प्राकृत पैंगलम यांच्या प्रामुख्याने उल्लेख केला जातो. बंगाली साहित्य हे तीन मुख्य प्रकारांत विभागले जाते: वैष्णव साहित्य, मांडला साहित्य आणि संस्कृत व अन्य भाषांतील अनुवादित केलेले साहित्य होय.
जयदेव या राजा लक्ष्मण सेनच्या राजदरबारात नवरत्नापैकी एक असलेल्या कवीने संस्कृतमध्ये १२ व्या शतकात गीत गोविंदची रचना केली. वैष्णव कवी बरु चंदी दासने जयदेव लिखित संस्कृत गीत गोविंदचा बंगालीमध्ये अनुवाद केला. आदि चंदिदास, द्विज चंदिदास, कवी चंदिदास, दिन चंदिदास अशा विविध नावांनी काव्यरचना केलेल्या अनेकविध चंदिदासांचा उल्लेख बांग्ला साहित्यात आढळतो. मात्र हे कवी चंदिदास एकच व्यक्ती होती की वेगवेगळ्या व्यक्ती होत्या, हे आजही न सोडवले गेलेले चंदिदासाचे प्रसिद्ध कोडे आहे.
चंदिदास रचित या रचनांवर वैष्णव मैथिली भाषेतील कवी मलधर बासु यांच्या कृष्ण राम विजय या प्रसिद्ध काव्याचा प्रभाव दिसून येतो. कृतीबास ओझा यांनी रामायणाचा श्री राम पांचाली हा अनुवाद केला. अराकान राजदरबारातील राजाश्रयामुळे बंगाली साहित्य बहरले. अलावलाने पद्मावती हे विख्यात काव्य लिहिले, तर कैसासी मगर ठाकूर यांनी चंद्रावतीची निर्मिती केली,मर्दनने नासीर नामा लिहिला. तक्ष काझीने बंगाली साहित्यातील पहिले शृंगार साहित्य सतीमान्यना ओ लोरचंद्रम लिहिले.
सामाजिक सुधारणा
१९व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेत अस्तित्वात असलेल्या अनेक अन्यायमूलक प्रथांचे निर्मूलन करण्याचे कार्य या काळात घडून आलेल्या भारतीय प्रबोधन प्रक्रियेमुळे साध्य झाले. प्रबोधन चळवळीद्वारे मुख्यत्वे सती प्रथा, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह,विधवा पुनर्विवाह या प्रथांमुळे होणारी मानवी हक्कांची पायमल्ली रोखण्यावर लक्ष दिले गेले. याद्वारे स्त्रियांच्या मुक्तीचा मार्गच जणू काही खुला करण्यात आला. जातीय विषमता व अस्पृश्यता निर्मूलन, सर्वांसाठी शिक्षणाचा अधिकार व सामाजिक जागरूकता या मुद्द्यांवरही प्रबोधन चळवळीने काम केले. धार्मिक सुधारणांनीही या काळात जोर धरला होता. मूर्तिपूजा, अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, धार्मिक अंधश्रद्धा आणि पुजारी, धर्मगुरुंकडून होणारे शोषण या जटिल समस्यांना सोडवण्याचे काम धार्मिक सुधारणांद्वारे केले गेले. प्रबोधन काळात विशेषकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्हीही राज्यांमध्ये सामाजिक सुधारणा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान इत्यादी क्षेत्रांत काम करणा-या अनेक सुधारक व विचारवंतांनी समाजाला सुधारणेची नवी दिशा देण्याचे कार्य केले. त्यावेळी प्रबोधन चळवळीत योगदान दिलेले समाजसुधारक, विचारवंत, महान साहित्यिक,देशभक्त आणि शास्त्रज्ञ हे आजही समताधिष्ठित समाजाचे खरे निर्माते आहेत, असेच मानले जाते. दोन्हीही राज्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जाते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही दोन्ही राज्ये समाजप्रबोधन चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिली असून या दोन्ही राज्यांनी देशातील अनेक दिग्गज समाजसुधारक घडवले आहेत. महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील वंचित घटक व विशेषकरून स्त्रिया, शुद्र आणि दलितांना शिक्षण, सामाजिक अधिकार आणि राजकीय संधी मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या व त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यात व स्त्री सुधारणेसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मठ जातिव्यवस्थेच्या विरोधात व दलितांना समान संधी मिळाव्यात या उद्देशाने लढा दिला.
महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले आणि गोपाळ कृष्ण आगरकर यांनी शिक्षण प्रसारासाठी प्रयत्न केले. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सन्मानार्थ कोलकाता येथील एक शाळा व महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये स्त्री शिक्षणासाठी ब्राम्हो समाजाच्या सदस्यांनी शाळा उघडली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरत कष्ट घेतले व महिला महाविद्यालयाची स्थापना केली तसेच विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. माधव गोविंद रानडेंनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी लोकजागरणाचा मार्ग अवलंबला. पश्चिम बंगालमधील तत्कालीन उच्चभ्रू वर्गाच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनामुळे कालानुरूप घडून आलेल्या बदलांचा परिपाक म्हणजे बंगालमधील प्रबोधन चळवळ होय.
ब्राम्हो समाजाची स्थापना, सती प्रथेवर बंदी, बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाहास मंजुरी, स्त्रीशिक्षणास चोलना ,बंगाली साहित्यामधील नवीन प्रवाहास मिळालेली समाजमान्यता हे सर्व काही पश्चिम बंगालमधील प्रबोधन चळवळीची प्रतिबिंबं होत. पश्चिम बंगालमधील प्रबोधन चळवळीचे राजा राममोहन रॉय व ईश्वरचंद्र विद्यासागर हे प्रणेते होते. पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावामुळे हिंदू संस्कृतीमधील अन्यायमूलक प्रथांना नष्ट करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना कोणत्याही जाती, पंथ, लिंग यांच्या भेदभावाशिवाय समतेवर आधारित देश अपेक्षित होता. स्वामी विवेकानंदांनी सर्वात प्रथम हिंदू धर्माच्या व्यापकता व सर्वसामावेशकतेला जगासमोर मांडले व हिंदू हा एक धर्म नसून जीवनशैली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंदांनी नंतरच्या काळात रामकृष्ण मिशनची स्थापना करून समाजाची निस्वार्थ सेवा करण्याचे व्रत अंगीकारले.
(लेखक पश्चिम बंगालमधील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.)
(पूर्वार्ध)