सांगली, प्रतिनिधी
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केली. संजयकाका यांनीही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. आमदार सुमन पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील तक्रार दाखल करून घेतली.
घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले असताना संजयकाका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुल्ला यांच्या घरी आले. आपणास संजयकाका भेटायला येणार असल्याचा निरोप त्यांनी दिल्यावर मुल्ला यांनी त्यांच्यासाठी घरी चहा बनवायला सांगितले. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाड्यांमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. मुल्ला यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली, तसेच आपल्या ७६ वर्षांच्या आईलाही ढकलून दिल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे.
माझे स्वीय सहायक होवाळे यांना मारहाण झाली. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता, अरेरावी व मारण्याची भाषा करू लागला. त्यांनीच माझ्या कार्यकर्त्यांना कानशिलात मारल्या. ”
– संजयकाका पाटील, माजी खासदार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तालुक्यातील या गुंडगिरी विरुद्ध उद्या निषेध सभा बोलावण्यात आली आहे. घटना कळल्यानंतर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार सुमन पाटील व रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.