मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप विधिमंडळ नेता निवडण्यासाठी पक्षाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून ते विधिमंडळ नेता निवडणार आहेत.
महायुती सरकार-२ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील हे जवळपास निश्चित आहे. तरीही विधानसभा निवडणुकीत तब्बल १३२ जागा जिंकूनही अद्याप भाजपाने विधिमंडळ नेता निवडलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार ? हे अजून अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदान येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.त्यांच्यासह देशातील भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते व विविध राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
त्यापूर्वी भाजपाकडून विधिमंडळ नेत्याची निवड करणे आवश्यक असून त्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून पक्षाने आज (दि.२) पंजाबचे प्रभारी व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्र भाजपाचा विधीमंडळ नेता निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ऑनलाइन मार्गदर्शन करणार असल्याचेही पक्षाच्या कडून सांगण्यात आले आहे.