डेहराडून : लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला, तरी भारताने भविष्यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत लवकरच धावताना दिसेल. नवा रेल्वे ट्रॅक चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते बागेश्वर दरम्यान बांधला जाणार आहे. या १६९ किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
हा रेल्वे मार्ग हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमधून जाणार असून चीनच्या सीमेवर पिथौरागढ आणि बागेश्वरपर्यंत पोहोचणार आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, नवीन रेल्वे मार्ग रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण पिथौरागढ जिल्हा नेपाळ आणि चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमेला जोडलेला आहे. टनकपूर हे भारत-नेपाळ सीमेवरील एक क्षेत्र आहे आणि उत्तराखंडमधील नेपाळ सीमेवरील भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. या मार्गावर सर्वेक्षणासह खांब बसविण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या रस्त्याने चीन सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी १६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पिथौरागढ जिल्ह्यातील उंच हिमालयीन भागात चीनला जाण्यासाठी ५ पास आहेत. यामध्ये लुम्पिया धुरा, लेविधुरा, लिपुलेख, उंट जयंती आणि दरमा पासेसचा समावेश आहे. हे सर्व ५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये जलद पुरवठा करणे लष्करासाठी आव्हानात्मक आहे.
टनकपूरहून पिथौरागढमार्गे चीनच्या सीमेपर्यंत गेलात, तर रस्त्याने १६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. नवीन रेल्वेमार्ग टाकल्यानंतर हे काम दोन ते तीन तासांत होईल. नोएडाच्या ‘स्कायलार्क इंजीनिअरींग डिझायनिंग प्रायव्हेट लिमिटेड’च्या टीमने हे सर्वेक्षण केले आहे. ब्रिटिशांनीही दीडशे वर्षांपूर्वी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण केले होते. उत्तराखंडचा हा भाग शतकानुशतके सामरिक आणि व्यावसायिक महत्त्वाचा आहे. कारण या सीमावर्ती जिल्ह्यांतील लोक तिबेटशी सीमावर्ती व्यापार करत आहेत. त्यामुळे इंग्रजांनी टनकपूर-बागेश्वर रेल्वे मार्गाचेही पहिल्यांदा १८८२ मध्ये सर्वेक्षण केले. त्यांच्या सर्वेक्षण योजनेच्या मार्ग नकाशावर नव्याने सर्वेक्षण करण्यात आले.
पुढच्या महिन्यापासून ट्रॅक टाकणार
डिसेंबरपासून येथे ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. १२५ किलोमीटर मार्गापैकी ८५ किलोमीटरमध्ये बोगदे खोदण्यात आले आहेत. रेल्वे विकास निगमचे व्यवस्थापक अजित सिंह यादव यांच्या म्हणण्यानुसार, आणखी १६ किलोमीटर बोगदा खोदायचा आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करायचे आहे. हे रूट ब्लास्ट कमी तंत्रज्ञानावर बनवले जाते. त्यावर हायस्पीड बुलेट ट्रेनही धावणार आहे. या ट्रॅकवर १३ स्थानके आणि १६ बोगदे असतील.