-अमोल उदगीरकर : एखाद्या महाकाय, जगावर प्रभाव असणाऱ्या शक्तिशाली देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची स्वतःची खास अशी एक गोची असते. त्या देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ पण आपल्या प्रभावशाली शेजाऱ्याशी बांधला गेलेला असतो आणि त्या देशामागून फरफटत जाण्याशिवाय या देशाकडे दुसरा पर्याय नसतो. मोठ्या वटवृक्षाच्या छायेमध्ये खुरटत राहणं हेच त्या देशाचं प्राक्तन असतं. मेक्सिकोच्या नशीबी ते प्राक्तन आलं. जगातल्या एकमेव महासत्तेचा शेजार त्यांना लाभला आणि त्याची अनेक बुरीभली फळं या देशानं भोगली. (Breaking Bad)
मेक्सिकोतून स्थलांतर
अमेरिकेचे शेजारी असले तरी मेक्सिकोची आर्थिक परिस्थिती तशी काही फार चांगली नाही. मेक्सिकोमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर (अवैधपणे ) निर्यात होणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे नोकरीच्या शोधात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसणारे मेक्सिकन निर्वासित आणि अर्थातच अंमली पदार्थ. अमेरिकन जनमानस जसं इतर देशातल्या स्थलांतरितांबद्दल अनुकूल आहे, तसं ते आपल्या शेजारी देशातल्या निर्वासितांबद्दल नाही. आपण निवडून आलो तर अवैध स्थलांतर थांबवण्यासाठी मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमारेषांवर आपण एक महाकाय भिंत बांधू असं आश्वासन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं. त्यावेळेस ट्रम्प निवडून आले होते यात या चक्रम आश्वासनाचा वाटा नसेलंच असं नाही.
मेक्सिकन माणसाचं चित्रण
अमेरिकन सिनेमात आणि वेबसिरीजमध्ये मेक्सिकन माणसाचं प्रातिनिधिक चित्र कसं असतं? त्यांच्या सिनेमांत येणारा मेक्सिकन माणूस धांदरट, घाबरट, खेडवळ असतो नाहीतर क्रूर ड्रगलॉर्ड. मेक्सिकन वंशाचा अभिनेता डॅनी ट्रेजो हा अमेरिकन सिनेमातला मेक्सिकन चेहरा आहे. डॅनी हा धाडधिप्पाड, चेहऱ्यावरची माशी पण न उडणारा इसम. हॉलिवूडचे सिनेमे त्याला एकतर विनोदनिर्मितीसाठी वापरतात नाही तर रंक्तरंजित ऍक्शन प्रसंगात. डॅनीच्या माध्यमातून जणू हॉलिवूड मेक्सिकोला त्यांच्या दुय्यमपणाची जाणीव करून देतं असतं. मिम्स हे अनेकदा विनोदनिर्मितीसाठी वापरले जात असले तरी अनेकदा हे मिम्स एखाद्या वस्तुस्थितीकडे अचूक निर्देश करत असतात. मध्यंतरी समाजमाध्यमांवर काही मिम्स जोरदार ट्रेंड होत होते.
ब्रेकिंग बॅड (Breaking Bad)
‘ब्रेकिंग बॅड ‘ ही अत्यंत लोकप्रिय असलेली वेब सीरिज अनेक वाचकांनी बघितलेली असेलच. या सीरिजचं कथानक घडतं ते अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमारेषेवर असणाऱ्या ‘न्यू मेक्सिको ‘ या राज्यात. या वेबसीरिजमच्या छायाचित्रणात सेपिया टोन वापरला आहे. मेक्सिकोचं काहीसं कोरडं उबदार वातावरण दाखवण्यासाठी हा सेपिया टोन वापरला जातो हे एक वरवरचं कारण. त्याचा दुसरा छुपा अर्थ असा की मेक्सिकोबद्दल जे जे काही पूर्वग्रह आहेत, ते ते ठसवण्यासाठी या सेपिया टोनचा वापर केला जातो. रेडिट या वेबसाईटवर एका दर्शकाने ‘ब्रेकिंग बॅड’ मध्ये मेक्सिकोमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी कसं पिवळसर प्रकाशयोजनेचा वापर करून वेगळं ‘कलर पॅलेट ‘ वापरलं आहे आणि अमेरिकेत घडणाऱ्या घटनांमध्ये कसं कलरफुल पॅलेट वापरलं आहे हे अनेक उदाहरण देऊन स्पष्ट केलं होतं. म्हणजे छुपा अर्थ असा की अमेरिकन आयुष्य कसं रंगीबेरंगी आहे आणि मेक्सिकन आयुष्य कसं कोरडं क्रूर आहे. मग या छायाचित्रणातल्या गंमतीवरून अनेक मिम्स बनायला लागले. बरं हे फक्त ‘ब्रेकिंग बॅड’ पुरतंच मर्यादित आहे का? तर नाही. अमेरिकन सिनेमात मेक्सिको डोकावला की हा पिवळसर सेपिया टोन येतोच येतो. ‘ट्रॅफिक’, ‘सिकारीयो’ आणि इतरही अनेक चित्रपटात तो दिसतो. काही प्रेक्षक त्याला विनोदाने मेक्सिकन फिल्टर म्हणतात. (Breaking Bad)
मेक्सिकन सिनेमावर हॉलीवूडची छाया
तर ज्याप्रमाणे मेक्सिकोवर अमेरिकेची भली मोठी छाया पडली आहे, तशीच मेक्सिकन सिनेमा, वेब सीरिज, मालिका यांच्यावर हॉलिवूडची छाया पडली आहे. पण मेक्सिकन मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत आले आहेत. अमेरिकन वेबसीरिज आणि मालिका ‘फॉर्म्युलेबाज ‘ बनत असताना मेक्सिकन मालिका आणि सीरिज सातत्याने वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. ओटीटी कृपेने हे प्रयोग आता जगभरातल्या प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत.
द हाऊस ऑफ फ्लॉवर्स
मला सगळ्यात जास्त आवडलेली मेक्सिकन सीरिज म्हणजे ‘द हाऊस ऑफ फ्लॉवर्स’. एका फुलांचा बिझनेस करणाऱ्या परिवारामध्ये एका आत्महत्येनंतर उठणारं वादळ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. त्या आत्महत्येनंतर घरातला कर्ता पुरुष जेलमध्ये जातो. आणि बिझनेसवर ताबा मिळवण्यासाठी या विखंडित परिवारामध्ये रस्सीखेच सुरु होते. ही सीरिज त्या अर्थाने वरवर गंभीर वाटतं असली तरी, ती स्वतःला गांभीर्याने घेत नाही. ‘सिच्युएशनल कॉमेडी’ चा मोठ्या प्रमाणावर वापर लेखक आणि क्रियेटर्सनी केला आहे. त्या अर्थाने ‘सक्सेशन’ या गाजलेल्या वेबसीरिजशी या मेक्सिकन सीरिजचं काही प्रमाणात साम्य आहे. मेक्सिकन कुंटुंब पद्धती आणि भारतीय कुटुंब पद्धती यात बरीच साम्यं आहेत. भारतीय कुटुंब संस्थेचा एकत्र कुटुंब संस्थेकडून विकेंद्रित (Nucleas) परिवाराकडे जी वाटचाल चालू आहे तसाच प्रकार मेक्सिकोमध्ये घडत आहे. ‘द हाऊस ऑफ फ्लॉवर्स’ मधल्या परिवारात जी भाऊबंदकी, असूया, प्रॉपर्टीचा लोभ हे घटक आहेत तेच आपल्या देशातल्या परिवारात दिसतात. त्यामुळे भारतीय माणसाला ह्या सीरिजमधला पारिवारिक गोंधळ फार जवळचा वाटू शकतो. परिवार संस्था एवढ्यापुरतंच भारत आणि मेक्सिको यांच्यातलं साम्य थांबत नाही. हे साम्य अनेक पातळ्यांवर आहे. (Breaking Bad)
क्राईम थ्रिलरचा प्रभाव
मेक्सिको हा आपल्यासारखाच वसाहतवादाचा अनुभव घेतलेला विकसनशील देश आहे. गरिब आणि श्रीमंत वर्गातली वाढती दरी आणि कुडमुड्या मध्यमवर्गाचं अस्तित्व पण अगदी आपल्यासारखंच. मेक्सिकोमधलं वातावरण पण आपल्यासारखंच उबदार. ड्रग्जचा सुळसुळाट असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण पण मोठे आहे. त्यामुळेच असेल पण तिथं पण आपल्यासारखंच क्राईम थ्रिलर श्रेणीतल्या मालिका आणि वेबसीरिज मोठ्या प्रमाणावर बनतात आणि बघितल्या पण जातात. ‘हाय हिट’ , ‘डार्क डिझायर्स’ , हू किल्ड सारा’ या वेब सीरिज ‘क्राईम थ्रिलर्स’ या जॉनरला उत्तम न्याय देणाऱ्या आहेत. या सीरिजमध्ये भ्रष्टाचाराने पोखरलेली मेक्सिकन यंत्रणा ही नेहमी दिसत राहत. भारतीय लोकांना मेक्सिकन कलाकृतींशी जोडणारा हा अजून एक धागा. स्त्री पुरुषांमधले अनैतिक संबंध, त्या संबंधांमागच्या लैंगिक आणि इतर प्रेरणा आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत ह्या विषयावर पण मेक्सिकोमध्ये अनेक वेब सिरीज बनत असतात .
हेही वाचा :