लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या उमेदवारीच्या दुसऱ्या यादीत सर्व दहा मुस्लिम उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) दहा टक्के मुस्लिम उमेदवार देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्यात सुमारे १२ ते १३ टक्के असलेल्या मुस्लिम मतदारांचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. निर्णय जाहीर केला.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. या पराभवामुळे व्यथित झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद संबोधून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
मुस्लिम मतदार ही पूर्वीपासून काँग्रेसची व्होट बँक म्हणून ओळखली जाते. मधल्या काळात समाजवादी पक्षाने त्याआधारे राजकारण केले आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएम पक्षाने मुस्लिम मतदारांना टार्गेट केले आहे. सुरुवातीच्या काळात मराठवाडा, सोलापूर, मुंबई आदी परिसरात एमआयएमला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु एमआयएमचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होत असल्याचे दिसून आल्यावर मुस्लिम मतदार पुन्हा काँग्रेससोबत आल्याचे अलीकडच्या निवडणुकांमध्ये पाहावयास मिळाले. एकेकाळी शिवसेना आणि मुस्लिम मतदार यांच्यात छत्तीसचा आकडा होता. परंतु उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरल्यामुळे मुस्लिम मतदारांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला साथ दिली, त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीला दिसून आले. एमआयएमने मुस्लिम मतदारांची संख्या वीस टक्क्यांहून अधिक असलेल्या २३ मतदारांची यादी जाहीर करून महाविकास आघाडीला सोबत घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्याचा विपरित परिणाम होण्याच्या शक्यतेने आघाडीने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही.
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत दहा मुस्लिम आमदार विजयी झाले. त्यात काँग्रेसचे तीन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले. शिवसेनेकडून एक मुस्लिम उमेदवार निवडून आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या खेळीकडे पाहावे लागते. मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये त्यांनी मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे त्याचा फटका स्वाभाविकपणे महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता व्यक्त होते. लोकसभा निवडणुकीत काही जागांवर अटीतटीच्या लढती झाल्या, त्याप्रमाणे विधानसभेलाही अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होतील आणि त्यामध्ये एक-दोन हजार मतेही निर्णायक ठरू शकतील. वंचितने जाहीर केलेल्या प्रारंभीच्या २१ मध्ये ११ मुस्लिम उमेदवार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचे आणि पर्यायाने महायुतीला सहाय्यभूत ठरणारे राजकारण त्यांनी सुरू ठेवल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.
महायुती सरकारने एकीकडे हिंदुत्ववादी राजकारणाला प्राधान्य दिले असले तरी मुस्लिमांसाठीही काही निर्णय घेतले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने हिंदुत्ववादी राजकारणात आपला धर्मनिरपेक्ष चेहरा टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले. विशाळगड येथे मुस्लिम वस्तीवर हल्ला झाल्यानंतर अजित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली होती. मुस्लिमांसाठीच्या सरकारी निर्णयांकरिता त्यांनीच आग्रह धरला. परंतु भाजप आणि शिवसेनेसोबत (एकनाथ शिंदे) असल्यामुळे मुस्लिम मतदार अजित पवार यांच्यावर किती विश्वास ठेवतात, हेही पाहावे लागणार आहे.
लोकसभेप्रमाणे एकगठ्ठा मुस्लिम मते महाविकास आघाडीला मिळणार नाहीत, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुरुवातीला वाटत होते. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचाराला आले. त्यांनी बटोगे तो कटोगे ची घोषणा दिली आणि महाविकास आघाडीला मुस्लिम मते मिळण्याचा मार्ग सोपा झाला. प्रत्यक्ष मतदानात काय दिसते आहे,ते बघूया.