संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधानकीर्तन मालिका
-शामसुंदर महाराज सोन्नर
वारकरी संतांनी जात, धर्म, लिंग, वंश यापलिकडे जाऊन माणूस म्हणून सर्वांना एक झाले पाहिजे, अशी शिकवण दिली. त्यातूनच सर्व जाती- धर्मांच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी परंपरा समृध्द केली. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, वेगवेगळी संस्कृती असलेले, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेले, वेगवेगळी आर्थिक परिस्थिती असलेले संत एकत्र आले. या संतानी पाहिलेल्या समताधिष्ठित समाजाचे देखणे रूप आपल्याला पंढरपूरला जाणा-या विविध संतांच्या आषाढीच्या पालखी सोहळ्यात पाहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यामध्ये सुमारे चार – पाच लाख लोक सहभागी झालेले असतात. या सहभागी झालेल्यांमध्ये कुणी कुणाला जात विचारीत नाही, कुणी कुणाला धर्म विचारीत नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आला आहेस हे विचारीत नाही, कुणी कुणाला गरीब आहेस की श्रीमंत आहेस म्हणून विचारीत, कुणी कुणाला त्याचे पद विचारीत नाही. कुणी कुणाला स्री किंवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. मंत्रालयात मंत्रीपदावर बसलेले मंत्री आणि त्यांच्याच कार्यालयात असणारा शिपाई एकाच दिंडीत चालतात. एकाच पंगतीला बसतात. २२ ते ३० दिवसांच्या प्रवासात. (काही संतांच्या दिंड्या २२ दिवसांत पोहचतात तर काही दूरवरून येणा-या संतांच्या दिंड्याना ३० दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.) कोणत्याही यंत्रणेत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही. अलिकडे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री महानगरामध्ये नववर्ष साजरे केले जाते. मुंबईत लोक समुद्र किनारी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात. त्यावेळी अनेकजणांनी मद्यपान केलेले असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पाच पन्नास हजार लोक दोन-तीन तास एकत्र येतात तर तेथे बंदोबस्तासाठी शेकडो पोलिसांना तैनात करावे लागते. गेट वे ऑफ इंडिया, जुहू, शिवाजी पार्क, गिरगाव हे समुद्र किनारे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात त्या प्रत्येक पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री आणि एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत पंचवीस-तीस तरी गुन्हे दाखल होतात. शंभर तक्रारी येतात. त्यात चोरी आणि विनयभंगाच्या तक्रारीचे प्रमाण मोठे असते. म्हणजे केवळ पाच पन्नास हजार लोक दोन-तीन तास एकत्र आले तर शे-दीडशे गुन्हे दाखल होतात. मात्र चार ते पाच लाख लोक सलग २२ दिवस एकत्र प्रवास करतात, एकत्र मुक्काम करतात. या काळात अनेक महिला उघड्यावर आंघोळ करतात. पण या काळात एकही गुन्हा दाखल होत नाही. एकही माता-भगिनी माझ्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिले, चुकीचा स्पर्श केला अशी तक्रार करीत नाही. दिंड्याना जो क्रम लाऊन दिलेला आहे, तो क्रम कुणी बदलत नाही. एक शहर रोज आपला मुक्काम बदलतं. रोज नव्या मुक्कामी बाजार भरतो. या बाजारात या बाजारात हिंदू स्रियांचे सौभाग्य लेणे असणा-या बांगड्या, कुंकवाची दुकाने मुस्लिम दुकानदार लावतात. तिथे कुणाला त्यांचा धर्म दिसत नाही. कशाच्या बळावर हे सगळं इतकं सहज आणि सुरळीत चालतं? ते बळ आहे बंधुत्वाचं. प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि बंधुत्वाची भावनाच २२ दिवस एकमेकांच्या माणुसपणाला सन्मान देत वाटचाल करते. माणूसपणाला उन्नत करण्याची भावना ही बंधुत्वातून निर्माण होते. म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्याबरोबरच बंधुत्वाचा समावेश संविधानाच्या प्रास्ताविकेत केला आहे. संविधानाचा मसुदा तयार करताना, प्रस्ताविकेची मांडणी करताना डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंधुत्वाला विशेष महत्त्व दिले आहे. म्हणूनच संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी बंधुत्वाचे महत्व विशेषत्वाने पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय संविधानाचा पाया असणारे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा एकसंघपणाच लोकशाही बळकट करील, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होता. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांच्या परस्पर एकसंघतेची गरज प्रतिपादित करताना बाबासाहेब म्हणतात, सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या आस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.
बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांना काठी घेऊन उभे राहावे लागेल, ही बाबासाहेबांनी वर्तवलेली शक्यता वर उल्लेखलेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरे करताना खरी ठरत असल्याचे दिसते. तर बंधुत्वाची भावना मजबूत झाली तर पोलिसांच्या हस्तक्षेपाची गरज उरणार नाही, याचे उदाहरण आपल्याला आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते. तिथे दिसणारा बंधुत्वाचा अविष्कार जेव्हा समजात रुजेल तेव्हा ख-या अर्थाने लोकशाही साकार झाली, असे म्हणता येईल.
पालखी सोहळ्यात संत वचनांचा सतत जागर होतो. त्यातूनच बंधुत्व प्रत्येकाच्या कृतीतून पाझरते. बंधुत्व-बंधुत्व म्हणजे तरी काय? तर प्रत्येकाच्या मनात परस्पर प्रेम, जिव्हाळा निर्माण होणे. संत परंपरेने प्रेमाचाच जागर केला आहे. प्रेमापुढे इतर कशाचीही अपेक्षा संतानी केलेली आहे. संत भगवंताकडेही प्रेमाचीच मागणी करतात.
प्रेम सूख देई प्रेम सुख देई l
प्रेमावीन नाही समाधान ll
खरं तर सगळीकडे ज्ञानाची अपेक्षा केली जाते. मात्र संत प्रेमाच्या भक्तीत ज्ञान आडवे येत असेल तर ते ज्ञान नाकारून प्रेमाची अपेक्षा करतात.
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा l
अभिमान नित्य नवा तयामाजी ll
बरं आपण प्रेमाची मागणी करत असताना ज्या भगवंताला अधिष्ठान मानून त्याच्या भक्तीच्या आधारे बंधुत्वाची रुजवात करायची आहे, तो भगवंतही प्रेमासाठीच भुकेलेला आहे. याची जाणीव संत करून देतात. किंबहुना तो भगवंत प्रेमासाठी भुकेला असल्याचे तुकाराम महाराज सांगतात –
थोर प्रेमाचा भुकेला l
हाचि दुष्काळ तयाला l
हाच प्रेमाचा विचार संत साहित्यातून पाझरत राहिला. प्रचंड बळाचा वापर करून एखादी दुष्ट शक्ती मोठा विनाश करते. मात्र तीच शक्ती प्रेमात पडली तर आपले बळ विसरून त्या प्रेमाशी इतकी एकरूप होते की कोवळ्या बंधनातही अडकून राहते, हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज भुंग्याचे उदाहरण देतात.
नाही कास्टाचा गुमान l
गोवी भ्रमरा सुमन ll
मोठमोठी लाकडे भुंगा सहज पोखरून काडतो. मात्र तोच भुंगा कमळाच्या फुलाच्या मकरंद सेवनात दंग होतो. सूर्य मावळल्यानंतर कमळाच्या पाकळ्या मिटतात आणि भुंगा अडकून पडतो. जो भुंगा मोठमोठी लाकडं पोखरतो, तो भुंगा कमळाची कोवळी पाखळी पोखरू शकत नाही. याचे कारण देताना तुकाराम महाराज म्हणतात-
प्रेम प्रितीचे बांधले l
ते न सूटे काही केले l
प्रेमाची ही ताकद आहे. समाजातील द्वेष, मत्सर हे बंधुत्वामुळेच दूर होऊ शकतात.
अशा बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट अविष्कार आपल्याला ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदाना मधून पहायला मिळतो. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराज यांच्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथातील समारोपाच्या ओव्या आहेत. ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर विश्वात्मक देवाकडे जे मागणे ज्ञानेश्वर महाराज यांनी मागितलेले आहे, ते मागणे म्हणजे पसायदान आहे. खरं तर ज्ञानेश्वरी हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही. ते गीतेवर केलेले भाष्य आहे. संस्कृत ७०० श्लोकाचे स्पष्टीकरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज यांनी नऊ हजार ओव्या मराठीतून लिहिल्या. मात्र गीतेमध्ये जो विचार आलेला आहे, त्याच्याहीपेक्षा बंधुत्वाचा उन्नत्त विचार पसायदानामध्ये आलेला आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात- मी साधूचं, सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात आवतार घेतो. भगवंत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी दुर्जनांचा विनाश करतात.
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे ॥
म्हणजे गीतेचे तत्वज्ञान काय आहे? तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणे. पण त्याच गीतेवर भाष्य केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पसायदान मागतात, तेव्हा त्यात कुणाचाच नाश करण्याचा विचार करीत नाही. दुर्जनांना मारायचे नाही, तर त्यांच्यामध्ये असलेला दुष्ट विचार संपवून त्यांचे मन सदविचारांमध्ये रत करायचे. दुष्ट विचार संपून सुविचारांची रुजवात झाली तर प्रत्येक माणसाचेच नाही तर प्रत्येक जीवाचे परस्परावर प्रेम वृद्धींगत होईल, हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
जे खळांचि व्यंकटी सांडो l
तया सत्कर्मी रती वाढो l
भुता परस्परे पडोl
मैत्र जिवांचे ll
बंधुत्वाचा विचार संत साहित्यातून अनेक ठिकाणी प्रकट होताना दिसतो. तुकाराम महाराज यांच्या विष्णूमय जग या अभंगातून समतेबरोबरच बंधुत्वाचा विचार भक्कमपणे मांडला आहे. तिस-या चरणात तुकाराम महाराज म्हणतात-
कोणाही जीवाचा न घडो मत्सर l
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ll
बंधुत्वाचा केवढा मोठा विचार शब्दांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही जिवाचा मत्सर न घडणे हेच सर्वेश्वराच्या पूजनाचे वर्म आहे. इथे तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाच्या पूजेचे, महादेवाच्या पूजेचे, येशूच्या पूजेचे वर्म असे म्हटलेले नाही. तर सर्वेश्वर असा शब्द वापरला आहे. सर्वेश्वर म्हणजे ज्याचा जो ईश्वर असेल त्याच्या पूजेचे वर्म काय असेल तर कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे. केवढा मोठा हा संदेश आहे. मत्सरविरहीत समाजातच खरे बंधुत्व नांदू शकते. आषाढी वारीमध्ये कोणीही कुणाचा जात, धर्म, वंश, लिंग यावरून मत्सर करीत नाही. म्हणूनच बंधुत्वाचा अविष्कार तिथे पहायला मिळतो. सध्या वारीत दिसणारे बंधुत्व समाजात रुजेल तेव्हा समता आणि स्वातंत्र्य आपोआपच हातात हात घालून चालेल. बंधुत्वाचा विचार समाजात रुजावा यासाठी संत विचारांचा जागर झाला पाहिजे. ज्या दिवशी बंधुत्वाचा विचार समाजात रुजेल तेव्हाच आनंदी गाव सापडला असे म्हणता येईल. चला तर मग संविधानाचा पदर धरून त्या आनंदी गावाच्या वाटेवर चालूया.