महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये महायुतीला अपयश आले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. तर महायुतीने २३५ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिले आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला २,१०० रूपये असे आश्वासने विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. यामुळे राज्यातील महिलांनी बहुमताने राज्याची सत्ता महायुतीकडे दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा वाढीव हप्ता रूपये महिलांना कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, राज्य सरकारने असे जाहीर केले होते की, महिलांना २,१०० रूपये मिळण्यासाठी ७ ते १० महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तर, लाडक्या बहिणचा नियमित हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला जाणार असे जाहीर केले. परंतु, नोव्हेंबर उलटून गेला तरी या महिन्याचा हप्ता महिलांना अजूनही मिळालेला नाही.
महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानावरून असे दिसते की, महिलांना २१०० रुपये मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ मुलाखत दिली. यात त्यांनी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत भूमिका मांडली.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिले होते की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन तुम्ही पूर्ण कराल का? कारण राष्ट्रवादीने (अजित पवार) सांगितले की, हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होते. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू.
महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही. तर, देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की, आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला पाहिजे. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही.
महायुती सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की, आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.