कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून महाळ घातला जातो. महाळाच्या नैवेद्यात मोहराच्या भाजीला (Mohar Bhaji) मान असतो.
महाळाच्या नैवेद्य बनवताना भेंडी, काटे भेंडी, दोडका, मेथी, चवळीच्या शेंगा, आळू, रानकारली, गवारी या भाजांचा समावेश असतो. पण सर्वांत महत्त्वाची भाजी म्हणजे मोहर. मोहर ही पश्चिम घाटात उगवणारी जंगली भाजी. या भाजीचा वेल केवळ पावसाळ्यात उगवतो. पश्चिम महाराष्ट्रासह सह्याद्री घाटात गाबोळी, शेंडवेल, चाईचा मोहोर, मुळशीची भाजी, मांदा, येलरगंडू या नावानेही ती ओळखले जाते. Dioscorea pentaphylla असे तिचे शास्त्रीय नाव आहे. (Mohar Bhaji)
पावसाळ्यात मोहराच्या कंदाला कोंब फुटतात, पाने येतात. या कोवळ्या पानाला घोटवेल म्हणतात. या पानांचीही भाजी केली जाते. मोहोराचा वेल झाडाच्या आधारे पंधरा ते वीस फूट वाढतो. पावसाळ्यानंतर मोहराचा वेल कोमेजून जातो, पण त्याचे कोंब जमिनीवर तसेच राहतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा कोंब फुटतात. हे निसर्गचक्र वर्षोनवर्ष सुरू राहते. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्याच्या जंगलभागात ही भाजी उगवते. कोल्हापूर शहराजवळील कात्यायणी, हणबरवाडी, दऱ्याचे वडगाव या परिसरातही ही भाजी येते.
पितृपंधरवड्यात मोहरला मोठी मागणी
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोहराच्या वेलाला मोहरीसारखी बारीक गोल फळे धरतात. त्याचे झुपके आंब्याच्या मोहरासारखेच असतात. पितृपंधरवड्यात या भाजीला मोठी मागणी असते. या काळात भाजी विक्रेतेही ‘मोहर घ्या मोहर,’ अशी हाकाटी देत गल्लोगल्ली फिरत असतात. मंडईतही मोहराचे ढीग दिसतात. घरात आणलेली भाजी निवडून स्वच्छ केली जाते. त्यानंतर बारीक चिरुन गरम पाण्यात उकळून पिळून घेतली जाते. बारीक कांदा, लसूण, जिरे, मोहरीच्या तेलाची फोडणी देऊन मिरची किंवा तिखटाचा वापर केला जातो. तिची चव अप्रतिम असते. मोहोराची भाजी आयुर्वेदात गुणकारी मानली आहे. ती शक्तिवर्धक आहे. अंगाला सूज आली असेल मोहोराचा कंद गरम करुन बांधला जातो.
मोहराची भाजी आरोग्यदायी आहे. म्हाळाच्या नैवेद्यात पूर्वापार या भाजीला स्थान आहे. ती भाजी शक्तिवर्धक आहे.
– अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक
हेही वाचा