-नरेंद्र बंडबे
जोराम ही छत्तीसगडमधल्या आदिवासी पाड्यातली गोष्ट आपल्याला शहरात आणि पुन्हा जंगलाकडे घेऊन जाते. सिनेमाची मांडणी नॉन–लिनीयर पध्दतीची आहे. म्हणजे कथानकात संदर्भ जोडणाऱ्या दृश्यांची पाठी–पुढे अशी रचना केलीय. आदिवासी पाड्यात आनंदी दिसणारं दसरुचं कुटुंब शहरात येतं. इथं कंस्ट्रक्शन साइटवर काम करायला लागतं. पण भूतकाळ माग काढतं इथं येते. यातून जे काही घडतं त्यातून आजच्या सामाजिक स्थितीवर जोराम सिनेमा भाष्य करतो…
फ्रेंच फिलॉसॉफर लुई अल्थुसेर यांचं एक पुस्तक आहे. ‘ऑन द रि–प्रॉडक्शन ऑफ कॅपिटॅलिजम – आयडियालॉजी आणि आयडियालॉजिकल स्टेट ॲपरेटेसेस (१९७१). या पुस्तकात लुई यांनी संघटित राजकीय समाज आणि एक शासन असलेला देश किंवा राज्य याची मुद्देसुद मांडणी केलीय. यात देशाच्या दडपशाही (Repressive State Apparatus) आणि वैचारीक (Idealogical State Apparatus) यंत्रणेवर चर्चा करण्यात आलेय. लुई म्हणतात, ‘देश किंवा राज्य ही संकल्पना दडपशाहीचं मशीन आहे. यात प्रबळवर्ग त्याचं प्रभुत्व कामगारवर्गावर दाखवेल याची तरतूद असते. जमाखोरीतून ही दडपशाही पुढे आली आणि भांडवलशाही समाज तयार झाला. यातून संघर्ष सुरु झाला. दडपशाही राज्य यंत्रणेसाठी मग कायदा आणि लष्कराची संकल्पनांची आखणी करण्यात आली. हे समाजातली सुव्यवस्था कायम राहण्यासाठी गरजेचं आहे असं चित्रं उभं करण्यात आलं. दुसरीकडे वैचारिक राज्य यंत्रणेतून धर्म, शिक्षण, संस्कृती, कुटुंब आणि माध्यम अशी मांडणी करण्यात आली. सोशल बीईंग म्हणजे सामाजिक अस्तित्वाची संकल्पना पुढे आहे. यातून मग स्वातंत्र्य आणि समानता आदी गोष्टी आल्या. जिथं या गोष्टी आल्या तिथं वर्ग संघर्ष येणार हे नव्यानं सांगण्याची गरज नाही असं लु्ई यांनी दावा केलाय. देबाशिष मखिजाचा जोराम (२०२३) सिनेमा पाहताना लुई अल्थुसेर यांच्या या तत्वज्ञानात्मक मांडणीची आठवण येते.
गोष्ट छोटी जंगलाएवढी
जोराम ही छत्तीसगडमधल्या आदिवासी पाड्यातली गोष्ट शहरात आणि पुन्हा जंगलाकडे घेऊन जाते. सिनेमाचा नायक दसरु (मनोज बाजपेयी), त्याचं कुटुंब, जंगलातल्या आदिवासींची क्लिष्ट सामाजिक किंवा राजकीय व्यवस्था, आधुनिक विकासाचे वेध, विकासाच्या नावाखाली शहराचं जंगलात घुसणं, यामुळं जंगलात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई, असं बरंच काही जोराममध्ये पाहायला मिळते. जोरामच्या माध्यमातून दिग्दर्शक देबाशिष मखिजानं शहरातला जात संघर्ष ही दाखवला आहे. हा जात संघर्ष पोलीस दलातला आहे. लुई यांनी म्हटल्याप्रमाणे, दडपशाही यंत्रणेत सुव्यवस्थेसाठी कायदा आला. पण या कायद्याच्या रखवालदारात जातीय संघर्ष सुरु झाला तर नक्की काय होतं. याचं चित्रण जोराम सिनेमात जबरदस्त करण्यात आलं आहे. सिनेमाची मांडणी नॉन–लिनीयर पध्दतीची आहे. म्हणजे कथानकात संदर्भ जोडणाऱ्या दृश्यांची पाठी–पुढे अशी रचना केलीय. आदिवासी पाड्यात आनंदी दिसणारं दसरुचं कुटुंब शहरात येतं. इथं कंस्ट्रक्शन साइटवर काम करायला लागतं. पण भूतकाळ माग काढतं इथं येते. यातून जे काही घडतं त्यातून आजच्या सामाजिक स्थितीवर जोराम सिनेमा भाष्य करतो.
आमचा विकास तुमचा ऱ्हास
विकास ही संकल्पना फोल आहे. एकाचा विकास हा दुसऱ्याचा ऱ्हास असू शकतो. विकासातून आतले आणि बाहेरचे असा संघर्ष होतो ही बाब जोराममध्ये प्रकर्षाने मांडलेली आहे. कधी उर्जा प्रकल्प, कधी कारखाना अश्या गोंडस नावाखाली विकास आदिवासी पाड्यांपर्यंत पोचला. जंगलतोड झाली. झाडं कापून रस्ते बनले. यंत्रांची धडधड सुरु झाली. पक्षी उडाले, पाणी आटलं, या सर्वाला विकास म्हटलं गेलं. हे सर्व सुरळीत व्हावं यासाठी दडपशाही यंत्रणेनं आखणी केली. पाड्यांमध्ये सामाजिक संघर्ष तयार झाला. या सरकारी विकासाच्या बाजूचे आणि त्याला विरोध करणारे गट तयार झाले. यातून खून, मारामाऱ्या असं बरंच काही घडलं. काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नाचणाऱ्या या आदिवासी समाजातली माणसं एकमेकांची दुश्मन बनली. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी शहराकडे धाव घेतली. दसरु आणि त्याचं कुटुंब याच परिस्थितीतून शहरातल्या निर्माणाधीन इमारतीत पोचलं. देबाशिषचे शहर आणि आदिवासीपाड्याचं निरीक्षण भारी आहे. जल, जंगल, जमिनीवर हक्क सांगणारा हा आदिवासी शहरात येतो, एकाकी पडतो. शहरात पोट भरण्याचा संघर्ष मोठा आहे. ते भरलं की मग डोक्यावरच्या छताचा. पोट भरण्याचं साधन आणि छत दोन्ही गोष्टी दसरुला या निर्माणाधीन इमारतीत मिळतात. त्याच्या आंतरिक आणि बाहेरील संघर्षाची गोष्ट म्हणजे जोराम. जोराम हे दसरुच्या एख वर्षांच्या मुलीचं नाव आहे.
कधी स्वत:ची जमीन कसणारा आणि जंगलात पाड्यात आपलं स्वत:चं हक्काचं घर असलेला हा दसरु शहरात दुसऱ्यांसाठी घर बांधतो. हा विरोधाभास आहे. वाढतं शहरीकरण, गावाकडून शहराकडे होणारं स्थलांतर, स्थलांतरीत कामगाराच्या खास करुन बांधकाम कामगारांच्या समस्या या गोष्टी जोराम सिनेमात प्रकर्षानं जाणवतात. हे कामगार जत्थ्यानं शहरात येतात. सध्या मुंबई–पुणेसारख्या शहरात सुरु असलेल्या सर्वच निर्माणाधीन इमारतींमध्ये हा स्थलांतरीत कामगार काम करतोय. तो छत्तीसगड, बिहार, ओरीसा, झारखंड या भागातून आलेला आहे. एक इमारत झाली की दुसरीकडे आणि दुसरी तयार झाली की तिसरीकडे असा या कामगारांचा प्रवास सतत सुरु असतो. शहरं आणि त्यातल्या इमारती तयार करणारा हा कामगार मात्र उपरा असतो. त्याचा ‘ठिकाना’ बदलत राहतो. यातून तयार होणारी कंस्ट्रक्शन काँन्ट्रॅक्टरची एक जुलमी व्यवस्था ही जोराममध्ये दाखवण्यात आलेय. विस्थापित आणि स्थलांतरीत कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. पण मिळणाऱ्या मोबदल्यावर अनेकदा मुकादम डल्ला मारतात. शिवाय या कामगारांची नोंदणीही केली जात नाही. नोंदणी नाही म्हणजे यांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ही मुकादम आणि संबंधित बांधकाम व्यवसायिकाची नाही. हे असे बरेच मुद्दे जे शहरीकरणाशी संबंधित आहेत ते सर्व जोराम सिनेमात आलेत. यामुळं जंगलातले आदिवासी ते शहरातले रोजंदार कामगार असा ३६० डिग्री आलेख सिनेमात आहे..
पिळवणुकीचे अव्याहत चक्र
शहरांत हजारो–लाखोंच्या संख्येनें विस्थापित आणि स्थलांतरित राहतायत. या चक्रात फिरतायत. याची जाणिव कोरोना कालावधीत जास्त झाली. कोरोना काळात हे जत्थेच्या जज्थे आपल्या गावाच्या दिशेने पायी निघाले. भिवंडी मार्गे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी या जत्थ्यांची तारांबळ उडाली. काही जण आपल्या गावी पोचले, काही प्रवासात कोरोना नाहीतर गर्दीचा शिकार बनले. जेव्हा ते गावी पोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. एक तर गावाची किंवा जंगलाची डेमोग्राफी बदलली होती. झाडं कापली होती, डोंगर पोखरला होता. आता ओसाड रानावरच्या पाऊलवाटेवरुन चालेत ते गाव कुठं गेलं हे हुडकत होते. सिनेमात पोलिसांना चकवून दसरु आपल्या पाड्याजवळ पोचतो तेव्हा त्याला हेच दिसतं. गावाचं गावपण हरवलेलं असतं. खाणीनं डोंगर–खोऱ्याला पोखरलेलं असते. पोकलेनचा पंजा नव्यानं डोंगराला नेस्तनाबूत करत असतो. देशाच्या दृष्टीनं ही वाट विकासाची आहे. पण जंगल, त्यातला आदिवासी पाडा आणि त्यातली आपलं घर हरवल्याची गोष्ट दसुरुच्या लक्षात येते. तो उद्विग्न होतो.इथंच कुठतरी जंगल होते, घर होतं, पाडा होता हे हातातल्या मुलीला सांगत सुटतो. हे सांगताना भारताच्या संविधानाचा गोषवारा लिहिलेल्या मोठ्या भिंतीखाली बसलेला दिसतो.
माध्यमांच्या गळ्यात पट्टा आणि जनमतावर ताबा
लुई अल्थुसेर यांनी आयडियालॉजी आणि आयडियालॉजिकल स्टेट ॲपरेटेसेस मध्ये केलेली वर्गवारी जोराममध्ये तंतोतंत दिसते. माध्यम हे वैचारिक व्यवस्थेचा भाग आहे. माध्यमाचा वापर दडपशाही व्यवस्थेसाठी केला जाऊ शकतो. याची प्रचिती जोराम सिनेमातून येते. बडी खबरच्या आहारी गेलेली माध्यमं आणि राजकीय नेत्यांशी असलेलं त्यांचं साटंलोटं, हे जोराममध्ये जसंच्या तसं आलंय. राजकीय नेत्याचं मीडिया बाइंग, यातून माध्यमाचा वापर स्वता:च्या फायद्यासाठी ते कसा करतात हे दाखवण्यात आलंय. राजकारण्याचं मीडिया बाइंग हा भारतात चर्चेचा विषय आहे. भारतामधल्या पॉलिटिकल कम्युनिकेशनमध्ये माध्यमाचा वापर प्रभावी साधन म्हणून केला जातोय.
पॉलिटिकल कम्युनिकेशन हा खोल विषय आहे. जागतिक पातळीवर पॉलिकल कम्युनिकेशनचा फंडा अभ्यासला जातोय. पॉलिटिकल कम्युनिकेशनची व्याख्या अगदी सोपी आहे. पॉलिकल सायन्स आणि कम्युनिकेशन या दोघांचा मेळ यात आहे. एखादी माहिती कशी पसरते आणि त्याचा राजकारण, नागरिक आणि माध्यमावर काय परिणाम होतो हे पॉलिटिकल कम्युनिकेशनमध्ये अभ्यासलं जातं. वेगवेगळ्या देशातले थिंक टँक याचा अभ्यास करुन राजकारणातली आपली स्ट्रटेजी ठरवतात. जॉर्गन हबरमास या जर्मन सोशल थिअरिस्टनं ‘कम्युनिकेटिव्ह रॅशनॅलिटी’ आणि ‘पब्लिक स्पेअर’ या दोन संकल्पना मांडल्या. त्यातून आलेलं पॉलिटिकल कम्युनिकेशनचं महत्त्व पटवून दिलं. स्पेअरचा शब्दश: अर्थ हा कुजबुज असा होतो. लोक ज्या ठिकाणी जमतात अशा ठिकाणी ही तिथं की कुजबुज सुरु होते. पुढे जाऊन या कुजबुजीचं पब्लिक ओपिनियन म्हणजे ‘लोकांचं मत’ असं रुपांतर होतं. वॉल्टर लिपमन या अमेरिकन लेखक आणि पत्रकारांनं लिहिलेल्या ‘पब्लिक ओपिनियन’ या पुस्तकात याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेय. लुई अल्थुसेरनं मांडलेल्या वैचारिक (Idealogical State Apparatus) यंत्रणेतल्या धर्म, शिक्षण, संस्कृती, कुटुंब आणि माध्यम या सर्व घटकांवर पब्लिक ओपिनियनचा परिणाम होतो. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या किंवा संलग्न आहेत.
हिटलरनं या पब्लिक स्पेअर अर्थात लोकांच्या कुजबुजुतून तयार झालेल्या मतांचा वापर नाझी राजवट वाढवण्यासाठी केला. आपल्या ‘माइन काम्फ’ या आत्मचरित्रात त्याने ही गोष्ट सांगितलेय. पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीवर लादलेली बंधनं आणि त्यामुळं झालेली आर्थिक कोंडी यावर चर्चा करण्यासाठी जर्मन लोक कॉफी हाऊस जमायचे. हमरीतुमरीपर्यंत चर्चा व्हायची. याचाच फायदा हिटलरनं घेतला आणि त्यातून नाझी राजवटीचा पाया रोवला. पहिल्या महायुध्दात झालेल्या पराभवासाठी कुणाला तरी जबाबदार धरणं गरजेचं होतं. यातून ज्यू या व्यापारी कम्युनिटीवर दोष ठेवण्यात आला आणि ज्यूं विरोधात लोकमत तयार करण्यासाठी हिटलरनं या पब्लिक स्पेअरचा वापर केलाय. कुजबुजीतून ज्यूंविोधात मत तयार केलं. त्यांना व्हिलन बनवलं. देश के दुश्मन ठरवून टाकलं. पुढे सत्तेवर आल्यावर हिटलरनं आधी नाटक आणि त्यानंतर सिनेमा या माध्यमांचा वापर करत प्रोपगंडा तयार केला. प्रोपगंडा सिनेमाच्या माध्यमातून अमेरिका आणि ज्यूं विरोधात मोर्चा तयार करण्यात आला आणि जग दुसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलं. हिटलरचा हा पॉलिटिकल कम्युनिकेशनचा फंडा आज ही सहज वापरला जातोय. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये विशिष्ट समाजाविरोधात मत तयार केलं जातंय. यातून आधी देशातलं सामाजिक वातावरण गढुळ करणं आणि त्यानंतर त्याला राजकीय रंग देणं हे आजकालच्या राजकारण्यासाठी अगदी साधी गोष्ट बनली आहे. यासाठी आधी एका छोट्या भागाचा वापर गिनिपीग सारखा करण्यात येतो. तिथं हे कम्युनिकेशनचं मॉडेल यशस्वी झालं तर त्याचा वापर मग देशपातळीवर करण्यासाठी जे काही हवं ते करण्यात येते. उजवे असो वा डावे पॉलिटिकल कम्युनिकेशनची या थिअरीला प्रॅक्टिकलची जोड राजकारणात मिळत असते. जोराम सिनेमातून ही प्रक्रिया नक्की कशी होते, हे समजते. जीव वाचवण्यासाठी शहरात पळून आलेला आदिवासी दसरु राजकीय नेत्यांच्या मीडिया संबंधामुळं नक्षली ठरवला जातो. मग देशभरात दसरु बातमी बनतो. टीव्ही ते सोशल मीडिया दसरुला नक्षली म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवर कुप्रसिध्द करण्यात येतं आणि त्यातून मग पोलिसांशी पाठशिवणीचा खेळ सुरु होतो.
जातिव्यवस्थेचे पोलिसी वास्तव
पदाच्या नावाखाली पोलीस खात्यात सुरु असलेल्या जातिव्यवस्थेचा पर्दाफाश करण्यात जोराम सिनेमाचा महत्त्वाचा वाटा आहे. ही जाती व्यवस्था सहजा लक्षात न येणारी आहे. मोठ्या पदावरचे सवर्ण अधिकारी आणि साध्या इन्स्पेक्टर पदावरचा दलित पोलीस असा हा संघर्ष आहेत. या पात्राचं नाव आहे रत्नाकर बागुल. रत्नाकर मुंबई सारख्या शहरातल्या पोलीस दलातल्या जाती व्यवस्थेचा बळी आहे. यातून अतिरीक्त ड्युटी लागणं, रजा न मिळणं असे बरेच काही सरकारी नोकरीशी संबंधित प्रॉब्लेम आहेत ते दिसतात. या मागे जात फॅक्टर असल्याचंही लक्षात येतं. रत्नाकरला व्हिडीओ कॉल करणारी त्याची बायको मुक्ता (राजश्री देशपांडे) आणि त्यांचं संभाषण हे जातीय संघर्षात त्यांची कुटुंब व्यवस्था कशी उध्वस्त झालीय, याचा प्रत्येय देतं. दसरुच्या मागावर जाण्याची आणि त्याला पकडून आणण्याची जबाबदारी रत्नाकर बागुलवर येते. खेड्यात गेल्यावर दसरुच्या मागे पळताना रत्नाकरच्या लक्षात येतं की दसरु हा नक्षली नसुन ते व्यवस्थेचा बळी आहे. अगदी आपल्यासारखा. यातून दोन्ही पात्रांचा समांतर संघर्ष समोर येतो.
धर्मसंस्कारांचा दबाव
जोराममध्ये आदिवासी पाड्यामध्ये सुरु झालेल्या धर्मांतराचा मुद्दा ही प्रकर्षानं दिसला आहे. देवाशिषच्या मते, ‘या आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुशिक्षीत आणि सुसंस्कारी करण्याच्या नादात ख्रिश्चन मिशनरी आणि आरएसएस सारख्या संघटना तिथं पोचल्या. त्यांनी त्याच्यावर आपले संस्कार करायला सुरुवात केली. यातून आंतरिक मोठा आंतरिक संघर्ष झाला. मिशनरी आणि स्थानिक संघटना याचा वाद ही वाढला. दसरुचा सर्वात जवळचा मित्रं हा सॅमसंग आहे. आता हे सॅमसंग नाव ऐकायला अजब वाटतं. पण सॅमसंगनं मिशनरीच्या माध्यातून धर्म परिवर्तन केल्यानंतर शहर गाठलं. तो ही व्यवस्थेचा बळी ठरतो.’
हे असे सर्व क्लिष्ट विषय सहज सोप्यापध्दतीनं सांगण्याचा प्रयत्न देवाशिष मखिजानं जोराम सिनेमातून केला आहे. २०२३ च्या रॉटरडम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये जोरामची वर्णी लागली. तेव्हापासून अलिकडे झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथालेखन आणि सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार जोरामला मिळाला आहे. या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रशंसा आणि पुरस्काराने अंतर्बाह्य उध्वस्त झालेल्या आदिवासी जगण्याचा कॅनव्हासच एकप्रकारे जगापुढे आणला आहे.