– प्रा. प्रशांत नागावकर
नलिनी सुखथनकर लिखित पुरुषपात्र विरहीत दोन अंकी विनोदी नाटक ‘पंडित धुंडिराज’ मोठ्या उत्साहाने सादर झाले. मराठी रंगभूमीला सव्वादोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या प्रवासात स्त्री नाटकांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. सोनाबाई चिमाजी केरकर या पहिल्या स्त्री नाटककार. ‘कस्तुरी गंध’ हे त्यांचे १८८० मधील नाटक. याबाबतही मतभेद आहेत. काहीजण आद्य स्त्री नाटककराचा मान काशीबाई फडके यांना देतात. त्यांनी १८९१ साली ‘संगीत छत्रपती संभाजी’ हे नाटक लिहिलेले होते. त्यानंतर १६४ वर्षात स्त्री नाटककारांची संख्या तीस पेक्षा अधिक नाही. हे सर्व लिहिण्यामागचे कारण नलिनी सुखथनकर यांचे पुरुष पात्र विरहित नाटक ‘पंडित धुंडीराज’. दि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने हे नाटक १९७० साली रंगमंचावर आणले आणि पुस्तकाच्या रूपाने ते १९७१ साली प्रसिद्ध झाले.
पंडित धुंडीराज मार्तंड दगडकर देवस्थळे हे एक अवलिया गृहस्थ. खऱ्या अर्थाने ‘उद्योगपती.’ मुंबई कोल्हापूर गोवा आदी ठिकाणी त्यांचे ‘कारभार’ आहेत. असे गृहस्थ एके दिवशी अचानक गायब होतात. ते कुठे आहेत, कुठे गेले याचा कुणालाही पत्ता नाही. मुंबईच्या त्यांच्या घरामध्ये त्यांचे अचानक असे निघून जाणे हे सवयीचे असते. पण कोल्हापूरला राहणारी त्यांची दुसरी बायको बरेच दिवस ते कोल्हापूरला फिरकले नाहीत म्हणून मुंबईत येते. याचा मुंबईमधल्या बायकोला आणि मुलीला धक्का बसतो. तो धोका पचतो ना पचतो तोच गोव्यातील त्यांची तिसरी बायकोही मुंबईमध्ये येऊन दाखल होते. त्यानंतर पंडितांचे खरे रूप बाहेर येते. त्यांच्या एकूणच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा शोध लागतो. त्यांना एकूण तीन बायका आहेत हे समजल्यावर एकच कल्लोळ उठतो. एकूणच मजेदार कथानकाने व गमतीदार प्रसंगाने नाटक रंगतदार झाले. मोठ्या उत्साहाने सर्व स्त्री कलाकारांनीही ते सादर केले.
कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी तेही महिला डॉक्टरांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या नाटकात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. एक गमतीदार नाटक सादर करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वच महिला कलाकारांचं रंगभूमीवरील पहिलं पाऊल. नवखेपणाच्या खुणा जाणवूनही त्यांनी ज्या आत्मविश्वासाने नाटक सादर केले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाला प्रसन्न जी. कुलकर्णी यांची दिग्दर्शकाच्या रूपाने बहुमोलाची साथ लाभली. प्रसन्न जी. कुलकर्णी हे कोल्हापूरच्या नाट्य क्षेत्रातील एक दिग्गज नाव.
वर उल्लेख केल्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील या महिला डॉक्टरांचे रंगभूमीवरील पहिलेच नाटक. साहजिकच त्यांच्या अभिनयात नवखेपणाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत होत्या. अभिनयाची कृत्रिम शैली चटकन जाणवली गेली. अनेक ठिकाणी ‘ओव्हर ॲक्टिंग’ हा प्रकार दिसून आला. पण विनोदी नाटकामुळे खपून गेले. प्रत्येक स्त्री कलाकाराने सादरीकरणात प्रामाणिक योगदान दिले.
सुनंदा झालेल्या डॉ. अमृता लगारे अतिशय उत्साहाने रंगमंचावर वावरल्या. त्यांनी उभी केलेली सुनंदा बऱ्यापैकी समजून घेऊन सादर केली. सुनंदाच्या भूमिकेसाठी योग्य असलेला तारुण्यातील सळसळतापणा त्यांनी चांगल्या स्वरूपात सादर केला. डॉ. हेमांगी वलके आणि डॉ. स्फूर्ती जाधव यांनी अनुक्रमे पार्वती आणि मालती यांची भूमिका साकारली. या दोघींनी प्रेक्षागृह सतत हसवत ठेवले. एक प्रकारची कृत्रिम अभिनय शैली या पात्रांसाठी आवश्यकच होती तीच त्यांनी केली. डॉ. तृप्ती पवार यांनी चंद्रा अतिशय ठसकेबाज रूपात सादर केली. सुनंदाची भूमिका डॉ.र ऋतुजा कदम यांनी केली. आपल्या अभिनयातून भूमिकेचा तोल त्यांनी व्यवस्थित सांभाळला होता. डॉ. प्रज्ञा गायकवाड यांनी महानंदाची भूमिका व्यवस्थित साकारली. सुरुवातीचा बुजरेपणा आणि सुनंदाच्या सहवासात आल्यानंतर व्यक्तिमत्त्वात झालेला सकारात्मक बदल त्यांनी तितक्याच समजूतीने सादर केला. जयमाला शिरोडकर ही छोटी भूमिका डॉ. नीलम बेलेकर यांनी उत्तमपणे साकारली.
डॉ. यशोदा जाधव यांनी म्हाळसा खऱ्या अर्थाने अतिशय उत्तमपणे साकारली. संपूर्ण नाटकाचा तोल त्यांनी व्यवस्थित सांभाळला. त्यांच्या संवादफेकीतून कोल्हापुरी ठसका स्पष्ट जाणवत होता. रंगभूमीवरील त्यांचा वावर सहज होता. नवेपणाच्या खुणा असल्या तरी त्यांनी त्या जाणून न देता अतिशय परिश्रमपूर्वक आपली भूमिका साकारली.
तांत्रिक बाबींमध्ये कपिल मुळे यांच्या प्रकाश योजनेत खूप सफाईदारपणा आढळून आला. प्रकाश योजनेतील भपकेबाजपणा जाणीवपूर्वक टाळला आहे. नाट्यक्षेत्रातील त्यांचा अनुभव त्यांच्या प्रकाश योजनेतून जाणवला. नाटकातील प्रसंगांना साजेसे पार्श्वसंगीत, वेशभूषा त्या काळाला साजेशी अशीच होती.
दिग्दर्शक म्हणून प्रसन्न जी. कुलकर्णी नेहमीसारखेच यशस्वी ठरले. नवख्या कलाकारांना घेऊन काम करणे हे खूपच जिकिरीचे असते. पण येथे नाट्यक्षेत्रातील त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव कामी आला. त्यांनी सर्व कलाकारांकडून अतिशय उत्तमपणे काम करून घेतले. एकूणच नवख्या आणि स्त्री कलाकारांनी अतिशय उत्साहात नाटक सादर केले.
नाटक : पंडित धुंडीराज
लेखक : नलिनी सुखथनकर
सादरकर्ते : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर
दिग्दर्शक : प्रसन्न जी. कुलकर्णी
भूमिका आणि कलावंत
सुनंदा : डॉ. अमृता लगारे
अरुंधती : डॉ. ऋतुजा कदम
मालती : डॉ. स्फूर्ती जाधव
चंद्रा : डॉ. तृप्ती पवार
महानंदा : डॉ. प्रज्ञा गायकवाड
म्हाळसा : डॉ. यशोदा जाधव
जयमाला : डॉ. नीलम बेलेकर
तंत्रज्ञ
नेपथ्य : डॉ. हेमांगी वलके
प्रकाश योजना : कपिल मुळे
पार्श्वसंगीत : नीलम बेलेकर
रंगभूषा : नयना पाटील
वेशभूषा : डॉ. स्फूर्ती जाधव