वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याआधीच अमेरिकन मीडियाने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. या निवडणुकीत ट्रम्प हे हॅरिस यांच्या विरोधात मोठा विजय नोंदवणार असल्याचे ‘मीडिया हाऊस’चे म्हणणे आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकली होती. ट्रम्प यांनी हॅरिस यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जियासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर २७० इलेक्टोरल मतांचा जादुई आकडा गाठला आहे.
हॅरिस यांच्यावर ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्या नावावर २६७ इलेक्टोरल मते आहेत. जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल मते आवश्यक आहेत. हॅरिस यांना अवघी २१४ मते पडली आहेत. हॅरिस यांनी हॉवर्ड विद्यापीठातील भाषणाचा कार्यक्रमही रद्द केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक परतायला लागले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले असून, हा ‘अमेरिकन लोकांचा मोठा विजय’ असल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्रचाराला त्यांनी जगातील सर्वात मोठी राजकीय चळवळ असे वर्णन केले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही आमचा देश, आमच्या सीमा निश्चित करणार आहोत. आम्ही सर्वात अविश्वसनीय राजकीय विजय मिळवला आहे. मी अमेरिकन जनतेचे आभार मानतो. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी लढेन.’
सुवर्णकाळ सुरू होणार
विजयानंतर ट्रम्प म्हणाले, की हा अमेरिकेचा विजय असून आता सुवर्णकाळ सुरू होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा मोठा विजय असून, आता आम्ही आमची आश्वासने पूर्ण करू. युद्ध संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि घुसखोरी पूर्णपणे संपुष्टात येईल. आता कोणीही अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करू शकणार नाही. बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना आम्ही परत पाठवू. आमच्या करदात्यांचा पैसा अशा लोकांवर खर्च केला जात आहे. आम्ही याला पूर्णविराम देऊ. आम्हीच ‘इस्लामिक स्टेट’सारख्या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत केले. ट्रम्प यांनी निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या इलॉन मस्क यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, की ती एक अतिशय अद्भुत व्यक्ती आहे.
युद्धावर तोडगा
ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात आपण युद्ध थांबवू, असा पुनरुच्चार केला होता. आता रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर तोडगा निघू शकतो, असे मानले जात आहे. ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत दावा केला होता, की बेंजामिन नेतान्याहू त्यांचे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी बोलून युद्ध थांबवतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की या निकालांवरून हेही दिसून येते, की अमेरिकन लोकांना त्यांच्या देशाचा पैसा युद्धात खर्च व्हावा असे वाटत नाही. त्यामुळेच ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. ट्रम्प याआधी अध्यक्ष राहिले आहेत आणि ते त्यांच्या कठोर भाषा आणि निर्णयांसाठी ओळखले जातात.