आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात देशात प्रचंड आंदोलन झाले आणि त्या आंदोलनाची परिणती म्हणजे शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले. सध्याच्या हिंसाचाराचे कारण वेगळे आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्श्यसनेस (इस्कॉन) या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित असलेल्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानंतर चिन्मय कृष्ण यांचे समर्थक आणि पोलिसांदरम्यान झालेल्या हिंसाचारात सैफुल इस्लाम नामक वकिलाचा मृत्यू झाला. त्यावरून परिस्थिती चिघळली. स्वत:ला चिन्मय कृष्ण हे ‘बांगलादेश सम्मीलित सनातन जागरण जोती’ या संघटनेचे प्रवक्ते आहेत. ऑक्टोबरमध्ये बांगलादेशाच्या ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप चिन्मय कृष्ण यांच्यावर आहे. ज्या दिवशी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केले, त्यादिवशी त्यांनी एका जमावाला बांगला देशाच्या झेंड्याच्या जागी इस्कॉनला भगवा झेंडा लावण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. देश कुठलाही असला तरी बहुसंख्य आणि अल्पसंख्यांकांमधील संबंध सारखेच असतात. हिंदू कट्टरपंथी भारतात ज्या त-हेचा व्यवहार मुस्लिमांशी करतात, तसाच व्यवहार पाकिस्तान किंवा बांगला देशातील मुस्लिम तेथील हिंदू अल्पसंख्यांकांशी करतात, हे अनेकदा आढळून आले आहे. बांगला देश सरकारच्या एका प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार चिन्मय कृष्णा यांच्यावर ते कुठल्या समुदायाचे नेते आहेत, म्हणून नव्हे, तर त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे. बांगला देशातील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा यांनी ऑगस्टपासून सातत्याने आंदोलने केली आहेत. अशाच एका आंदोलनादरम्यानच्या कथित प्रकारावरून त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
बांगला देशातील सरकारी धोरणांविरोधातील आणि अन्य अंतर्गत कारणांवरून सुरू असलेला संघर्ष वेगळा आहे. त्या संघर्षाची परिणती शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यात झाली. परंतु भारतीय उपखंडातील अन्य देशांप्रमाणे इथल्या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचा एक पदर आहेच. अशा संघर्षात अल्पसंख्य सतत भरडले जातात आणि बांगला देशात हिंदू अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना तिथे त्रास सहनकरावा लागत आहे. शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनापासून बांगलादेशात अल्पसंख्याक, त्यातही हिंदू नागरिकांच्या मालमत्ता आणि प्रार्थनास्थळांवरील हल्ले वाढले आहेत. त्याचे कारणही हास्यास्पद म्हणता येईल असे आहे. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला, याचा अर्थ भारत सरकारशी त्यांची जवळीक आहे, अशा समाजातून आणि हिंदू म्हणजे भारतप्रेमी असे गृहित धरून अशा प्रकारचे हल्ले झाले. शेख हसीना यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे खटले चालवायचे असल्यामुळे त्यांना बांगलादेशात परत पाठवावे, अशी मागणी बांगला देशाच्या काळजीवाहू सरकारने केली आहे. या मागणीस भारताने प्रतिसाद दिलेला नसल्यामुळे बांगलादेश सरकारही दुखावले आहे. परंतु काळजीवाहू सरकारचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या सबुरीच्या धोरणामुळे प्रकरण हाताबाहेर गेलेले नाही. बांगलादेशातील लोकभावनेचा आदर राखत भारताशी जुळवून घेण्याचे त्यांचे धोरण आहे. मूर्खांची जमात सगळ्या देशांमध्ये असते, तशी ती बांगला देशातही आहेच. त्याचा फटका तेथील हिंदूंना बसत आहे. हिंदूंवरील हल्ल्यासंदर्भात भारत सरकारने बांगलादेशातील काळजीवाहू सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेऊन मोहम्मद युनूस यांनी एका मंदिराला भेट देऊन, धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. बांगला देशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसंदर्भात भारत सरकारने लक्ष घालणे समजू शकते, परंतु चिन्मय कृष्णा यांच्या अटकेवरून दोन्ही देशांमध्ये तणाव येणे योग्य नाही. कारण हा मुद्दा देशांतर्गत आहे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून त्यावर तोडगा निघू शकेल, ही प्रक्रिया निष्पक्षपणे चालावी यासाठी आग्रह धरणे समजू शकते. परंतु त्याआधीच अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणे संकेतांना धरून नाही. बांगला देशातील हिंदूंची भारताला काळजी वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय संकेतांचे भान राखायला हवे. त्याबाबत सातत्याने जाहीर भूमिका घेणे धार्मिक ध्रुवीकरणाला खातपाणी घालणारे ठरू शकते. बांगला देश सरकारकडेच पाठपुरावा करून हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी.