मुंबई : विशेष प्रतिनिधी : आदर्श आचारसंहिता लागू असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
निवडणूक काळात काँग्रेसने वारंवार केलेल्या मागणीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले होते. सरकारने त्यांना निवडणूक काळापूर्वीपुरता सक्तीच्या रजेवर पाठवले. विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.
याबाबत लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली होती. गैरभाजपा राज्यात निवडणूक आयोग तत्काळ कारवाई करतो पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का?. शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. काँग्रेसच्या मागणीमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभेचा निकाल लागला असला तरी आचारसंहिता संपण्याआधीच गृहमंत्र्यांना भेटून शुक्ला यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले आहे, त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे, याचा पुनरूच्चार लोंढे यांनी केला.