-संजय सोनवणी
मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील कच्चे दुवे, ते दुवे जुळवण्यासाठी अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे अथवा चिंतनातून त्याची जुळवणी करणे ही पुढची पायरी आहे.
ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे संहितीकरण, आत्मसातीकरण, स्वानुभूती आणि तिचे एकुणातील प्रकटन अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल.
असे असले तरी नेमके ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाची पूर्णावस्था माणसाला गाठता येवू शकते काय, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. ज्ञानाची केवळ संकल्पनात्मक व्याख्या करता येणार नाही. यासाठी आपण वरील व्याख्येत नमूद केलेले घटक विचारात घेऊ.
जन्मत:च कोणी ज्ञानी नसतो. संस्कारात्मक माहिती, शिक्षणातून व अन्य अनुभवादी स्त्रोतांतून येणारी माहिती ही कोणाचीही पहिली पायरी असते. असे असले तरी “जन्मजात ज्ञानी” या संकल्पनेचा प्रभाव अध्यात्मवाद्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसतो.
अवतार ही कल्पना याच संकल्पनेची उपज आहे. अमूक कोणी खुद्द परमेश्वराचाच अवतार असल्याने त्याला सर्वच माहित असतेच कारण तोच निर्माता आहे. त्यामुळे त्याचे जन्मत:च ज्ञानी असणे स्वाभाविक आहे असा समज धार्मिक बाळगत असतात, श्रद्धाही ठेवत असतात. कारण हीसुद्धा त्यांच्या दृष्टीने “माहिती” असते. आणि या माहितीवर त्यांची श्रद्धा असते. ज्ञानामध्ये श्रद्धेचे तत्त्व नसावे असे नितीविद जरी म्हणत असले तरी अंतत: जेही काही “ज्ञान” म्हणून पदरात पडते ते “ज्ञान” आहे यावर श्रद्धा/विश्वास असल्याखेरीज ते ज्ञान कसे हाही प्रश्न उपस्थित होतो.
जर अमुक माहित होणे म्हणजे ज्ञान आहे की नाही याबाबत साशंकता असेल तर ज्ञानाच्याच अस्तित्वावर गदा येणार नाही काय? म्हणजेच ज्ञानाच्या अस्तित्वावर किंवा जे ज्ञात झालेले आहे त्यावर विश्वास श्रद्धा एकार्थाने अपरिहार्य होत जातात. पण ते तसे खरेच असते काय?
आपल्यावर विविध प्रकारची माहिती आदळत असते. किंबहुना वर्तमान काळात आपण माहितीच्या गोंगाटात जगत आहोत असा आपला अनुभव आहे. माहितीची संसाधने प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. पण या माहितीची सत्यासत्यता थोडावेळ दूर ठेवून असा विचार करुयात की, आपण व्यक्तिपरत्वे कोणत्या माहितीत रस घेतो? कोणती माहिती घेतो? अर्थात हे व्यक्तिगत कुतूहल, आवड आणि गरज यावर अवलंबून असेल हे उघड आहे. हे कसे ठरते? म्हणजे आपल्याला अमुकचीच आवड का आणि तमुकचीच का नाही हे आपण कसे ठरवतो?
नैसर्गिक निवड हे तत्त्व येथे कामाला येते काय?
म्हणजे आवडी-निवडी या नैसर्गिक असून त्याच माणसाचा माहिती घेण्यातील एकुणातील कल ठरवतात असे वरकरणी जरी म्हणता आले तरी सामाजिक-सांस्कृतिक संस्कारही यात मोठा हातभार लावतात हे आपल्या लक्षात येईल.
म्हणजे मनुष्य निसर्गत: जसा जन्माला आला तो समाजात वाढताना तसाच रहात नाही. कारण त्याच्यासमोर त्याच्या वर्तमानात अस्तित्वात असलेले विषय, तत्संबंधीची माहिती आणि तत्सबंधी समाजातच एकुणात असलेले कुतूहल अथवा अनास्था याचा त्यावर परिणाम होतो की नाही? अनेकांच्या बाबतीत तो सर्वस्वी तर काहींच्या बाबतीत तो काही प्रमाणात होतो असे म्हणावे लागेल. कारण समाजाच्या धारणांच्या सहास्तित्वात आणि त्या-त्या समाजाला त्या-त्या काळाच्या चौकटीच्या व माहितीच्याही मर्यादा त्याचे कुतूहलाचे विषय बदलू शकतात असे म्हणावे लागेल. म्हणजेच नैसर्गिक निवडीचे तत्त्वही सापेक्ष आहे.
आता मनुष्य माहितींच्या रेट्यात माहितीचे (आवडीच्या क्षेत्रातीलही) आकलन कसे करतो हा एक प्रश्न आहे. माहिती ही निरपेक्ष आणि निखळ कोरडी बाब नसते तर ती ज्या स्त्रोतांतून येते त्या-त्या स्त्रोतांच्या आकलनाचे रंग त्या माहितीला लागलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे. कोणतीही माहिती सर्वस्वी निरपेक्ष स्त्रोतातून मिळत नाही हे आपण विश्वकोशांतील कोरड्या वाटणा-या माहितीबद्दलही म्हणू शकतो. म्हणजे येणारी माहिती ही सर्वस्वी निर्लिप्त असत नाही.
मग मनुष्य येणा-या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणा-या माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील कच्चे दुवे, ते दुवे जुळवण्यासाठी अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे अथवा चिंतनातून त्याची जुळवणी करणे ही पुढची पायरी आहे असे आपल्याला वरील व्याख्या सुचवते.
किंबहुना माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्यातील ही महत्त्वाची पायरी आहे. एकाच प्रकारची माहिती वेगवेगळे लोक घेत असले तरी ही पुढील पायरीच प्रत्येकाचे व्यक्तिसापेक्ष संहितीकरण करणार असल्याने दोन व्यक्तींचे समान विषयातील, समान माहितीवरचे आकलन (पाठांतराधारित शालेय नव्हे) वेगळे होत जाते. उदा. एकाच गीतेचे आदी शंकराचार्य, ज्ञानेश्वर, महात्मा गांधी आणि टिळकांचे आकलन भिन्न आहे हे आपल्याला माहितच आहे. हे मानसिक संहितीकरण/आकलन भिन्न असेल तर मग ज्ञानाचे स्थान काय राहते आणि ज्ञानाचे व्यक्तिपरत्वे भिन्न असणे हाच ज्ञानाचा पाया आहे काय हाही ज्ञानाच्या क्षेत्रातील सैद्धांतिक प्रश्न आहे असे आपल्याला म्हणावे लागेल.
माहितीची ज्ञानात्मक अनुभूती ही जशी मानसिक बाब आहे तशीच ती भौतिकही आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरते या तत्कालीन ज्ञानाला आव्हान देत ते तसे नसून त्याच्या अगदी उलट, म्हणजे पृथ्वीच सूर्याभोवती फिरते, असे आहे. ही सर्वस्वी नवी माहिती आहे जी जुन्या माहितीला आव्हान देते, त्याज्य ठरवते. ही माहिती गतकालातील काही विद्वानांना कशी झाली? या माहितीचा प्रत्यक्षानुभव घेण्याची कसलीही सोय नसतांना? तर्क, गणित आणि कुतूहल या तीन बाबींच्या एकत्रिकरणातून ही नवीन माहिती समोर आली असे म्हणता येईल. प्रश्न पडणे, कुतूहल निर्माण होणे आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी उपलब्ध माहिती आणि साधने वापरणे यातून ज्ञान पुढे जाते असे म्हणता येईल…पण तरीही त्याला सर्वस्वी “ज्ञान” हा शब्द सर्वंकषपणे वापरता येईल का?
जे पूर्ण नाही ते ज्ञान कसे असू शकेल हा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो.
येथे आपल्याला सॉक्रेटिसच्या “मला काहीच ज्ञान नाही याचे ज्ञान होणे म्हणजे ज्ञान…” या जगविख्यात उक्तीची आठवण होणे स्वाभाविक आहे. भारतात एके काळी अज्ञानवादी पंथ होता. भगवान महावीरांनी या पंथाचे वर्णन करुन ठेवल्याने या पुरातन पंथाची आपल्याला माहिती होते. या पंथाची विचारसरणी अशी होती की दोन व्यक्तिंचे ज्ञान भिन्न असू शकते, दोन व्यक्तिंनी ज्ञानविषयक चर्चा/वाद केले की मने कलुषित होतात, ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात आणि त्यातून जी कर्मे घडतात त्यातून दु:खच वाढते आणि त्याचे निराकरण ज्ञान करू शकत नाही, पुन्हा खरे ज्ञान कोणते हा प्रश्न शिल्लक राहतोच, म्हणून मुमुक्षूने ज्ञान मिळवायच्या फंदात पडू नये…! (या अज्ञानवादाचे भारतात ६७ उपपंथ होते ही बाबही लक्षणीय आहे. त्यावर वेगळा विचार करावा लागेल)
म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानाची उपलब्धी व त्याची व्याप्ती याबाबत पूर्वीही खूप चिंतन झाले आहे हे उघड आहे. पण आपल्या चर्चेचा तो विषय नसून ज्ञानाचा नेमका अर्थ समजावून घेणे हा आहे.
तर आपण ज्ञान हे सर्वकष/सर्वव्यापी असे असते काय यावर चर्चा करत होतो. माहितीची जमावट, आकलन, पृथ:क्करण, संहितीकरण आणि प्रकटीकरण या बाबी ज्ञानाकडे जाणाच्या पाय-या आहेत, ज्ञान नव्हे असे म्हणावे लागते. कारण संपूर्ण मानवी समाजाच्या उपलब्ध माहितीचे कितीही अंगाने पृथक्करण केले तरी हरेक क्षणी माहितीत होत जाणारी वाढ पाहता ज्ञानाकडे जाणा-या पाय-या वाढत आहेत आणि ज्ञान हुलकावणी देत आहे, असे आपल्याला दिसून येईल.
कोणतीही ज्ञानशाखा सर्वस्वी परिपूर्ण आहे, असे विधान आपल्याला करता येत नाही. शिवाय निखळ ज्ञान आणि उपयुक्ततावादी ज्ञानांचीही सीमारेखा समजावून घ्यावी लागेल. विगतातील सर्वज्ञ, अंतिम ज्ञान, ज्ञाता, अवतार वगैरे बाबी या निव्वळ समजुती असून माणसाने प्रश्नांना न भिडण्यासाठी, कुतूहल शमवण्याचे प्रयत्न न करण्यासाठी निवडलेली एक अंधश्रद्ध पळवाट आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.