मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त करण्यात येत असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे. शनिवारी (दि.३०) ते तातडीने दिल्लीला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. याबाबत चव्हाण यांनी ‘एक्स’वर पोस्टकरून ‘मी डोंबिवलीतच आहे, मी दिल्लीला गेलेलो नाही’ असा खुलासा केला आहे.
काही दिवसांपासून मी, माझ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. मी दोन दिवसांत किंवा मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण देऊन चव्हाण यांनी आपल्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला. तरी, राज्याचा मुख्यमंत्री ठरत नसल्याने या पदावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेच्या माध्यमांतून अफवा पसरत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याच्या जोरदार हालचाली दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबरोबर मराठा चेहरा महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याच्या चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहेत.
भाजपमधील एक मोठा गट मात्र, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसला आहे. तर, मराठा आरक्षण, आंदोलन विचारात घेता मराठा चेहरा महाराष्ट्रात असावा अशी चर्चा आणि अफवांच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरिश महाजन यांची नावे विविध माध्यमांतून चर्चेला येत आहेत. मोहोळ यांनी समाज माध्यमातून आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारपासून रवींद्र चव्हाण यांचे नावाची चर्चा रंगल्याने त्यांनी खुलासा केला आहे.