हैदराबाद : तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आज (दि.१) माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांनी सात माओवाद्यांना ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एतुरानगरम मंडलच्या चालपका जंगल परिसरात पहाटे ५.३० च्या सुमारास माओवादी आणि माओवादी विरोधी दल ग्रेहाऊंड्स यांच्यात चकमक झाली.
जंगलात शोध मोहिम राबवत असलेल्या ‘ग्रे हाऊंड’च्या कमांडोजनी माओवाद्यांच्या गटाला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. परंतु, माओवाद्यांनी ‘ग्रे हाऊंड’ कमांडोजवर गोळीबार केला. कमांडोजनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये प्रमुख माओवादी नेता बद्रू याचाही समावेश असल्याचा संशय आहे. बद्रू हा सीपीआय (माओवादी) च्या येलांडू-नरसंपेटा क्षेत्र समितीचा सचिव आणि प्रतिबंधित संघटनेच्या तेलंगणा राज्य समितीचा सदस्य होता. कुर्सम मंगू उर्फ बद्रू उर्फ पपण्णा (३५), एगोलाप्पू मल्लैया उर्फ मधु (४३), मुसाकी देवल उर्फ करुणाकर (२२), जयसिंग (२५), किशोर (२२), कामेश (२३) आणि जमुना अशी ठार झालेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके-४७ रायफल आणि इतर शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलुगु जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी चकमक आहे. जिल्ह्यात नुकतेच माओवाद्यांचे अस्तित्व दिसून आले. २१ नोव्हेंबर रोजी मुलुगु जिल्ह्यात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून अतिरेक्यांनी दोन जणांची हत्या केली होती. उईका रमेश आणि रहिवासी उईका अर्जुन अशी मृतांची नावे आहेत. रमेश हे याच मंडलातील पेरू ग्रामपंचायतीचे सचिव होते. हल्लेखोरांनी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात रमेश आणि अर्जुन माहिती गोळा करत होते आणि माओवादीविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या राज्य पोलिसांच्या विशेष गुप्तचर संस्थेला पाठवत होते, असे म्हटले होते.
२०२६ पर्यंत नक्षलवादी नष्ट करण्याचे उद्दिष्ट
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी रायपूरमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्याचे लक्ष्य दिले होते. त्या संदर्भात छत्तीसगड पोलिस सातत्याने मोहीम राबवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत ९६ चकमकी झाल्या आहेत. त्यापैकी ८.८४ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या २०७ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.