-संजय सोनवणी
आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व काळापासूनचे कुंभारकामाचे नमुने आपल्याला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पिके याचीही माहिती मिळते. या कलेतील प्रगती आणि उत्पादनांत झालेल्या नव्या बदलांमुळे प्रगती अथवा अधोगतीचे टप्पे यांचाही अंदाज बांधता येतो.
पाषाणातून जी संस्कृती उगवली तिला अश्मयुग असे म्हटले जाते. दगडाची हत्यारे, तासण्या, टोचण्या ते रंगीबेरंगी दगड-गारगोट्यांचे अलंकार या काळात बनवले जात होते. या कालात माणूस शिकारी व पशुपालक अवस्थेत होता. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधनांना कल्पकतेने आणि कष्टाने जीवनोपयोगी बनवण्याची कला ही मानवी बुद्धीची एक झेपच होती. पण याच कालात माणूस केवळ पत्थर नव्हे तर मातीचाही कल्पकतेने उपयोग करायला शिकला. त्या कलेलाच आपण कुंभारकाम म्हणतो.
आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व काळापासूनचे कुंभारकामाचे नमुने आपल्याला मिळून येतात. त्या खापरांवरुन त्या कालातील पर्यावरण ते पिके याचीही माहिती मिळते. या कलेतील प्रगती आणि उत्पादनांत झालेल्या नव्या बदलांमुळे प्रगती अथवा अधोगतीचे टप्पे यांचाही अंदाज बांधता येतो. कुंभारकामाचा प्रवास हाताने घडवलेली मडकी व वस्तुंपासून सुरुवात होत चाकाचा आणि आव्यांचा कसा कल्पकतेने आणि विज्ञानदृष्टीने केला गेला याचा सलग आलेख आपल्याला मिळतो. किंबहुना एके काळी या उद्योगाने भारताच्या आर्थिक समृद्धीत प्रचंड भर घातली होती हे आपल्याला जातककथा ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून समजते. मानवी जीवन सुखमय करण्यात या संस्कृतीने मोठा वाटा उचलला. आता नवनवीन शोधांनी पर्याय दिले असले तरी हा उद्योग अत्यंत महत्वाचा आहे. या व्यवसायाशी निगडित असलेल्या समाजाला कालौघात व्यवसाय पांपारिक झाल्याने आपण कुंभार म्हणतो. हे निर्माणकर्ते. देशाच्या आर्थिक उत्थानात मोठा वाटा उचलणारे. विविध प्रकारच्या कलात्मक कुंभांतून त्या त्या कालच्या सौंदर्य दृष्टीचे लोक. मातीपासून तिला तयार करत, कौशल्याने घडवत आव्यांत विशिष्टच प्रकारची धग देत हव्या त्या रंगाची मृद्भांडी बनवणारे हे आद्य वैज्ञानिक लोक.
कुंभारकामाचा शोध अपघाताने लागलेला नाही. वस्तू ठेवण्यासाठी वेली, बांबूच्या कामट्या यांचा उपयोग करुन बुरुडकाम जरी समांतर अस्तित्वात असले तरी द्रव पदार्थांचे काय करायचे हा प्रश्न होताच. आद्य मानवाने चिखल बनवून हाताने त्यांना विविध आकार देऊन वाळवत काही प्रमाणात प्रश्न सोडवला असला तरी त्या तेवढ्या उपयुक्त नव्हत्या. वस्तू भाजल्याने अधिक टणक व टिकाऊ होतात हे लक्षात आले असले तरी सर्व प्रकारची माती त्यासाठी उपयुक्त नसते तर त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते असे काही बुद्धिवंतांच्या लक्षात आले. यातूनच माती बनवण्याचे प्रक्रिया-विज्ञान विकसित केले गेले. उघड्या जागेत त्यांना हवे तसे भाजता येत नाही, हवी तेवढी उष्णता निर्माण करता येत नाही हे लक्षात आल्यावर आव्यांचा अत्यंत महत्वपूर्ण शोध लावण्यात आला. खरे तर या शोधाला थर्मोडायनामिक्समधील (उष्मागतीशास्त्र) पहिला शोध म्हणता येईल. याच शोधातून पुढे धातू गाळणा-या भट्ट्यांचा शोध लागला हे लक्षात घेतले गेले पाहिजे. चाकाचा शोध लागला असला तरी त्याचाच उपयोग वेगाने हव्या त्या आकाराच्या वस्तू बनवता येतात हाही त्याच संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. कुंभार कामाचे महत्त्व आता आपल्या लक्षात येईल. सिंधू संस्कृतीत असंख्य कलात्मक मृद्भांडी सापडलेली आहेत. महाराष्ट्रातही अकरा हजार वर्षांपूर्वीचे कुंभार कामाचे अवशेष खापरांच्या रुपात मिळाले आहेत. पाचाड येथील गुहांत मध्याष्मयुगातील (इसपू ९०००) दगडी हत्यारे जशी मिळालीत तशीच खापरेही मिळालेली आहेत. हा आजवर हाती आलेल सर्वात जुना पुरावा. पुढे जसजशी उत्खनने होत जातील तसतसे त्याहुनही जुने पुरावे हाती येण्याची शक्यता आहेच!
म्हणजे हा महाराष्ट्र आजपासून किमान अकरा हजार वर्षांपूर्वीपासून कुंभारकामात प्रवीण होऊ लागला होता. माणूस जसा स्थिर झाला तशी या व्यवसायाची व्याप्ती अजून वाढत गेली व या कामात कुशल असणारे लोक या व्यवसायात शिरले. भारतात सर्वत्र या अशा पुरातन कुंभारांच्या कलेचे नमुने मिळालेले आहेत व माणसाच्या इतिहास शोधण्यातही त्या वस्तूंच्या खापरांनी हातभार लावला आहे. सिंधू काळात या व्यवसायाची भरभराट मोठी होती. या काळात कुंभांवर नुसते नक्षीकाम नव्हे तर लोककथाही चितारुन चिरंतन केल्या गेल्या. एका हुशार कावळ्याने पाणी तळाला गेलेल्या माठात खडे टाकुन पाण्याचा स्तर कसा उंचावला आणि मग आपली तहान भागवली ही आजही लोकप्रिय असलेली कथा सिंधू संस्कृतीतील गुजरातमधील एका पुरातन स्थळावरील माठावरच चितारलेली आपल्याला पहायला मिळते. एवढेच नव्हे तर तत्कालीन शिव-शक्तीप्रधान धर्मकल्पना, पिंपळाचे असलेले महत्त्व इत्यादी बाबी कुंभारांनी मृद्भांड्यांवर चित्रित केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तत्कालीन धर्मसंकल्पनांचाही परिचय होतो. त्या अर्थाने कुंभार हे इतिहासाचे वाहक असल्याचे आपल्या लक्षात येईल.
अर्थात हा व्यवसाय होता आणि त्यात कोणीही इच्छुक प्रशिक्षण घेऊन प्रवेशू शकत. महाराष्ट्रात जोर्वे, इनामगांव अशा ठिकाणांवर प्राचीन आव्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. त्याचाच अर्थ असा की उष्मागतिकी शास्त्राची प्राथमिक तत्त्वे शोधात त्यांनी या रचना केल्या होत्या. जरी त्यांनी त्याचे शास्त्रीय नियम लिहून ठेवले नसले तरी ते ज्ञात असल्याखेरीज हे होणे शक्य नाही हे पुरातत्त्वविदांनी मान्य केले आहे.
श्रेणी अथवा निगम संस्थेचा जन्म सिंधू काळातच झाला. श्रेणी संस्था म्हणजे समान व्यावसायिकांच्या आजच्या कमर्शियल चेंबर्ससारख्या संस्था. कुंभारांच्या श्रेण्या त्या काळापासून अस्तित्वात असल्याचे संकेत आपल्याला तेथे मिळालेल्या मुद्रांवर कुंभांशी जवळीक साधणा-या चित्रांवरुन मिळतात. कुंभारांच्याही अशा देशभर श्रेण्या होत्या. बौद्ध जातककथांतही आपल्याला या व्यावसायिक श्रेण्यांचे असंख्य संदर्भ मिळतात. श्रेण्यांना ठेवी घेण्याचे व कर्ज देण्याचे जसे अधिकार होते तसेच चलनी नाणी पाडण्याचेही अधिकार असत. भारतात दहाव्या शतकापर्यंत प्रत्येक व्यवसायाच्या अशा स्वतंत्र श्रेण्या असत. प्रसंगी राजाला कर्जही देण्याचे काम या श्रेण्या करत इतका धनाचा पूर त्यांच्याकडे वाहत असे. गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घ्यायला सुरुवात केल्याने आणि नंतर सरंजामदारशाही युगाचा उदय झाल्याने श्रेण्या कमजोर झाल्या. त्या श्रेण्यांचेच पुढे जात पंचायतींत रुपांतर झाले.
कुंभार समाजाला पूर्वी प्राकृतात कुलाल असेही एक नाव होते. कुंभार त्या काळातही रांजण, सुरया, गाडगी-मडकी, खापराचे तवे, मद्यपात्रे, मद्यकुंभ, मृण्मय मुर्ती, खेळणी ते फुलदाण्या निर्मितीचे काम करत असत. धातूच्या वस्तू पूर्वी तशा दुर्मीळ व म्हणून महाग असल्याने मृत्तिकापात्रे हीच सामान्यांची मोलाची सोय होती. त्यामुळे या व्यवसायाला बरकत होती.
त्या काळात साखर, मध आणि विविध प्रकारचे तेल रांजन भरुन भरुन शेकडो गाड्यांतून दूर दूरच्या बाजारपेठांत नेले जात. अशा शेकडो गाड्यांच्या एकेक तांड्यांचे वर्णनही आपल्याला जातककथांत मिळते.
कुंभार त्या काळी किती श्रीमंत असावेत हे सद्दलीपुत या एका कुंभाराच्या वर्णनावरुन लक्षात येते. या सद्दलीपुताचे पाचशे आवे (भट्ट्या) होते आणि तो विविध प्रकारची मृद्भांडी गंगेच्या काठच्या बंदरांवरुन ठिकठिकाणी नेत व्यापार करीत असे. कुंभारांनी व त्यांच्या श्रेण्यांनी मंदिरे, जलाशय ते विहारांना आर्थिक देणग्या दिल्याचे तर अनेक शिलालेख भारतभर उपलब्ध आहेत. सातवाहन कालातील शिलालेख त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. हालाच्या गाथा सप्तशतीतही कुलालांचे (म्हणजे कुंभारांचे) अत्यंत आस्थामय चित्रण काही गाथांतून आलेले आहे.