– कॉ. धनाजी गुरव
चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. बडवे-उत्पात यांचा यापैकी कोणत्याही संकल्पना व व्यवहारात काडीचाही संबंध नाही.
बडवे आणि उत्पातांची परंपरा ही वारकरी परंपरा नाही. ते ब्राह्मण धर्माचे पालन करतात. त्यांचा देव वेगळा, विठ्ठल वेगळा. हा फरक सर्व वारकरी संतांच्या साहित्यातून स्पष्ट झालेला आहे. ‘जेंव्हा नव्हते चराचर | तेंव्हा होते पंढरपूर ||’ असे संत नामदेव पंढरपूरचे कौतुक सांगतात. चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. या सर्व विकासाचे करते करविते वारकरी संत आहेत. बडवे-उत्पात यांचा यापैकी कोणत्याही संकल्पना व व्यवहारात काडीचाही संबंध नाही. तरी सुद्धा विकसित झालेल्या केंद्रात घुसून सांस्कृतिक सत्तेचा वापर करायचा व राज्यसत्तेला वापरायचे हे तत्त्व नेहमीच वापरले गेले. यादव राजे हे ब्राह्मण धर्माचे समर्थक होते, त्यामुळे बालाजीचे व विठ्ठलाचे कब्जे बडवे व इतर ब्राह्मण पुरोहितांना घेणे शक्य झाले, हे रा. चिं. ढेरे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. विठ्ठल बिरदेव (पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर ) वाचला याचे कारण वेगळ्या विचाराचे राज्यकर्ते हेच आहे. याचा अलीकडच्या काळातील एक अनुभव आपल्या पदरी जमा आहे. वाडीरत्नागिरीच्या जोतिबावर ब्राह्मणांनी हक्क सांगितला होता, पण राज्यकर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी तो हक्क नाकारला.
घातपाताने विठ्ठलाचा ताबा
यादवांच्या काळात घातापातानेच बडवे-उत्पातांनी विठ्ठलाचा ताबा घेतला असावा, असा निष्कर्ष रां.चिं. ढेरे यांच्या अभ्यासातून निघतो. तेंव्हापासून समतेची परंपरा असलेले वारकरी संत आणि ब्राह्मण श्रेष्ठत्व जोपासून सामाजिक विषमतेचे समर्थन करणारी बडव्यांची परंपरा यामध्ये संघर्ष चालूच आहे. वारकरी संत आणि बडव्यांच्या संघर्षाचा इतिहास फार मोठा आहे. संत साहित्यात त्याची जागोजाग प्रचिती येते. हा संघर्ष किती जीवघेणा होता हे संत जनाबाई व संत चोख मेळा यांच्यावर घातलेल्या खोट्या केसेस आणि सुनावलेली देहदंडाची शिक्षा यावरून लक्षात येते. या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही, यातील मुस्लिम राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप किती हे शोधावे लागेल. तेंव्हापासूनच बडव्यांच्या विरोधातील आंदोलन चालू झाले.
राबणाऱ्या बहुजन समाजाला आपल्या जाळ्यात ओढत बडव्यांनी नेहमीच डावपेच केले आहेत. त्यांनी समतेची वारकरी परंपरा बाधित केली. दिल्लीच्या मोगल सम्राटांना याचे भान बाळगणे आवश्यक नव्हते. नंतर इंग्रजांना ते महत्त्वाचे वाटले नाही. परिणामी बडव्यांनी या काळात ब्राह्मण धर्म विठ्ठलावर लादला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. स्वातंत्र्यानंतर याला विरोध करणारे पहिले आंदोलन १९४८ साली, तत्कालीन समाजवादी नेते साने गुरुजींनी उभे केले. त्यांनी एक मे १९४८ ला अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी उपोषण चालू केले. दहा दिवस हे उपोषण चालले. त्या नंतर अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश द्यावा लागला.