कोल्हापूरः येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अथक परिश्रमातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्.मयाचे १८ खंड साकारले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या या खंडांचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात शुक्रवारी ( दि. २२) होणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने आयोजित केलेला हा समारंभ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे होईल. दिल्ली येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ होईल. यावेळी डॉ. लवटे यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर आणि किशोर बेडकिहाळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि परिसरातील साहित्य रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.