राहुल मगदूम : मुंबई येथे झालेल्या फिल्म फेअर सोहळ्यात फिल्मफेअर ओटीटी आणि विशेष ज्युरी पुरस्कार ‘देशकरी’ या लघू चित्रपटाला मिळाला. राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे ‘देशकरी’चे चित्रिकरण झाले. लघु चित्रपटात स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे. पुरस्कार स्विकारल्यानंतर देशकरीचे कोल्हापूरचे सुपूत्र निर्माते-दिग्दर्शक संजय दैव ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना म्हणले की, कोल्हापूरच्या मातीत मोठी कला आहे. येथील विविध कलांच्या मांडणीमध्ये वेगळी दृष्टी आहे. त्यामुळे भविष्य काळात कोल्हापूर चित्रपट सृष्टीला चांगले दिवस आहेत. (Sanjay Daiv)
संजय दैव म्हणाले, देशकरीला भारतातून सर्व विभागातून पुरस्कार मिळाले आहेत. “जय जवान जय किसान ” नारा दिला जातो. पण, शेतकरी उपेक्षित का राहतो? असा प्रश्न शेतकऱ्याच्या नातवाला पडतो. देशकरीच्या माध्यमातून सर्वांनी शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा अशी भावना आहे. लघुपटात ही तफावत दाखविली आहे. याचे सर्व काम एकत्र बसून ठरवले आणि केले त्याचे हे यश म्हणावे लागेल.
कोल्हापूर जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा असून बहुतांश खेड्यातील मुले ही सैन्यदलात आहेत. त्या सर्वांची पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे. यातून मला प्रेरणा मिळाली असे त्यांनी सांगितले. त्यांना कायम प्रश्न सतावत होता की, सैन्यदलातील जवान वर्दीवर असताना त्यांना पाहून आपल्याला अभिमान वाटतो, उर भरून येतो. त्यांना आपण त्याठिकाणी मान सन्मान देतो. पण सगळ्या जगाचे पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या जवानांच्या वडिलांना म्हणजेच शेतकऱ्याला आपण सन्मान देतो का? त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू घेताना सुध्दा काहींचे वर्तन योग्य नसते. शेतकऱ्यांना सुध्दा सन्मान आणि महत्त्व देण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे याचा सतत मी विचार करत होतो असे दैव म्हणाले. (Sanjay Daiv)
संगीत दिग्दर्शक ऐश्वर्य मालगावे म्हणाले, सुरवातीपासून सहभागी असल्यामुळे आणि पूर्ण संकल्पना माहिती असल्याने संगीताच्या बाबतीमध्ये जीव ओतून काम करत गेलो. लघुपटात प्रथमच सिंग साँग करण्यात आले आहे. पार्श्वसंगीतही भावनेला साद घालेल असे केले. कलाकार अनिकेत लाड माझी कौटुंबिक पार्श्भूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे. पुरस्कार मिळाल्याने मला अत्यानंद झाला आहे.
या लघुपटाने आतापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. तर १५ ठिकाणी नामांकन मिळाले आहे. पटकथा वैभव कुलकर्णी, छायांकन विक्रम पाटील, संगीत दिग्दर्शक ऐश्वर्य मालगावे यांचे आहे. यामध्ये मारुती माळी, श्रद्धा पवार, अनिकेत लाड, अमृता खांडेकर, प्रमोद कुलकर्णी, साधना माळी, आसावरी निगवेकर, सुरेश पाटील, शिवाजी वडणगेकर, राजू कुलकर्णी, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बुटके, डी.के.पाटील यांच्यासह बालकलाकारांच्या भूमिका आहेत.
सर्व कलाकार, तंत्रज्ञ कोल्हापूरचे
निर्माता-दिग्दर्शक संजय दैव यांनी साकारलेल्या लघुपटात सर्व कलाकार, तंत्रज्ञ कोल्हापूरचे आहेत. लघुपटाचे चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगाव या गावात झाले आहे. प्रतिभा नगर येथे राहणाऱ्या संजय दैव यांचे शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल, दळवीज् आर्ट्स कोल्हापूर आणि त्यानंतर पुढील शिक्षण जे. जे. आर्ट मुंबईत झाले.
हेही वाचा :