मुंबई : प्रतिनिधी : मोबाईल ॲपद्वारे पोर्नोग्राफिक कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ चौकशीच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आणि इतर अनेकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे १५ ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
कथित पोर्नोग्राफिक कंटेंट प्रोडक्शनच्या संदर्भातील २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांत राज कुंद्राची ‘ईडी’कडून चौकशी सुरू आहे. कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक केली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला सप्टेंबर २०२१ मध्ये जामीन मिळाला. लंडनच्या ‘हॉटशॉट’ अॅपला पॉर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई झाली होती.
कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर हे प्रकरणी उघडकीस आले होते. मॉडेल्स, अभिनेत्री आणि अभिनेत्यांना चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून त्यांना पोर्नोग्राफिक चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. मुंबईत भाड्याने घेतलेल्या बंगल्यात अथवा अपार्टमेंटमध्ये पॉर्न चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले होते. शूटिंग दरम्यान, अभिनेत्रींना वेगळ्या स्क्रिप्टनुसार काम करण्यास सांगणे आणि ‘न्यूड सीन’ करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला. ज्यांनी असे करण्यास नकार दिला. त्यांना धमक्या दिल्या गेल्याचीही माहिती समोर आली होती. रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स नंतर सबस्क्रिप्शन आधारित ॲप्सवर अपलोड करण्यात आल्या. यूजर्संना असा कंटेंट पाहण्यासाठी शुल्क भरावे लागते.
सर्व्हरवर सापडला ॲडल्ट कंटेट
या रॅकेटमध्ये कुंद्रा यांच्या कंपनीच्या मालकीच्या ‘हॉटशॉटस्’ या ॲपचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले. या प्रकरणी अधिक केलेल्या चौकशीत जप्त केलेल्या सर्व्हरवर ॲडल्ट कंटेट आढळून आला होता.