पांडबा गेला… मोबाईलवर आलेल्या मेसेजवर खरं तर विश्वासच बसत नव्हता. मेसेज करणाऱ्याला क्षणात कॉल करून नेमकी माहिती घेतली व कितीतरी वेळ पांडबाच्या स्वभाववैशिष्ट्यावर दोघही बोलत राहिलो. त्याची ही आकस्मिक ‘एक्झिट’ अनेकांना हळहळ लावणारी. पांडबा म्हणजे पांडुरंग जोती आडसुळे. कोल्हापुरातील माजी नगरसेवक. अतिशय साधा माणूस. वागणे, बोलणे एकदम साळढाळ. स्पष्टवक्ता. सारे काही रोखठोक. व्यक्तिमत्त्व म्हणाल तर प्रथमदर्शनी समोरच्यावर छाप पडावी असे मुळीच नाही. पण एकदा का या माणसाच्या संपर्कात तुम्ही आलात की तो कधी तुम्हाला आपलेसे करून टाकेल हे कळायचेही नाही. भरपूर बोलायची सवय. तेही खास कोल्हापुरी भाषेत. एखाद्याच्या नावातील शेवटचे अथवा शेवटून अलीकडील काही अक्षरे फोडून, मोडून त्याला ‘या’ जोडले की इथल्या बोलीभाषेतील ‘खास’ शब्द तयार होतो. त्याला स्थानिक भाषेचा एक ओलावा असतो. पांडबाची अशी हाळी त्यातील आपुलकीसह अनेकांनी अनुभवली असेल. भले त्यात एकेरीपणा असला तरी पांडबाच्या तोंडून ती हक्काने आली असल्याने आदरार्थी वाटत असे. त्यात पांडबाच्या स्वभावातील गोडव्याची, भाबडेपणाची झलक असायची. नगरसेवक असतानाही त्याची ओळख साहेब किंवा दादा, अण्णा, तात्या, मामा अशा विशेषणांनी न राहता पांडबा अशीच अनेकांसाठी राहिली.
नगरसेवक या पदाचे वर्तमान काळातील वलय आपण पाहतोच आहे. तो विषय इथे नाही, पण आडसुळे ज्या काळात या पदावर होते तो काळही फार जुना नाही. कोल्हापुरातील गंजीमाळ या प्रभागाचे १९८५ ते १९९० या काळात त्यांनी प्रतिनिधित्व केले. नंतर त्यांच्या पत्नी चंद्रभागा आडसुळे याच प्रभागातून १९९० ते १९९५ या कालावधीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. गंजीमाळ हा प्रभाग आताचे जे टिंबर मार्केट आहे, त्या परिसरात आहे. सर्वसामान्यांची वस्ती. पदाचा उपयोग आडसुळे यांनी प्रामुख्याने गोरगरिबांची कामे मार्गी लावण्यासाठी केला. प्रसंगी अशा कामांसाठी ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये निर्भीडपणे जात व काम मार्गी लागण्याचा आग्रह धरत. एरवी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी म्हटले की त्यांच्यातील परस्पर विचारांची आणि समजून घेण्याची नाळ जमेलच असे नाही, पण आडसुळे यांची कार्यशैलीच अशी, की ते कोणालाही आपले वाटायचे. महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांच्या कर्तृत्वाबद्दल कोल्हापूरकर आजही आदरानेच बोलतात. त्यांचे नाव महापालिकेच्या एका शाळेला देण्याचा ठराव करून घेण्यात याच आडसुळेंनी पाठपुराव्याची भूमिका बजावली होती. आयुक्त सुधाकर जोशी यांच्या काळात संभाजीनगरातील झोपडपट्टीस अधिकृत मान्यता व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम झाले. त्या वसाहतीला सुधाकर जोशी नगर असे नाव देण्याच्या कामीही आडसुळे यांचा पुढाकार होता. राज्यपातळीवर मोठे नाव असलेल्या एका राजकीय नेत्याने त्यांच्या संस्थेसाठी शासकीय जमीन मिळवताना उचित प्रक्रिया पार पाडली नसल्याचा आक्षेप घेत आडसुळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी अनेक प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्रांतही त्याच्या बातम्या झाल्या होत्या. माहिती अधिकाराचा वापर करुन त्यांनी काहींना चाप बसवला.
नगरसेवक असतानाही आडसुळे यांनी कधी पदाचा आविर्भाव मिरवला नाही. पदावर नसताना तर तो प्रश्नच असण्याचे कारण नव्हते. अगदी अलीकडेच त्यांच्या एका स्वत:च्या कामानिमित्ताने ते महापालिकेत पाठपुरावा करत होते. ते मार्गी लागण्याच्या टप्प्यात होते. निवडणूक आचारसंहिता संपताच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात आले होते. आता आचारसंहिता संपली असली तरी आडसुळे यांच्या जीवनयात्रेचीही सांगता झाली आहे.