कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता शनिवारी पूर्ण झाली. त्यानंतर संध्याकाळपासून नियमीत दर्शन सुरू झाले. येत्या दोन ते तीन दिवसांत मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण होईल. मंदिराच्या आवारात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
मंदिरातील चांदीच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. देवीच्या खजिन्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता सुरू आहे. ते काम रविवारी, २८ सप्टेबरला पूर्ण होणार आहे. मंदिराच्या पूर्वेला दर्शनरांग उभारण्यात आली आहे. ऊन आणि पावसाची लक्षात घेऊन या ठिकाणी पंखे, इलेक्ट्रिक सुविधा आणि मॅट टाकण्यात येणार आहे. माहिती कक्ष, लाडू प्रसाद सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. उत्सवकाळातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तातडीने गरुड मंडपाच्या जागी छत उभारण्यात आले आहे. त्याचे उर्वरित काम एक-दोन दिवसांत पूर्ण होईल.
टेंबलाई मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा
दरम्यान, टेंबलाई मंदिर परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने हे काम सुरू आहे. नवरात्रोत्सवात ललित पंचमीचा उत्सव टेंबलाई मंदिरात होतो. त्यादृष्टीने या यंत्रणेचा उपयोग पोलिस प्रशासन व देवस्थान समितीला होणार आहे.