-माधुरी केस्तीकर
लक्ष्मीपूजनाच्या रात्री माझ्या मुलाच्या मित्रांचा फोन आला “काकी घरी आहात का” मी “हो” म्हटलं आणि ही मुलं वाट वाकडी करून मला भेटायला आली. माझा मुलगा शिकायला बाहेरगावी आहे आणि म्हणून विचारपूस करायला ही मुलं वाट वाकडी करून मला भेटायला आली. जाताना पुन्हा पुन्हा सांगून गेली की “काकी काही लागलं तर केंव्हाही फोन करा” मला खात्री आहे मी जेंव्हा फोन करेन तेंव्हा ही मुलं धावत येतील.
या मुलांची मैत्री मला शब्दात मांडता येणार नाही पण जेंव्हा “या गोष्टीला नाव नाही” हा चित्रपट पाहिला तेंव्हा खूप काही उलगडल्यासारखा वाटलं ! माझ्या माहेरी परंपराच आहे होस्टेलला राहण्याची. माझे वडील, माझा भाऊ आणि मी स्वतः हॉस्टेलला राहिलेली आहे, आणि त्यामुळे हॉस्टेल लाईफ माहिती आहे. जगाकडे बघण्याची दृष्टी कशी असते आणि जग कसं असतं ते लक्षात आहे . मुकंद चा मुक्या, रोह्या, सच्या त्यांचा कटिंग चहा, एकांकिका, गाण्याचे कार्यक्रम बघता बघता कधी आपण त्यांच्यात गुंतत जातो कळतच नाही. हा चित्रपट जवळचा वाटण्याचा आणखीन एक कारण म्हणजे यातले बरेच चेहरे ओळखीचे आहेत.
इचलकरंजी परिसरातील पराग, कादंबरी, सौरभ, पंडित ढवळे, कृष्णा, संतोष आबाळे सर, सीमा मकोटे कितीतरी चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर बघताना खूप आनंद होत होता. त्याचबरोबर ज्या कॉलेजचा चित्रीकरणासाठी उपयोग केलेला आहे ते कॉलेजही जवळचं. या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त या कॉलेजच्या पंचवीस वर्षातील विद्यार्थ्यांना भेटले होते, त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि माझी स्वतःची दोन मुलं या कॉलेजमध्ये शिकतात. पाडव्याला या परिसरात होणारी मैफल ऐकताना आणि या कॉलेजची इमारत बघताना नेहमी वाटायचं की कोणीतरी याचा सुंदर वापर केला पाहिजे.
एक लोकेशन म्हणून हे भन्नाट आहे. मुळात हा एक राजवाडा पण आता तिथं तरुणाईचं चैतन्य सळसळत असतं. या दगडी भिंती ही खूप बोलतात. कान देऊन ऐकलं तर खूप काही सांगतात. दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या भिंतींचं मनापासून ऐकल़ आहे. त्यांनी इमारतीला केवळ दगडी वास्तू म्हणून उभी केलेलं नाही तर एक व्यक्तिरेखा म्हणून सादर केली आहे. टेक्स्टाईल कॉलेज असल्यामुळे लूम्स आणि त्या अनुषंगाने येणारी मशिन्स ही सुद्धा इथे पण महत्त्वाची ठरतात. “ती तुझ्याकडे बघून हसते” या एका वाक्यावर किती प्रेम प्रकरण जुळलेली असतील हे प्रत्येकाला ठाऊक असतं. वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातून येणारी मुलं डोळ्यात स्वप्नं, खांद्यावर जबाबदारी ही घेऊन येतात. नव्या गुलाबी स्वप्नवत वाटणा-या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांच काय होत असेल? हेच हा चित्रपट अगदी सहज पद्धतीने सांगून जातो. चूक की बरोबर ही चिकित्सा करत नाही, तर जसं घडतं तसं सांगत जातो.
नव्या जगात नवी क्षितिजं खुणावत असतानाही अभ्यासाचा हात घट्ट धरून असणारी मुलं सुद्धा आपल्याला माहिती असतातच की, पण त्यांच्या ही मनात उलथापालथ होतच असेल. पहिल्या भागात इमारत भेटत राहते, तर दुस-या भागात निसर्ग गारुड करुन टाकतो. या निसर्गाला समांतर आहेत आज ही खेड्यातून घट्ट असणारे नातेसंबंध!
मोठ्या भावाची भीती दरारा पहिल्या भागात जाणवतो पण दुसऱ्या भागात जाणवतं ते त्याचं निखळ निःस्वार्थी प्रेम आणि लहान वयातली मोठ्या जबाबदारीची जाणीव. हे प्रेम जसं गावातून शब्दांपेक्षा कृतीतून जास्त दिसतं तसंच इथं ही कृतीतून दिसतं, त्यासाठी पल्लेदार संवाद इथे येत नाहीत. माझं चुकलं हे मान्य करण्याची हिंमत गावाकडच्या माणसात असते, हे मी तटस्थपणे अनुभवलं आहे, त्यामुळे भावाला बरं करायचंच आणि त्यासाठी मी काहीही करेन पण तो बरा होणारच हा आत्मविश्वास असणारी माणसं अजून ही गावात भेटतात बरं का!
पुढे काय होतं ? ते समजावून घ्यायला चित्रपटच पहायला हवा. हा चित्रपट एखाद्या संथ नदीसारखा वाहत राहतो. काहीही न करता तासनतास संथ वाहणाऱ्या पाण्याला बघण्याचा अनुभव किंवा मोबाईल वगैरे न घेता एखाद्या गवताच्या वाळलेल्या पात्याबरोबर खूप वेळ घालवला असेल तर तुम्हांला हा चित्रपट नक्की आवडेल. सध्या रील बघताना सलग तीस सेकंद बघण्याची ही सहनशीलता उरली नाही, माझीही, पटापट स्क्रोल केली जाते हो स्क्रीन! त्यामुळे हा चित्रपट थोडा संथ वाटण्याची शक्यता आहे. मी बरेच वेळा खेड्यातल्या बायकांच्या निवांत गप्पा ऐकल्या आहेत, जराशा वयस्कर बायका एकत्र येऊन गप्पा मारत असतात. काहीही काम न करता नुसत्या गप्पा! बोलता बोलता एखादी कोणाच्या तरी आयुष्याविषयी सांगायला लागते, ती तिच्या पद्धतीने सांगत असते अगदी साध्या सोप्या शब्दात, तरीही तिची स्वतःची बोलण्याची सांगण्याची एक शैली असते, हळुहळू ते चित्र मनात उभं राहतं, ती सांगत असलेल्या व्यक्ती मनात आकार घेतात, बाकीच्या मन लावून ऐकत असतात, कदाचित तिच्या मैत्रिणी कथेतल्या व्यक्तींना ओळखत असतात, आपण नाही, आपण त्रयस्थ, तरीही आपण ही गुंततो त्या गोष्टीत, कधीतरी चुकून ज्यांच्या विषयी बोललं गेलं होतं त्या व्यक्ती अकस्मात भेटतात, मग लक्षात येतं अरे त्या बायका काहीच करत नव्हत्या असं मला वाटतं होतं, त्यांनी त्या निवांत वेळात, साध्या सुध्या गप्पांतून खूप काही केलं आहे.