मुंबई : प्रतिनिधी
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद येणार असून, एकनाथ शिंदे ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते.
शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपने त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. शिंदे यांनी दोन्ही प्रस्ताव नाकारल्याचे समजते. शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री करता येत नसल्यास महायुती सरकारचा निमंत्रक म्हणून नियुक्ती करावी, शिवाय श्रीकांत शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव भाजपसमोर मांडला आहे. शिंदे यांच्या या प्रस्तावावर भाजपश्रेष्ठींकडूनही सकारात्मक प्रतिसाद आल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या आपल्या मुलाला उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या प्रस्तावावर पक्षांतर्गत नाराजी पसरल्याचे समजते. श्रीकांत यांना राज्यात एका वरिष्ठ पदावर आणल्याने पक्षाची विश्वासार्हता बिघडू शकते, अशी भीती शिवसेनेच्या काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत मुलगा आदित्य ठाकरे यांना पुढे आणल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. दुसरीकडे, उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून शिंदे यांचे निकटचे स्नेही व विश्वासू सहकारी दादा भुसे यांचे नाव समोर येत आहे. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात भुसे यांनी त्यांची साथ देत वेळोवेळी पक्षाची भूमिकाही समर्थपणे निभावली. भुसे सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. तसेच ते फडणवीस, शिंदे आणि ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री राहिले आहेत. भुसे नाशिक, धुळे आणि पालघरचे पालकमंत्री होते. त्यामुळे दादा भुसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद येण्याची जास्त शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.