मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१) केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, उत्तर प्रदेशमधील संभलचे प्रकरण असेल, या बाबतीत ‘प्रार्थनास्थळ कायदा, १९९१’च्या माध्यमातून घटनाबाह्य काम करून देश पेटवला आहे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण दिले आहे. त्याच घटनाबाह्य सरकारचे काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात असून काळजीवाहू सरकार देखील संविधानविरोधी आहे. या सगळ्याला चंद्रचूड जबाबदार आहेत”.
संजय राऊत म्हणाले, “२६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक होते. आता भाजपावाल्यांचे कायदेपंडीत येतील, कुठलेही कागद दाखवतील आणि हे काळजीवाहू सरकार कसे योग्य आहे. ते सांगतील. मात्र, आज महायुतीच्या जागी महाविकास आघाडी असती तर एव्हाना या लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे बहुमत आहे तरी त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही.
भारतीय जनता पार्टीचा विधीमंडळ पक्षनेता देखील ठरलेला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, मोठे बहुमत आहे. तरीदेखील त्यांना विधिमंडळाचा नेता निवडता आलेला नाही. ते सरकार स्थापनेचा दावा करू शकलेले नाहीत. इतकेच काय तर सरकार स्थापनेसाठी कोणी राज्यपालांना भेटले देखील नाही आणि राज्यपाल देखील हे सगळे चालू देत आहेत.
५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल. हे सांगायला चंद्रशेखर बावनकुळे काय राज्यपाल आहेत का? अशी विचारणा करत राऊत म्हणाले की, त्यांना हे अधिकार आहेत का? आणि हे अधिकार त्यांना कोणी दिले? राज्यपालांनी बावनकुळेंना कळवले आहे का? एकीकडे हे महायुतीवाले सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. बावनकुळे पाच तारखेची घोषणा करत आहेत.
शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टर हवे की, मांत्रिकाची गरज आहे. हे पहावे लागेल, असा टोला लगावत राऊत म्हणाले की, दिल्लीतून मोदी किंवा अमित शाह त्यांना ते नक्कीच पाठवून देतील.’