महाराष्ट्र दिनमान : हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांची चर्चा सातत्याने केली जाते. ऋतुचक्र बदलणे, अवेळी पाऊस किंवा थंडी पडणे, हिमशिखरांवरील बर्फ वितळणे अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचे परिणाम मानवी जीवनासह जीवसृष्टीवर होत असतात. अशा अनेक परिणामांची चर्चा वेळोवेळी होत असते. नुकत्याच एका संशोधनामध्ये पक्ष्यांच्यासंदर्भात अशीच एक माहिती समोर आली आहे. हिंद महासागरातील सेशेल्स बेटावरील छोट्या गाणा-या पक्षांवर (songbird) हवामान बदलाचा विपरित परिणाम झाला आहे. दीर्घकाळ एकाच जोडीदारासोबत राहणा-या या वॉर्बलर पक्षांचे विभक्त होण्याचे किंवा घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, असे एका संशोधनामध्ये आढळून आले आहे. (Seychelles warbler)
हिंद महासागरातील सेशेल्स बेटांवर, हिरवट-तपकिरी रंगाचे कूजन करणारे छोटे वॉर्बलर पक्षी आढळतात. हे पक्षी आयुष्यभर किंवा बराचसा काळ जोडीने राहतात. वर्षानुवर्षे, नर आणि मादी पिल्लांना कीटक आणून खाऊ घालतात. शिकारी पक्ष्यांपासून घरट्याचे संरक्षण करतात. त्यांच्या २० वर्षांच्या आयुष्यातील पंधरा वर्षांपर्यंत या जोड्या स्थिर राहतात. सरासरी सात टक्के जोड्या दरवर्षी विभक्त होत असतात.
परंतु, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की हवामानातील बदलांनी या छोट्या पक्ष्यांचे भावविश्वही हादरवून टाकले आहे. जर्नल ऑफ अप्लाइड इकॉलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या किंवा प्रचंड पाऊस झालेल्या वर्षांत, या पक्ष्यांच्या जोडप्यांच्या “घटस्फोट” दरामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
संशोधकांच्या मते विपरित हवामानाच्या काळात अन्नाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला ताण हे या पक्ष्यांच्या विभक्त होण्याचे कारण असू शकते. पावसाळ्याच्या काळात या पक्ष्यांच्या संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु, वॉर्बलर पक्ष्यांच्या विभक्त होण्यावर दीर्घकाळ वाईट परिणाम होतो, की हे पक्षी अडचणींशी जुळवून घेतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.’ (Seychelles warbler)
१९८५ पासून, सेशेल्सच्या कझिन बेटावरील वॉर्बलर्स पक्ष्यांचे संशोधकांकडून काळजीपूर्वक निरीक्षण केले जात आहे. प्रजनन हंगामात दरवर्षी त्यांना पकडले जाते. प्रत्येक पक्ष्याच्या पायावर एक विशिष्ट धातूची रिंग बसवली जाते, जी दुर्बिणीद्वारे ओळखता येते. हा कार्यक्रम इतक्या काळजीपूर्वक आणि सूक्ष्म पद्धतीने राबवला जातो, की जर एखादा पक्षी एका वर्षात दिसला नाही, तर “तो मरण पावला आहे,” असे मानले जाते.
जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर वॉर्बलर एकटे राहण्याची किंवा वाईट जोडीदार शोधण्याची शक्यता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी लैंगिक दृष्ट्या स्वैर असतात. अनेकदा एकमेकांना धोका देतात. परंतु जेव्हा जोडपी घरटे शेअर करायला सुरुवात करतात, तेव्हा नर आपल्या मादीसोबत राहून तिच्या पिल्लांची काळजी घेतो. अगदी ती पिल्ले त्याची नसली तरी. ही जोडपी सहसा “मदतनीस पक्ष्यांसोबत” राहतात. हे मदतनीस पक्षी म्हणजे प्रामुख्याने मादीची आधीची मोठी पिले असतात. जी लहान पिल्लांना वाढवण्यासाठी मदत करतात. मदतनीस पक्ष्यांपैकी मादी काहीवेळा स्वतः घरट्यात अंडी घालत असते. (Seychelles warbler)
वॉर्बलरचे विभक्त होणे किंवा त्यांची घटस्फोटाची प्रक्रिया नेमकी कशी होते, हे संशोधकांना अद्याप शोधता आलेले नाही. म्हणजे, विभक्त होण्याची सुरुवात नर करतो की मादी, किंवा विभक्त होण्याआधी त्याच्यात संघर्ष किंवा भांडण होते का वगैरे. कदाचित त्यापैकी एक कोणालाही न सांगता निघून जात असावा, असे एका अभ्यासकांचे म्हणणे आहे. विभक्त झाल्यानंतर, काही पक्षी एकटे राहतात, तर इतर नवीन जोडीदार शोधतात.
वॉर्बलर्सचा सरासरी वार्षिक घटस्फोट दर ६.६ टक्के आहे. परंतु, तो त्यांच्यातल्याच स्थलांतरित प्रजातींपेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ, ग्रेट रीड वॉर्बलर्सचा तलाक दर ८५ टक्के आहे. कारण अनेक जोडीदारांची लांबच्या प्रवासादरम्यान ताटातूट होते. त्यानंतर ते नवीन जोडीदार शोधतात.
सेशेल्स वॉर्बलर्समध्ये कमी पावसाच्या वर्षांत विभक्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधकांच्या निरीक्षणात आढळले आहे. कोरड्या हवामानामुळे कीटकांचे पोषण करणा-या वनस्पती कमी होतात. कीटक आपली अंडी घालतात ते पाणीही आटते. परिणामी वॉर्बलर जोडप्यांना त्यांच्या पिल्लांसाठी कीटक शोधण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्याचा त्यांच्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत, विभक्त होण्याचे प्रमाण वाढते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वॉर्बलर पक्षी चांगल्या जोडीदारांपासून विभक्त होत असतील, तर ते एकटे राहण्याची किंवा वाईट जोडीदार मिळवण्याची शक्यता आहे. यामुळे, त्यांची पिल्ले तयार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यातूनच काही पिढ्यांनंतर, त्यांच्या विलुप्त होण्याची शक्यता वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :