कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा पालखी सोहळा त्र्यंबोली भेटीसाठी निघाला. मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होते. माजी खा. संभाजीराजे, मालोजीराजे, यशराजे हे करवीर घराण्यातील सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होता. कोहळा फोडण्याचा मान सागरिका गुरव या कुमारिकेला मिळाला. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा फोडला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. त्र्यंबोली देवीची सिंहासनरुढ रूपात पूजा संतोष गुरव, योगराज गुरव, शार्विल गुरव यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
काय आहे अख्यायिका?
शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी आणि श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पुत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा आणि दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग होता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल आणि जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला. येथे देवगणांसह अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदन करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ्यामेंढ्यात रुपांतर केले. तेव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेऊन कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेतला. त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. त्यामुळे ती रुसून शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. ते लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. तिच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे.
हेही वाचा :