महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनं लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Cabinet Meeting)
राज्य सरकारने वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतल्यानं तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावे लागणार आहे. या पाच टोलपैकी चार टोलची मुदत २०२७ पर्यंत आहे तर एक टोल २०२९ पर्यंत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनं आणखी एक मोठी लोकप्रिय घोषणा केली आहे.
टोलमाफीचा निर्णय आजपासून लागू
राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहे. टोलमाफीच्या निर्णयाचं वाहनधारकांकडून स्वागत करण्यात आलं आहे. (Maharashtra Cabinet Meeting)
लोकप्रिय घोषणांचा धडाका
मुंबईतील चर्चेत असलेल्या धारावी पुनर्विकासासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील देवनार डंम्पिंग ग्राऊंडची १२५ एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडच जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास अदाणी समूह करत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.