कोल्हापूर : प्रतिनिधी ;
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी १८ हजार ३३७ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली. विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला असून, महायुतीने जोरदार बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी दहा जागांवर महाविकास आघाडीला झटका बसला असून, कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विजयासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही कंबर कसली होती. या मतदारसंघातून ११ उमेदवार जरी रिंगणात असले, तरी मुख्य लढत ही भारतीय जनता पक्षाचे अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यातच होती. अमल महाडिक यांनी प्रथम पोस्टल वगळता पहिल्या फेरीमध्ये ७४७ मतांची आघाडी घेतली. तेथून त्यांचे लीड वाढत गेले. पाच फेऱ्या वगळता ऋतुराज पाटील यांना कोठेही लीड मिळाले नाही. अमल महाडिक यांचे लीड दहा हजारांहून अधिक झाल्यानंतर त्यांच्या शाहूपुरीतील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोषाला सुरुवात केली.
कोल्हापूर दक्षिणची लढाई राज्यात चर्चेत आली होती. खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या संघर्षामुळे ही लढत हाय व्होलटेज बनली होती. सतेज पाटील यांची प्रतिष्ठा या मतदारसंघांमध्ये पणाला लागली होती. खासदार धनंजय महाडिक यांना महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा फटका अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसणार का, याची चर्चा होती. परंतु कोल्हापूर दक्षिणमध्ये त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, योगी आदित्यनाथ यांची सभा कोल्हापूर दक्षिणच्या निकालामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष असताना सुद्धा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर व हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय खेचून आणला होता. त्यामुळे त्या कामगिरीची पुनरावृत्ती सुद्धा काँग्रेसला करता आलेली नाही.
हा विजय सर्व जनतेचा आहे. कोल्हापूरच्या आणि दक्षिणच्या सेवेसाठी काम करीन. या निवडणुकीसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे धन्यवाद मानतो. माझे कार्यकर्ते, जनतेला आणि मतदारांना या विजयाचे श्रेय देतो. दक्षिणचा न झालेला विकास यावर मला मतदारांनी कौल दिला.
-अमल महाडिक, विजयी उमेदवार
विरोधकांनी प्रचाराची पातळी घसरून टीका केली, अफवा पसरवल्या, नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, पण कोल्हापूरच्या जनतेचे आणि दक्षिणच्या जनतेचे आभार मानतो. धनशक्ती एकीकडे आणि जनशक्ती एकीकडे होती, पण अमोल महाडिक यांचा जनशक्तीचा विजय आहे. त्यांनी केलेला राजघराण्याचा अपमान यामुळे जनता नाराज होती. त्यांच्या विरोधात चीड होती. त्याचा मोबदला म्हणून हा विजय झाला आहे.
महाविकास आघाडीकडे कोणताही विकासाचा मुद्दा अथवा अजेंडा नव्हता. शहरासाठी फ्युचर प्लॅन नव्हता. किती वक्तव्ये करून त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांच्याकडे सत्ता असताना कोल्हापूरसाठी ते काहीही करू शकले नाहीत.
धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार