-विजय चोरमारे
कराड : देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असंसदीय भाषा वापरू लागले आहेत. भाजपकडून पैशाचा अमाप वापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला. कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणाऱ्या चव्हाण यांनी प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातून प्रचार दौ-यादरम्यान प्रवासातच निवडणुकीसंदर्भात गप्पा मारल्या.
कराड दक्षिण मतदारसंघातील परिस्थितीबाबत चव्हाण म्हणाले, आमच्याकडे निवडणूक फक्त पैशावर चालली आहे. त्यांना कामावर लढता येत नाही. भाजप दहा वर्षे केंद्रात, राज्यातही सत्तेवर आहे. विरोधकांना केंद्र, राज्य सरकारकडून कामे करता आली असती, पण साडेनऊ वर्षांत काही केले नाही. लोकसभा पराभवानंतर भाजपवाले घाबरले. भरमसाट खिरापत वाटली. वर्क ऑर्डर न देता कामे धडाधड केली. सहा महिन्यांपासून जाहिरातबाजी सुरू झाली. साडेनऊ वर्षांत भाजपकडून काहीही काम नाही. जे झाले ते लोकप्रतिनिधींना घटनेने, कायद्याने जे अधिकार दिले त्यामार्फत झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे माजी मुख्यमंत्रीही यात पडताहेत, श्रेयवादाचे राजकारण करताहेत. त्यांच्याही पायाखालची वाळू घसरलीय. असंसदीय भाषा वापरू लागलेत. कराडमध्ये येऊन फडणवीस माझ्याबद्दलही काहीबाही बोलून गेले.
यावेळी झालेली प्रश्नोत्तरे अशी :
प्रश्न : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र तुम्हाला कसे दिसते?
पृथ्वीराज चव्हाण : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा मिळाल्या म्हणजे मतांची टक्केवारी तशी होती, तर महायुतीला फक्त ३५ टक्के जागा मिळाल्या. म्हणजे गेल्या दहा वर्षांचे फडणवीस, शिंदे, भाजप सरकारच्या कारकिर्दीचे रिपोर्ट कार्ड महाराष्ट्रातील जनतेचे फेल ठरवले आहे. जे मुद्दे लोकसभेला होते त्यातील एकाही मुद्याची सोडवणूक झाली नाही. महागाईचा मोठा मुद्दा होता त्याच्यावर महिलांना १५०० रुपये द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शेवटी असे आहे, की मागील दहा वर्षांत जी महिलांनी महागाई सहन केली आहे, त्याला जबाबदार कोण आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे, त्याला स्वतः नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. म्हणून लोकसभेला जनतेने त्यांना बाजूला केले. आता परिस्थिती अशी आहे, की नरेंद्र मोदी, अमित शहा व फडणवीस यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही. जनतेच्या मनात राग आहे. ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सरकारने उद्ध्वस्त केले आहे त्यांना ते माफ करतील का? विदर्भात कापसाला जो दर मिळत आहे तो पुरेसा आहे का, त्यांना दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे माझ्या मते ६५ टक्के जागांचे अंदाज हे अजून कायम आहे. तशा धरल्या तर १८५ जागा आम्हाला मिळतील. त्यात आणि दुरुस्ती मी करतो, १५०० रुपयांची जी महिलांना योजना दिली आहे, त्याचा व हरियाणाच्या निकालामुळे आम्हाला थोडा ब्रेक मिळाला ते खरे आहे, मात्र जवळपास १७० ते १७५ पर्यंत आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा माझा अंदाज आहे.
प्रश्न : लोकसभेला जो संविधानचा मुद्दा होता त्याचा व्यापक फायदा झाला. राज्याच्या प्रचारात निवडणुकीत तो राहिलेला नाही…
पृथ्वीराज चव्हाण : हे खरे आहे, की तो ठळकपणे येत नाही. सुरुवातीला लोकसभेला मोदींची ४०० पारची घोषणा होती. त्यांना संविधान बदलायचे होते. निकालानंतर त्यांची मानसिकाता बदलली आहे. ज्या समाजाने त्यांना चारशे पारची शिक्षा दिली, त्यांच्या विरोधात मतदान केले ते त्यांना पुन्हा मतदान करणार नाहीत. ते एकदम मोदींच्या प्रेमात पडणार नाहीत. ही लढाई मानसिकतेची आहे. दगडाखालचा हात निघाला की ते पुन्हा तो मुद्दा पुढे घेणार. १९४७ मध्ये आरएसएसच्या मुखपत्राने सांगितले होते, की आपल्याला नव्या संविधानाची गरज नाही, आपल्याकडे मनुस्मृती आहे. ही मानसिकता बदलली आहे का? तर नाही. त्यामुळे लोकांना ठाऊक आहे, की हे लोक आपल्याला मदत करणार नाहीत. वर्षानुवर्षे छळ करणार आहेत. लोक स्वतःच्या हाताने भाजप व आरआरएसचे सरकार आणणार नाहीत.
प्रश्न : निवडणूक सुरू झाली त्यावेळी लाडकी बहीण योजना, सरकारचे निर्णय यावर महायुतीच्या प्रचाराचा भर होता, पण नंतर बटेंगे ते कटेंगे, एक है तो सेफ है असा प्रचार सुरू केला. हा बदल कशामुळे झाला असावा?
पृथ्वीराज चव्हाण : मुळात भाजप ही फॅसिस्ट पार्टी आहे. त्यांना कुणाचा तरी तीव्र द्वेष करणारी व्यक्ती लागते. आता पाकिस्तान कोलँप्स झाले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. तो मुद्दा नसल्याने समस्त मुस्लिम धर्माची भीती घालायची. आता हिंदू धर्म खतरे मे है असे म्हटले जाते. मुळात आपला धर्म हा पाच ते सहापट मोठा आहे. त्यांना हिंदू धर्मात न्यूनगंड निर्माण करायचा आहे का, त्यांना दुबळे म्हणायचे आहे. म्हणजे एखादा छोटा मुस्लिम समूह हे कसे काय करू शकतो? त्यामुळे हे चालणार नाही. नवी पिढी व तरुण मुले याला बळी पडतात. धर्म ही अफूची गोळी आहे. आपल्याकडे पोलीस यंत्रणा आहे, सैन्य आहे, संविधान आहे. त्यामुळे आपल्याला कोणी हात लावणार नाही.
प्रश्न : विधानसभा निवडणुकीत तुम्हाला कोणते प्रमुख मुद्दे दिसतात?
पृथ्वीराज चव्हाण : पन्नास टक्के जनता शेतीवर उदरनिर्वाह करते. विदर्भ, मराठवाड्यामधील लोकांना भाजपा काय सांगणार? कांद्याची निर्यातबंदी का केली, सोयाबीनला भाव दिला का, तुमचे नेते २०१६ ला म्हणत होते सोयाबीनला सहा हजार दर पाहिजे. आता तर चार हजारसुद्धा मिळत नाही, याला विरोधी पक्ष जबाबदार आहे. मोदींची धोरणे जबाबदार आहेत. एक कोटी ३३ लाख टनाचे सोयाबीन तेल आयात करता, सूर्यफुलाचीं पेंड आयात करता. यामुळे गुजरातच्या तेल व्यापाऱ्यांचा फायदा करत आहात. हे लोकांना कळत नाही का? त्यामुळे आता जी शेतीची दुर्दशा झाली आहे त्याला नरेंद्र मोदी व भाजप जबाबदार आहे.
प्रश्न : महाराष्ट्राचे निर्णय बाहेरच्या लोकांच्या हाती असल्यामुळे महाराष्ट्राच्या हितासंदर्भात भविष्यातील धोके कोणते दिसतात?
उत्तर : महाराष्ट्राच्या जनतेने १०५ हुतात्म्यांचा बळी दिला, मुंबई मराठी लोकांच्या हातात असावी यासाठी. द्विभाषिक राज्य निर्माण केले गेले कारण, मोरारजी देसाई यांना गुजरातच्या लोकांचे हितसंबंध जोपासायचे होते. त्यांना वाटले सुरतेचे उदाहरण घेऊन आपला धंदा बंद करतील. पण मराठी माणसाची एकूण आमची विचारधारा छत्रपती शिवरायांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. स्त्रीदाक्षिण्य, धर्मनिरपेक्ष असल्याने आपल्या मराठी माणसाची मानसिकता तशी नाही. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे चालत नाही. महायुतीच्या नेत्यांतच याबाबत विसंवाद आहे, पण महाराष्ट्राची मानसिकता मोदी, शहा यांना माहिती नाही. या निवडणुकीत शेती महत्त्वाचा मुद्दा आहे. शेती उदध्वस्त झाली आहे. महागाई वाढली आहे, गॅस सिलिंडरचा दर ४०० वरून १२०० झाला. याला काय लॉजिक आहे. तुम्ही डिझेल व पेट्रोल शंभर पार आणले. तुम्हाला केंद्र सरकार चालवता येत नाही, तेलाच्या, डाळींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत.
प्रश्न : बटेंगे तो कटेंगेच्या संदर्भाने अजित पवार थेट विरोधात बोलत आहेत. त्याद्वारे ते परतीचा प्रवास सोपा करत आहेत, असे वाटते का?
पृथ्वीराज चव्हाण : भाजपाच्या या घोषणेसोबत अथवा मोदी विचारसरणीसोबत अजित पवार राहू शकत नाहीत. आता तुम्ही परतीचा रस्ता म्हणता, पण त्यांना परत कोण घेणार, ते माझ्या लक्षात येत नाही.
प्रश्न : विधानसभा निवडणुकीनंतर वेगळी समीकरणे आकाराला येऊ शकतात का, तुम्हाला काय वाटते?
पृथ्वीराज चव्हाण : अपक्षांचा फार मोठा प्रभाव आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे अधिकृत पक्षाचा उमेदवार कमकुवत आहे तिथे राष्ट्रीय पक्ष बंडखोर अपक्षांना मदत करताना दिसत आहे. सांगली पँटर्नप्रमाणे ते कोणत्या विचाराचे येतील ते सांगता येत नाही. मी जो आकडा सांगतिला तो आमच्या विचाराचे अपक्ष असतील त्यासह आहे. तसे नाही झाल्यास घोडेबाजार होऊ शकतो आणि या घोडेबाजारामध्ये मोदी, शहा एक्स्पर्ट आहेत. किमती वाढवून ते करू शकतात.
प्रश्न : पुन्हा त्यामध्ये राज भवनाची भूमिका महत्त्वाची ठरेल का? भाजपने राज भवन व न्यायव्यवस्थेच्या आधारे काही गोष्टी यापूर्वी केल्या आहेत.
पृथ्वीराज चव्हाण : सत्तातरांचे जे नाटक झाले, शिंदे सरकार स्थापन झाले, त्यात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका मला अजिबात मान्य नाही. त्याविषयी आपण जादा बोलू शकत नाही. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार काम करत आहे. त्याला सर्वोच्च न्यायालय काम करू देत आहे ते चुकीचे आहे. अशी अस्थिर परिस्थिती ते पुन्हा निर्माण करतील.