महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या मनसेला आता आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे , पालघरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे ते पक्षातच राहणार की, अन्य कुठली पक्षात प्रवेश करणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जाधव यांनी स्वतः ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात ते तिसऱ्या स्थानावर राहिले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे. यानंतर जाधव आगामी राजकीय भूमिका कोणती घेतात, याकडे ठाण्यातील मनसे सैनिकाचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरची जवळीक घातक ठरल्याचे मत पराभूत उमेदवारांनी नोंदवले.
आज राज यांनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीमध्ये ‘ईव्हीएम’संदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज यांच्याकडे केल्या. भाजपबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरली नाही, असे पराभूत उमेदवारांनी राज यांना सांगितले आहे. राज यांनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण ४२ उमेदवार उभे केले होते; मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा दादर-माहीम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर राज यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावले होते. नेमका पराभव कशामुळे झाला याची चाचपणी त्यांनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता. सभांना गर्दी होत होती, मग त्याचे रूपांतर मतांमध्ये का झाले नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील, अशी अपेक्षा मनसेला होती; मात्र १३८ उमेदवार उभे करून एकही उमेदवार निवडून आला नाही. या वेळी बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीला भाजपशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता; मात्र विधानसभेला भाजपशी जवळीक करणे फायद्याचे ठरले नाही, असे पराभूत उमेदवारांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज यांनी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटते, हे जाणून घेतसे. आता राज यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का, हे अजून गुलदस्त्यातच आहे.